‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर ४ दिवसात निर्णय – वडेट्टीवार

लोकलवरील निर्बंध लवकर उठणार नाही, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

vijay wadettiwar reaction on lockdown
'लॉकडाऊन'च्या शिथिलतेवर ४ दिवसात निर्णय - वडेट्टीवार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन १५ दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असून आता पुढील नियमावली काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार दिवसात लॉकडाऊनच्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहावे लागणार आहे.

‘राज्यात ज्यावेळी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या दरम्यान जनतेकडून लॉकडाऊन लावण्याची मागणी झाली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, आता जसजसे कोरोनावर नियंत्रण मिळवले जात आहे आणि रुग्णसंख्या घटत आहे, त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा जनतेकडून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार पुढील चार दिवसात ‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

१४ जिल्हे रेड झोनमध्ये

राज्यातील १४ जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्याठिकाणी शिथिलता करावी, अशी मागणी केली तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे जे परिसर हॉटस्पॉट आहेत. त्याठिकाणी कडक लॉकडाऊन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ज्याठिकाणी रुग्णसंख्या घटली आहे तिथे नियम शिथिल करावे लागणार आहेत.

लोकलवरील निर्बंध लवकर उठणार नाही

या लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता आली तरी लोकलवरील निर्बंध लवकर उठणार नाही, असे देखील सांगण्यात आले आहे. कारण लोकल बंद केल्यानंतर रुग्णसंख्येते मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे लोकल सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या तरी लोकल सर्वसामान्यांकरता सुरु केली जाणार नाही, असे देखील मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील