RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला नागपूर ATS कडून अटक

RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला नागपूर ATS कडून अटक

नागपूर येथील संघाच्या मुख्यालयाची (RSS) रेकी करणाऱ्या एका संशयित दहशतवाद्याला एटीएसच्या पथकाने जम्मू काश्मीरमधून अटक केली आहे. रईस अहमद असदुल्ला शेख असं या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. रईस जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरोपीला जानेवारीत दुसर्‍या प्रकरणात अटक केली होती. रईस अहमदला नागपूर एटीएसने प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले असून लवकरच त्याला नागपुरात आणले जाईल. शेख याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरातील हेगडेवार स्मृती भवन परिसर व इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालयाचा बंदोबस्त आणखी कडक केला. तसेच हेडगेवार स्मारक इमारत परिसरात ड्रोनलाही बंदी घालण्यात आली.

घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू करत रईस अहमद शेख याचा शोध सुरू केला. अखेर त्याला जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसने कबूल केले की, पाकिस्तानमधील जैशच्या सूत्रधाराच्या सांगण्यावरून त्याने आरएसएसच्या मुख्यालयात रेका केली होती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर एटीएसच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रईसची जम्मू-काश्मीरमध्ये चौकशीही केली आहे. एटीएसने रईसला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय नेहमीच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रईसच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2020 मध्येही हल्ल्याची चर्चा

यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये आरएसएसच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची चर्चा होती. त्यावेळी दहशतवादी हा हल्ला करण्यासाठी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) किंवा स्फोटकांनी भरलेले वाहन (व्हीआयईडी) वापरू शकतात, असे सांगण्यात आले. त्यादरम्यान, इंटेलिजन्स ब्युरो (IB) दिल्लीनुसार, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले.

2006 मध्ये आरएसएसच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला

जून 2006 च्या पहाटे चार वाजता RSS मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. लाल दिवा असलेली अॅम्बेसेडर कार आरएसएस मुख्यालयाच्या दिशेने येत होती. गाडीवरील लाल दिवा पाहून जवान सावध झाले. सैनिकांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला, पण गाडी थांबली नाही. यानंतर आरएसएस मुख्यालयापासून सुमारे 100 मीटर अंतरावर गाडी थांबली. जेव्हा जवान गाडीजवळ पोहोचला तेव्हा त्याने कारमध्ये 20 ते 22 वर्षे वयोगटातील 3 मुले असल्याचे पाहिले. पोलिसांनी मुलांना तपासासाठी खाली उतरण्यास सांगितल्यावर गाडी अडसर तोडून पुढे निघाली. गतिरोधक तोडून गाडी पुढे सरकली असता पोलिसांना त्या मुलांसोबत शस्त्रे दिसली. धोका ओळखून पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर कारमधील दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांनी कारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


Visa corruption case : कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय रमण यांना अटक; व्हिसा भ्रष्टाचार प्रकरणी CBI ची कारवाई

First Published on: May 18, 2022 11:08 AM
Exit mobile version