‘या’ देशात मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग; जगातील ही पहिली दुर्मीळ घटना

‘या’ देशात मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग; जगातील ही पहिली दुर्मीळ घटना

भारतासह जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहे. कोरोनाप्रमाणे हा संसर्गजन्य आजार असल्याने अनेकांच्या मनात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञ या विषाणूवर प्रभावी औषध शोधत आहेत. यात आता फ्रान्समध्ये मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्सची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. एका मेडिकल जर्नलने मंकीपॉक्स व्हायरसचा मानवाकडून पाळीव प्राण्यांना संसर्ग झाल्याचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याचा पुरावा प्रकाशित केला आहे. द हिलने याबाबतचे वृत्त दिले आहे. मेडिकल जर्नल द लॅन्सेटनुसार, फ्रान्समध्ये दोन पुरुषांसोबत राहणाऱ्या एका कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्यानंतर 12 दिवसांनी लक्षणे दिसू लागली.

पोटावर फोड आणि मुरुम यांसारखी लक्षणे दिसल्यानंतर एका 4 वर्षांच्या कुत्र्याची चाचणी केली असता त्याला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी झाली आहे. डीएनए चाचणीद्वारे संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, पुरुष आणि कुत्रा दोघांनाही संक्रमित करणारा व्हायरस हा मंकीपॉक्स आहे. माहितीनुसार, मंकीपॉक्स झाल्यानंतर दोन्ही पुरुषांना त्यांच्या कुत्र्यासह क्वारंटाईन करण्यात आले आहे, यात मंकीपॉक्स संक्रमित रुग्णासोबतचं हा संक्रमित कुत्रा बेडवर झोपायचा, त्यामुळे त्याला आता या आजाराने ग्रासले आहे.

या घटनेपासून रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) ने त्यांच्या मंकीपॉक्स मार्गदर्शनात मानवाकडून पाळीव प्राण्यानां होणा-या संक्रमणाविषयी इशारा दिला आहे. CDC द्वारे प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संक्रमित प्राणी मंकीपॉक्स व्हायरस इतर लोकांमध्ये पसरवू शकतात तसेच संक्रमित मानव प्राण्यांमध्येही हा आजार पसरू शकतो.

त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे क्रियाकलाप टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, यात पाळीव प्राण्यांना मिठी मारणे, चुंबन घेणे, झोपण्याची जागा आणि अन्न शेअर करणे या गोष्टींचा समावेश आहे.


भाजपाच्या मोहित कंबोजांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचा बडा नेता; भ्रष्टाचार उघड करणार


First Published on: August 17, 2022 9:41 AM
Exit mobile version