भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर अवस्था; रघुराम राजन यांचा इशारा!

भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर अवस्था; रघुराम राजन यांचा इशारा!

एकीकडे देशातल्या हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये वारंवार भावनिक मुद्दे उकरून काढले जात असतानाच दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीवर येऊन ठेपल्याचा आसूड रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ओढला आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर अवस्था झाली आहे. विकासाचा दर अत्यंत खालावला आहे. वित्तीय तूट देखील वाढू लागली आहे. देशावरचं कर्ज देखील वाढू लागलं आहे’, असं रघुराम राजन म्हणाले. दिल्लीतल्या ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशातल्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली.

‘सत्तेचं केंद्रीकरण सगळ्यासाठी कारणीभूत’

दरम्यान, रघुराम राजन यांनी देशातल्या आर्थिक स्थितीसाठी सत्तेचं केंद्रीकरण कारणूभूत ठरल्याचं नमूद केलं आहे. ‘भारताचा आर्थिक स्तर खालावत चालला आहे. व्यापक आर्थिक धोरण नसून सत्तेचं मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण केलं जात आहे. विकासदर कमालीचा घटला आहे. वित्तीय तूट प्रचंड आहे. त्यामुळे विकासदरासाठी नवीन काही करण्याची क्षमताच घटली आहे. याचे परिणाम दीर्घकाळ जाणवत राहतील’, असं देखील राजन यावेळी म्हणाले.

९ ते १० टक्क्यांपर्यंत वित्तीय तूट!

यावेळी रघुराम राजन यांनी राज्य आणि केंद्रसरकार यांची मिळून देशाची एकूण वित्तीय तूट ९ ते १० टक्क्यांपर्यंत असेल, असं सांगितलं. ‘आपल्याकडे महसूलाविषयी दाखवण्यात आलेले अंदाज हे फारच आशावादी आहेत. आपण घेत असलेली कर्जाऊ रक्कम देखील मोठ्या प्रमाणावर ऑफ बॅलेन्स शीटवर आहे’ असं देखील त्यांनी नमूद केलं.


हेही वाचा – मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली!’

जीएसटी, नोटबंदीवर घेतला तीव्र आक्षेप

दरम्यान, रघुराम राजन यांनी यावेळी जीएसटी आणि नोटबंदीवर तीव्र आक्षेप घेतला. ‘ज्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था मुळात कमकुवत होती, नेमक्या अशाच वेळी हे निर्णय घेतले गेले. त्यामुळे त्याचा अजून मोठा फटका बसला’, असं ते म्हणाले. ‘नोटबंदी हा आर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय नव्हता. ती एक चुकीची कल्पना होती जिच्यामुळे अल्पावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मोठी घबराट निर्माण झाली’, असं देखील त्यांनी नमूद केलं.

First Published on: October 12, 2019 6:01 PM
Exit mobile version