ओडिशात ‘तितली’चा धुमाकूळ; ८ जिल्ह्यांमध्ये वादळ घुसलं!

ओडिशात ‘तितली’चा धुमाकूळ; ८ जिल्ह्यांमध्ये वादळ घुसलं!

ओडिशामध्ये 'तितली' वादळाचं थैमानओडिशामध्ये 'तितली' वादळाचं थैमान (फोटो सौजन्य - द हिंदू)

ओडिशाच्या किनारी भागामध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास धडकलेलं ‘तितली’ वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. तब्बल १४० ते १५० किलोमीटर प्रतितास वेगाने रौद्र रूप धारण करत हे वारे आतमध्ये सरकत आहेत. या वाऱ्यांना आत्तापर्यंत ओडिशाच्या किनारी भागामधलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं असून एकूण ८ जिल्ह्यांना ‘तितली’ वादळाचा फटका बसला आहे. याशिवाय आन्ध्र प्रदेशमध्येही हे वादळ घुसलं असून ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने तिथे वारे वाहात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.

वाऱ्यांचा वेग कमी होणार?

दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ओडिशा आणि आन्ध्र प्रदेशमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हळूहळू कमी होऊ शकतो. या वाऱ्यांचा जोर ओसरल्यानंतर हा वेग कमी होईल. मात्र, त्याला अजून किती वेळ लागेल, याबाबत मात्र ठोस माहिती देण्यात आलेली नाही.


वाचा काय केलंय ओडिशामध्ये ‘तितली’नं


८ जिल्ह्यांमध्ये ‘तितली’ घुसलं!

दरम्यान आन्ध्र प्रदेशमध्ये शिरण्याआधी ओडिशाच्या ८ जिल्ह्यांमध्ये ‘तितली’ने धुमाकूळ घातला. यामध्ये गंजम, खुर्धा, पुरी, जगतसिंगपूर, गजपती, केंद्रपारा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये गंजम, गजपती आणि पुरी या ३ जिल्ह्यांमध्ये ‘तितली’मुळे मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गंजममध्ये स्थानिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, संभाव्य धोकादायक परिस्थिती लक्षात घेता ३० डिस्ट्रिक्ट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर्स तातडीने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती ओडिशा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

३ लाख नागरिकांना हलवलं!

दरम्यान, ‘तितली’ वादळाच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आन्ध्र प्रदेशच्या किनारी भागातून तब्बल ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सुमारे ११०० मदत शिबिरे उभारण्यात आली असून गृह मंत्रालयाकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

 

First Published on: October 11, 2018 1:31 PM
Exit mobile version