माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरामध्ये चोरी

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरामध्ये चोरी

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. चिदंबरम यांच्या चेन्नईतील नुंगमबक्कम येथील घरामध्ये शनिवारी रात्री चोरी झाली. त्यांच्या घरातील डायमंडचे दागिणे, १ लाख १० हजारांची रोख रक्कम आणि सिल्कच्या ६ साड्या चोरांनी लंपास केल्या आहेत.

रविवारी सकाळी ७ वाजता चिंदंबरम यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. चिंदंबरम यांच्या पत्नी अॅड. नलिनी चेन्नईतल्या घरी परतल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चिदंबरम यांच्या घरामधील कपाटं उघडी होती. तसंच त्या कपाडामध्ये ठेवलेले दागिणे, पैसे आणि साड्या गायब झाल्या होत्या. नलिनी त्यांच्या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या तेव्हा हा प्रकार घडला.

या चोरीप्रकरणी नलिनी चिदंबरम यांच्या मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. चिदंबरम यांच्या घरामधील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामध्ये दोन महिला तोंडाला कपडा बांधून घरामध्ये प्रवेश केल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी चिदंबरम यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन मोलकरणींवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान चिदंबरम यांच्या घरातील कपाटांवर असलेले हातांचे ठसे पोलिसांनी घेतले आहेत. यांच्या आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर ते आरोपींचा शोध घेत आहे. चोरांच्या तपासासाठी डॉग स्कवॉयडला देखील बोलवण्यात आले आहे.

First Published on: July 8, 2018 6:20 PM
Exit mobile version