नाराज वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार? त्या पोस्टरवरुन चर्चांना उधाण

नाराज वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार? त्या पोस्टरवरुन चर्चांना उधाण

भाजपने नव्याने राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यातून खासदार वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून आता तर्कवितर्क लावले असून वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये त्यांच्या ‘स्वागता’चे पोस्टर लावल्याने ही चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, या चर्चांवर वरुण गांधी यांनी प्रतिक्रिय दिली आहे. संपूर्ण प्रकरणावर त्यांनी तीन शब्दांत भाष्य केलं आहे. ‘या सर्व अफवा’ आहेत, असं वरुण गांधी म्हणाले. खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूरमधील हिंसाचारानंतर एकापाठोपाठ एक ट्वीट करून आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. पक्षाचे नियम न पाळल्याने आणि परस्परविरोधी वक्तव्ये केल्याने वरुण गांधी लवकरच भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. यासोबतच ते काँग्रेसमध्ये जात असल्याची अफवा पसरली होती. पण आता वरुण गांधींनी प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

वरुण गांधी, मनेका गांधींकडे भाजपचं दुर्लक्ष

वरुण गांधी आणि आई मनेका गांधी यांच्याकडे पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. यामुळे ते पक्षाच्या भूमिकेच्यापलिकडे जाऊन वक्तव्य करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी वरुण गांधी यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसंच, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीत वरुण गांधींना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, यामुळे वरुण गांधी नाराज असल्याचं बोललं जात आहे.

 

First Published on: October 14, 2021 1:56 PM
Exit mobile version