देशात दळवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’- पंतप्रधान

देशात दळवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’- पंतप्रधान

प्रातिनिधिक फोटो

भविष्याची गरज लक्षात घेऊन देशातील दळणवळण क्षेत्राचा विस्तार आणि बदल होत आहे. देशातंर्गत दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार्वजनिक वाहतूक, टोल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले यावेळी ते बोलत होते.

नागपुरातील वर्धा मार्गावरच्या ‘एअरपोर्ट साऊथ स्टेशन’वर आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथून ‘मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्र, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते.

काय म्हणालेत पंतप्रधान

यावेळी पंतप्रधान म्हणाले की,”‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली फारच कमी देशात कार्यान्वित आहे. विविध शहरांमध्ये एकाच ‘कार्डाच्या माध्यमातून प्रवास करता येईल. तसेच या ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’च्या माध्यमातून खरेदीदेखील करता येणार आहे. ‘स्मार्ट’ व्यवस्थेच्या माध्यमातून विकासाला चालना देणारे ‘एक्सप्रेस कार्ड’ असेल. सामान्य जनतेची सुविधा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात येत नाही.”

देशभरात २०१४ नंतर ‘मेट्रो’च्या कामाला वेग

देशात २०१४ पूर्वी ‘मेट्रो’चे ‘नेटवर्क’ २५० किलोमीटरचे होते. मात्र ‘मजबूर’ ऐवजी ‘मजबूत’ सरकार आले आणि त्यानंतर हा आकडा ६५० किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यासोबतच देशातील विविध भागात ८०० किलोमीटर ‘मेट्रो’ मार्गांचे काम सुरू आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढले.

First Published on: March 7, 2019 9:29 PM
Exit mobile version