भारत हे धार्मिक सद्भावनांसाठी नंदनवन.. हा घ्या पुरावा!

भारत हे धार्मिक सद्भावनांसाठी नंदनवन.. हा घ्या पुरावा!

शीख आणि मुस्लीम बांधवांनी धार्मिक सलोख्याचं अनोखं उदाहरण घालून दिलं आहे. (सौजन्य - द क्विंट)

देशात सध्या सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र तयार झालं आहे. विशेषत: मुस्लिमांचाच या कायद्याला विरोध आहे, असं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्वधर्म समभाव या तत्वालाच हरताळ फासला जात असल्याचं वाटत असतानाच उत्तर प्रदेशात मात्र स्थानिक शीख आणि मुस्लीम बांधवांनी एक आगळा-वेगळा आदर्शच आख्ख्या देशापुढे घालून दिला आहे. त्यांच्या या वर्तनाचं देशभरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या १० वर्षांपासून इथल्या एका जमिनीच्या तुकड्यासाठी स्थानिक मुस्लीम आणि शीख बांधवांमध्ये वाद सुरू होता. पण त्याचा शेवट असा काही झाला, की सगळ्यांनाच आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं.

नक्की झालं काय?

तर उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये शीख बांधवांचं प्रार्थनास्थळ असलेला गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारालाच लागून एक जमिनीचा भूखंड आहे, जो १० वर्षांपूर्वी गुरुद्वारा समितीने खरेदी केला होता. त्यावर गुरुद्वाराचा विस्तार करण्याची योजना होती. मात्र, या जमिनीवरचं जुनं बांधकाम तोडण्यात आल्याचा आणि ते बांधकाम मशिदीचा भाग असल्याचा दावा स्थानिक मुस्लिमांकडून करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायांमध्ये सुरू असलेला वाद वाढत वाढत थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला!

पिता-पुत्राने वाचवले अनेक मुस्लिमांचे प्राण

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात या वादावर तारीख पे तारीख पडत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हिंसाचाराची घटना घडली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक जखमी झाले. ४० हून जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारामध्ये अनेक शीख बांधवांनी मुस्लीम बांधवांना मदत करून सुरक्षा दिली. गोकुळपुरी भागामध्ये २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारामध्ये तर मोहिंदर सिंग आणि त्यांच्या मुलाने अनेक मुस्लीम कुटुंबांना कर्दमपुरी भागामध्ये त्यांच्या बाईकवर पोहोचवलं होतं. त्यामुळे ७० हून जास्त मुस्लिमांचे प्राण वाचले होते.

दरम्यान, दिल्ली हिंसाचारामध्ये शीख बांधवांनी मुस्लिमांना दिलेलं संरक्षण आणि दाखवलेली सह्रदयता याची परतफेड म्हणून आता मुस्लीम बांधवांनी सहारनपूरमधल्या वादग्रस्त जागेवरचा दावा सोडला आहे. विशेष म्हणजे, मुस्लीम बांधवांच्या या कृतीमुळे शीख बांधवांनी देखील एक पाऊल पुढे टाकत मशिदीसाठी दुसऱ्या ठिकाणी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे!

शीखांनी सीएए विरोधातलं आंदोलन आणि दिल्ली हिंसाचारादरम्यान मुस्लिमांना केलेली सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली मदत पाहाता मशिद समितीने वादग्रस्त जागेवरचा आपला दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅड. निजाम पाशा, मुस्लीम बांधवांचे वकील

मुस्लीम बांधव गुरुद्वाराचं बांधकाम करण्यासाठी कारसेवा करण्यासाठी आले याचा आम्हाला अत्यानंद झाला आहे. हा वाद जरी २०१०पासून सुरू असला, तरी आम्हाला कुणालाही एकमेकांना किंवा आमच्यातल्या नातेसंबंधांना धक्का पोहोचू द्यायचा नव्हता. आता शीख बांधव देखील मशीद बांधण्याच्या कामी मुस्लिमांची मदत करणार आहेत.

सन्नी, शीख बांधवांचे प्रतिनिधी


हेही वाचा – मोदींना नागरिकत्व प्रमाणपत्राची गरज नाही-माहिती अधिकारात पीएमओचं उत्तर!
First Published on: March 1, 2020 5:19 PM
Exit mobile version