रस्ता बनवण्यासाठी मंत्र्यांच्याच हाती कुदळ-फावडं !

रस्ता बनवण्यासाठी मंत्र्यांच्याच हाती कुदळ-फावडं !

सौजन्य- ANI

उत्तर प्रदेशचे कॅबेनेट मंत्री आणि सहुलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर नुकतेच रस्त्यावर उतरलेले दिसले. रस्ता बनवण्याचे काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे राजभर काहीसे नाराज होते. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी ते स्वत:च हातात कुदळ फावडं घेऊन रस्त्यावर उतरले होते. राजभार यांचा रस्ता बनवतेवेळीचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वसामान्य लोकांमध्ये तसंच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले. राजभार नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र, यानिमित्ताने त्यांचं एक वेगळंच रुप सर्वांसमोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजभार यांच्या म्हणण्यानुसार, संबधित रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि पुर्ननिर्मीतीचे काम करण्यासाठी त्यांनी संबधित विभागाला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या बेपरवेशीर वागणुकीमुळे राजभार नाराज झाले. ”जे अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेले आदेश पाळत नाहीत ते सामान्य लोकांचं काय ऐकणार?”, असं वक्तव्य करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अखेर स्वत:च कुदळ-फावडं घेऊन रस्त्यावर उतरत राजभार यांनी रस्त्याचे काम सुरु केले.

‘तो’ रस्ता का इतका महत्वाचा?

रविवार २४ जून रोजी ओमप्रकाश राजभार यांच्याकडे महाभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. ओमप्रकाश यांचे सुपुत्र अरविंद राजभार याचं २१ जून रोजी लग्न झालं होतं. त्याचनिमित्ताने या महाभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाभोजनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते तसंच अन्य वरिष्ठ अधिकारी मिळून जवळपास १० हजार पाहुणे येणं अपेक्षित होतं. समारंभासाठी येणारे सर्व निमंत्रीत याच नादुरुस्त रस्त्यावरुन येणार होते. त्यामुळे शनिवारपर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश राजभार यांनी दिले होते. मात्र, अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे ते स्वत:च रस्त्यावर उतरले.

First Published on: June 24, 2018 4:23 PM
Exit mobile version