न्यायाधिशांनाही सहन होईना दिल्लीचं प्रदूषण!

न्यायाधिशांनाही सहन होईना दिल्लीचं प्रदूषण!

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे हवेच्या खालावत चाललेल्या दर्जाची. हवेच्या घटत चाललेल्या दर्जामुळे दिल्लीकरांना आधीच श्वास घेणं कठीण होत असतानाच आता सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टीची दखल घेतली आहे. ‘दिल्लीच्या हवेमध्ये वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे मी मॉर्निंग वॉकला जाणं बंद केलं आहे’, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरूण मिश्रा यांनी केली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे, याचा प्रत्यय देशवासियांना आता येऊ लागला आहे.

सरकारी वकिलांनाही सुनावलं

बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरूण मिश्रा यांनी वरील टिप्पणी केली. दिल्लीमध्ये वाढतच चाललेल्या प्रदूषणाच्या पातळीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. दिल्ली सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सदर सुनावणीवेळी कोर्टात हजर होते. त्यांना न्यायमूर्तींनी दिल्लीच्या प्रदूषणावरून सुनावले.

दिल्लीमध्ये हे काय चाललंय? किती प्रदूषण वाढलंय? दिल्लीकरांना त्यांच्या घरांमधून बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. मला रोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय आहे. पण या प्रदूषणामुळे मला मॉर्निंग वॉकलाच जाता येत नाही.

अरूण मिश्रा, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत परिस्थिती गंभीर

दिल्लीमधल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अनेक उपाययोजना आणि कठोर निर्णय घेतले आहेत. दिवाळीमध्ये फक्त ग्रीन फटाक्यांचाच वापर, ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) हे त्यातलेच काही निर्णय. GRAPच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश नुकतेच दिल्लीचे पर्यावरण मंत्री इम्रान हुसेन यांनी दिले आहेत. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये धोकादायक, गंभीर, त्रासदायक अशा स्वरूपाच्या हवेचे नमुने आढळले आहेत. त्यामध्ये वझीरपूर (५२१ – गंभीर), आर. के. पुरम (४०४ – गंभीर), शादीपूर (२०३ – धोकादायक), आनंद विहार (२८९ – धोकादायक) अशा ठिकाणांचा समावेश होतो. एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार ही आकडेवारी काढण्यात आली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – दिल्लीच्या प्रदूषणाने प्रियांका – फरहान हैराण

First Published on: November 14, 2018 7:32 PM
Exit mobile version