पत्नीच्या उपवासामुळे डॉक्टरांना झाला उशीर, निष्पाप बालकाचा रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच मृत्यू

पत्नीच्या उपवासामुळे डॉक्टरांना झाला उशीर, निष्पाप बालकाचा रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच मृत्यू

भोपाळ – देशातील आरोग्य व्यवस्था अद्यापही खिळखिळी आहे. कोरोनानंतर देशातील आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य विभाग सुधरेल अशी अपेक्षा होती, मात्र समोर येत असलेल्या काही घटना पाहिल्या की ही अपेक्षा फोल ठरते. मध्य प्रदेशातील बरगीच्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेफिकरीपणामुळे ५ वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईच्या कुशीतच मृत्यू झाला. डॉक्टर वेळेत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे, असा दावा मृत मुलाच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचा – उत्तर प्रदेशातील गंगा नदीत 25-30 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; दोघांचा मृत्यू

चारगव्हाण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्हेटा देवरी येथील संजय पांद्रे यांचा मुलगा ऋषी पांद्रे याला उपचारांसाठी बरगी येथील आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र, त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हते. आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरही उपस्थित नसल्याने आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर बसून ऋषी पाद्रेच्या आई-वडिलांनी खूप वेळ वाट पाहिली. मात्र, डॉक्टर वेळेत पोहोचू न शकल्याने या निष्पाप बालकाने आईच्या कुशीत आरोग्य केंद्राच्या दारातच जीव सोडला. धक्कादायक म्हणजे, मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही तिथे कोणीही पोहोचले नाही. त्यामुळे मृत मुलाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केलाय.

हेही वाचा – भारतीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

मुलावर वेळेवर उपचार मिळाले असते तर त्या निष्पाप जीवाचा प्राण वाचला असता, असा दावा मुलाच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, बराच काळ लोटल्यानंतर डॉक्टर आरोग्य केंद्रात दाखल झाले. आरोग्य केंद्रात उशिराने येण्याचे कारण विचारताच त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. आदल्या दिवशी डॉक्टरांच्या पत्नीने उपवास धरला होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटल पोहोचण्यास उशीर झाला, असं कारण त्यांनी दिलं. त्यामुळे याप्रकरणी आता संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on: September 1, 2022 11:49 AM
Exit mobile version