तेलंगणाची पहिली विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त

तेलंगणाची पहिली विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त होणार आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा मंत्रिमंडळाने विधानसभा भंग करुन मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राव यांनी तातडीने राज्यपाल इ.एस.एल. नरसिम्हन यांची भेट घेऊन शिफारस केली आहे. तेलगंणा विधानसभेची २ जून २०१९ पर्यंत मुदत होती. मात्र त्यापूर्वीच तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तेलंगाणामध्ये विधानसभेसाठी निवडणुक रंगणार आहे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार विधानसभा भंगाला राज्यपाल इ.एस.एल. नरसिम्हन यांनी मंजूरी दिली आहे. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत चेंद्रशेखर राव हे तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे देखील राज्यपालांनी सांगितले आहे.

तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकारचा कार्यकाळ संपायला अजून बराच कालावधी आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची इच्छा होती की, तेलंगणाच्या निवडणुका या वर्षाअखेर चार राज्यात होणाऱ्या निवडणुकांसोबतच व्हाव्यात. यासाठी त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणामध्ये काही दिवसापूर्वी अशी देखील चर्चा होती की, मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त केल्यानंतर मोठ्या रॅलीचे आयोजन करतील. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी १०५ उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे.

 

First Published on: September 6, 2018 2:36 PM
Exit mobile version