…तर असदुद्दीन ओवैसी प्रभू श्री राम नामाचा जप करतील, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

…तर असदुद्दीन ओवैसी प्रभू श्री राम नामाचा जप करतील, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेशात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी जोमाने मैदानात उतरले आहेत. उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी मोर्चा बांधणी सुरु केली असून जाहीर सभा, मेळाव्यांचा सपाटा लावला आहे. या सभेच्या भाषणांमधून राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तरप्रदेशात भाजपाकडून अनेक विकासकामांचा शुभारंभ केला जात असून केंद्रीय मंत्र्याकडून सभांचे आयोजन केले जातेय. अशाच एक सभेत योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्याचे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. या मंत्र्याने खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

“आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा सत्तेवर आले तर AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हिंदूंचा पवित्र धागा जानवं परिधान करून श्री प्रभु राम नामाचा जप करतील,” असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे पंचायत राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी यांनी रविवारी केले आहे. “राज्यात भाजपाची विचारधारा बळकट होत असताना ओवैसी हे जानवं घालणाऱ्या राहुल गांधी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत बसतील,” असे मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी म्हणाले.

यावर भूपेंद्र सिंह पुढे म्हणाले की, आम्ही आमचा अजेंडा पुढे नेतोय. या अजेंड्यामुळे अखिलेश यादव यांनी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यास सुरुवात केली. या अजेंडामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जानवं परिधान करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे गोत्र सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. हाच आमच्या विचारधारेचा प्रभाव आहे. ज्यामुळे लोकांनी आपले अजेंडा सोडत आमचे अनुकरण करण्यास सुरुवात केली, असं ते म्हणाले.

“जे लोक लोकांची विभागणी करण्यात व्यस्त होते आणि अल्पसंख्याकांबद्दल बोलत होते. ज्यांना प्रभू रामांचे अस्तित्व मान्य नव्हते त्यांनी राम ही काल्पनिक व्यक्तिरेखा असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. ती लोकं आता जानवं परिधान करत मंदिरांना भेट देतायत” असा दावा त्यांनी केलाय.

यावर ओवैसींनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “जनतेला नेमकं झालं काय आहे? कुणी हास्यास्पद विधान केले तर त्यावर माझी प्रतिक्रिया का हवी? मला अशा हास्यस्पद विधानांवर भाष्य करायचे नाही.”

ओवेसी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत १०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ओवेसी मुस्लिमांना एक राजकीय शक्ती म्हणून विकसित करण्यासाठी स्वतःचे नेतृत्व तयार करण्यास सांगत आहेत.


संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी केले आंदोलन


First Published on: December 27, 2021 3:39 PM
Exit mobile version