तिसरी लाट कधी येणार? तज्ज्ञांनी वर्तविले अंदाज

तिसरी लाट कधी येणार? तज्ज्ञांनी वर्तविले अंदाज

देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आता मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशात ३ ते ४ लाख रुग्ण आढळून येत होते. मात्र, आज हा आकडा २ लाख इतका आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मात्र, एककीडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले जात असले तरी देखील आता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

कधी येणार कोरोनाची तिसरी लाट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वच राज्यांना फटका बसला आहे. तर सर्वात जास्त कहर हा महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दिसून आला. मात्र, आता यात घट होतानाही दिसत आहे. परंतु, एकीकडे नियंत्रण मिळवण्यात यश आले तरी देखील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांनी कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे ही लाट महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर महिन्यात येईल. असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या नवीन लाटेसाठी तयार राहायला हवे, असे देखील सांगण्यात आले आहे.

लसीकरण एकमेव पर्याय

सध्या देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार नागरिक देखील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद देत आहे. विशेष म्हणजे के. विजयराघवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘रोगप्रतिकारशक्ती आणि लसीमुळे कोरोनावर मात करता येऊ शकते. त्यामुळे कोरोना विषाणू यातून निसटण्याचा देखील प्रयत्न करेल. त्याप्रमाणे आपण तशी तयारी केली पाहिजे. तसेच सध्या लसीच्या व्हायरसविरोधात चांगला प्रभाव दिसून येत आहे. पण येणाऱ्या काळात व्हायरस बदल्याने लसीत देखील बदल करणे गरजेचे आहे’.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी की जास्त?

तज्ज्ञांच्या मते लसीकरण किती होईल यावर तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी की जास्त ते ठरणार आहे. कारण लसीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन मृत्यू कमी होण्यास होईल. मात्र, तिसरी लाट ही पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एक म्हणजे बाधितांचे जीव वाचवणे आणि दुसरे म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ न देणे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांवर घरच्या घरीच उपचार करण्यात यावे हे ध्येय असणार आहे.

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार तयार

तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्यांनी सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने खबरदारीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, ‘तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असणे गरजेचे आहे आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या बाबतीत आपण परिपूर्ण असले पाहिजे. ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे’.

तिसऱ्या लाटेचा कोणाला धोका

तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितले की, ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे नसतील किंवा असली तर सामान्य लक्षणे असतील. अशामध्ये लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.’ तसेच, ‘तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका असला तरी त्यांच्यावर परिणाम कमी होईल’, असे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – ‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर ४ दिवसात निर्णय – वडेट्टीवार


 

First Published on: May 24, 2021 2:58 PM
Exit mobile version