Covid-19 New Strain Alert : युके पाठोपाठ दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमधून भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल

Covid-19 New Strain Alert : युके पाठोपाठ दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमधून भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल

ब्रिटेनमधून आढळलेल्या स्ट्रेनपाठोपाठच आता भारतात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून कोरोनाचे नवे स्ट्रेन दाखल झाल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्रालयाने जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा SARS-CoV-2 हा व्हेरीएंट जानेवारीत आढळला होता. तर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ब्राझीलमधून आलेली एक व्यक्ती नव्या कोरोनाच्या स्ट्रेनसह भारतात दाखल झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेल्या चार प्रवाशांसोबत या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भारतात एंट्री केली आहे. याआधीच ब्रिटेनमधून आढळलेल्या स्ट्रेनने भारताची डोकेदुखी वाढवली होती. त्यापाठोपाठच आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून आढळलेल्या स्ट्रेनमुळे भारताची चिंता आणखी वाढली आहे. (Two more covid 19 variant’s found from south africa and brazil says ICMR chief)

भारतात परतलेल्या चार दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांपैकी एक व्यक्ती हा अंगोला, एक व्यक्ती तांझानिया आणि दोन व्यक्ती या दक्षिण आफ्रिकेतील आहेत. या व्यक्ती जानेवारीत भारतात दाखल झाल्याची माहिती इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे. यापैकी सर्व प्रवाशांसोबत संपर्क झाला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे आयसीएमआरमार्फत स्पष्ट करण्यात आले. त्यांचे नमुने घेण्यात आले असून त्या प्रत्येक व्यक्तीला आयसोलेट केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या नमुन्यांवर पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. एकट्या युकेमधून भारतात आतापर्यंत नव्या स्ट्रेनचे एकुण १८७ कोरोना रूग्ण आढळले आहेत. या सगळ्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली असून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

सध्या भारतात येण्यासाठी दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमधून थेट फ्लाईट्स नाहीत. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय आणि हवाई उड्डाण मंत्रालय हे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या भारतात सुरू असणाऱ्या लसीकरणाच्या मोहीमेत युकेतून आढळलेल्या व्हेरीएंटवर उपचार करण्याची क्षमता आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून आलेल्या व्हेरीएंटवर कोरोना लसीच्या माध्यमातून प्रयोग सुरू असल्याचे आयसीएमआरच्या महासंचालकांनी स्पष्ट केले.


 

First Published on: February 16, 2021 8:59 PM
Exit mobile version