‘काश्मीरमध्ये हिंसा वाढवा’, हाफिज सईदने ओकली गरळ

‘काश्मीरमध्ये हिंसा वाढवा’, हाफिज सईदने ओकली गरळ

हाफीज सईद

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्याचा मुख्य सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदने आपल्या समर्थकांना काश्मीरमध्ये हिंसा वाढविण्याचे आवाहन केले आहे. येत्या २५ जुलैला पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय निवडणूका होणार आहेत. या निवडणुक प्रचारादरम्यान हाफिज सईदने काश्मीर विषयी पुन्हा गरळ ओकली. देशासाठी काश्मीर हा विषय नेहमीच संवेदनशील राहिला आहे. त्यात हाफिजचे काश्मीर बद्दलचे असे उद्गार चिंताजनक आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या अनेक हल्ल्यांमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा हात असतो. त्याचबरोबर काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना भडकविण्याचे काम देखील हीच अतिरेकी संघटना करते. या संघटनेमुळेच काश्मीरचे तरुण सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक करतात.

सगळेच निर्णय जन्नतमधून येतात, वॉशिंग्टनवरुन नाही!

निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हाफिज सईदने लाहौरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये हाफिज म्हणाला की, ‘एका नव्या युगाला सुरुवात झाली आहे. अल्लाहचे सगळीकडे लक्ष आहे. अल्लाहच्या इच्छेनुसार काश्मीर स्वतंत्र होणार. काश्मीरमध्ये होणाऱ्या रक्तपाताकडे अल्लाहचे लक्ष आहे. तो प्रत्येक घटनेवर आपला निर्णय देईल. कारण, सगळेच निर्णय हे वॉशिंगटनवरुन येत नाहीत. ते जन्नतमधूनच येतात’.

मोदीही काही करु शकणार नाही

हाफिज म्हणतो की, ‘भारतीय सैन्याच्या गाडीवर दगडफेक करुण लढा देणारे आणि या दरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणारे लोक माझ्या लक्षात आहेत. अल्लाह हे बघत आहे. भारतीय सैन्याविरोधी लढाणारे हे नागरिक मरेपर्यंत पाकिस्तान आणि काश्मीर ऐक्याची आशा करतात. काश्मीरमधीले हे एक नवे युग आहे आणि या युगाला मोदीही (देशाचे पंतप्रधान) काही करु शकणार नाही. कारण, सगळे निर्णय हे जन्नतवरुन येतात’.

जगातील मुस्लीमांचे दायित्व पाकिस्तान सांभाळू शकतो

हाफिज आपल्या जमात-उद-दावा या पक्षाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या राजकीय वर्तूळात उतरला आहे. या निवडणुकीत २६५ मतदारसंघापैकी जमातचे २०० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हाफिज म्हणतो की, ‘आम्हाला पाकिस्तान हे अल्लाहचे एक स्वतंत्र राज्य बनवायचे आहे. आम्हाला सर्व मुस्लिम बांधवांचे रक्षण करायचे आहे. आम्ही त्यासाठी संपूर्ण तयारी करत आहोत. आमचा एकमेव असा देश आहे की, जो जगातील संपूर्ण मुस्लिमांचे दायित्व सांभाळू शकतो’. त्याचबरोबर हाफिजने पाकीस्तानच्या जनतेला एकत्र राहण्याचेही आवाहन केले आहे.

First Published on: June 25, 2018 6:20 PM
Exit mobile version