बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादुरांची उमेदवारी अडचणीत

बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादुरांची उमेदवारी अडचणीत

तेज बहादूर यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना समाजवादी पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, त्यांची ही उमेदवारी अडचणीत येऊ शकते. कारण, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये एकाच विषयाशी संबंधित वेगवेगळी माहिती समोर आल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय योग्य कागदपत्र बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दाखल करण्याचेही आदेश दिले गेले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीएसएफ जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून सरकारवर टीका केल्यामुळे बडतर्फ करण्यात आलेले माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहेत. यादव अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते. पण आता सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलत बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली. बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा व्हीडीओ व्हायरल केल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेज बहादूर यांच नाव चर्चेत आलं होतं. दरम्यान उमेदवारीच्या अर्जात बीएसएफमधून बडतर्फ करण्यामागे भ्रष्टाचार कारणीभूत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला त्यांनी हो असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रात चुकून हो लिहिले गेल्याचे म्हटले. त्यामुळे बडतर्फ करण्या संदर्भात वेगवेगळी माहिती मिळाल्याने बहादूर यांनी बीएसएफ विभागाकडून का बडतर्फ केले? याचे उत्तर कागदोपत्री आणावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यासाठी त्यांना बुधवार सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

First Published on: April 30, 2019 9:51 PM
Exit mobile version