मी अमित शाहांना भेटून विचारणार…; संजय राऊतांनी सांगितली पुढील रणनीती

मी अमित शाहांना भेटून विचारणार…; संजय राऊतांनी सांगितली पुढील रणनीती

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्या भविष्यातील रणनीतीबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. दरम्यान संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असून त्यांना मी कोणता गुन्हा केला याबाबत जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे.

मला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. एका खासदाराला ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले, मला आवाज उठवायचा आहे. माजी सरन्यायाधीश लळीत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे. तुरुंगात गेल्यामुळे माझ्या कुटुंबालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्याचेही राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, माझ्यावर चुकीची केस टाकण्यात आली, मला त्याबाबत काहीही माहिती नाही. हे लोक यापुढे खोट्या केसेस दाखल करतील. पण घाबरू नका, खंबीरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. या भाजपवाल्यांना खूप शाप लागेल, त्यांनाही मुलं आहेत. भाजप सरकारची इच्छा असती तर माझी अटक थांबवता आली असती. पण माझ्यासारखे लोक त्याच्यासाठी अडथळा बनतील असे भाजपला वाटत होते. यापूर्वी देशात असे राजकारण नव्हते. या लोकांना बदला घ्यायचा आहे तर त्यांनी पाकिस्तानकडून बदला घ्यावा, चीनकडून घ्यावा… दहशतवादाकडून घ्यावा… ही काय भाषा आहे, आमच्यावर का बदला घेतात. असे केले तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल.

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरही आपले मत मांडले. बंडखोरी केलेल्या 40 आमदारांपैकीही अनेकजण त्यांच्या संपर्कात असून त्यातील काही जण परत येतील, अशी आशा राऊतांनी व्यक्त केली. बंडखोरीच्या काळात अनेक आमदारांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.

एकनाथ शिंदे गटाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, तुम्हाला स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव हवे होते, नाहीतर लोक तुम्हाला जोडे मारतील. मी येथे हे स्पष्ट करतो की, आम्ही त्याच्याशी कधीही नाते तोडले नाही. ते जुने शिवसैनिक आहेत. शुक्रवारी आदित्य ठाकरेही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते, त्यावरही संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते यापुढील काळातही महाविकास आघाडी अशीच सुरू राहणार आहे. आदित्य आणि राहुल हे दोघेही तरुण नेते आहेत. यात आदित्य कुणासोबत चालत असतील, ज्याचा हात पकडतील त्यांच्या पाठीत ते खंजीर खुपसणार नाही.


नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘मित्र’; नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री

First Published on: November 11, 2022 10:04 PM
Exit mobile version