नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधींची ईडीकडून ६ तास चौकशी, उद्या पुन्हा बोलावले

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सुमारे सहा तास चौकशी केली. या आधी ईडीने गुरुवारी सुमारे सव्वादोन तास त्यांची चौकशी केली होती. आता त्यांना उद्या पुन्हा पाचारण करण्यात आले आहे.

नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. जून महिन्यात सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर त्यांना २१ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या दिवशी त्यांची २ तास २० मिनिटे चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना आज पुन्हा बोलावण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११च्या सुमारास प्रियंका गांधी यांच्यासमवेत त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन डॉक्टर आणि एक अॅम्ब्युलन्स तिथे सज्ज ठेवण्यात आली होती.

हेही वाचा – मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्लांना कोर्टाची नोटीस, २७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना लश्र्य केले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी आंदोलनास सुरुवात केली. पोलिसांनी राहुल गांधीसह काही नेत्यांना ताब्यात घेतले होते. काँग्रेसतर्फे देशभरात हे आंदोलन करण्यात आले.

नागपूरला आंदोलकांनी कार पेटवली
ईडीच्या चौकशीविरोधात नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जीपीओ चौकात एक कार पेटवून दिली. याप्रकरणी पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा – राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा १८ जिल्ह्यांना इशारा

First Published on: July 26, 2022 8:05 PM
Exit mobile version