विजय माल्ल्याच्या अलिशान विमानाचा पुन्हा लिलाव

विजय माल्ल्याच्या अलिशान विमानाचा पुन्हा लिलाव

A-319

भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा जुना लावून फरार असलेल्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त केल्यानंतर त्या संपत्तीचा लिलाव करून पैसे वसुल करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणांकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजय मल्ल्याच्या अलिशान A-३१९ या विमानाचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. यापूर्वी विमानाचा लिलाव पुकारण्यात आला होता. पण, योग्य असा खरेदीदार न मिळाल्याने विमान मुंबई विमानतळावर उभे आहे. साधारण ९ ते १० कोटी रूपयाला या विमानाचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. शिवाय खरेदीदाराला २८ टक्के जीएसटी देखील भरावा लागणार आहे.

डिसेंबर २०१३ साली विजय मल्ल्याचे अालिशान विमान आयकर विभागाने जप्त केले. २०१३ पासून या विमानाला अद्याप तरी अपेक्षित असा खरेदीदार मिळालेला नाही. त्यामुळे २९ आणि ३० जुन रोजी विमानाचा पुन्हा ऑनलाईन लिलाव करण्याचे आदेश कर्नाटक न्यायालयाने दिले आहेत.

कसे आहे अलिशान विमान?

विजय मल्ल्याची शान म्हणून A-३१९ या विमानाकडे पाहिले जायचे. पण बँकांचे कर्ज फेडण्याची लायकी नसल्याने विजय मल्ल्याने भारतातून पळ काढला. त्यानंतर त्याची देशातील संपत्ती जप्त करण्याचा सपाटा बँक आणि आयकर विभागाने सुरू केला. यावेळी आयकर विभागाने त्याचे विमान देखील जप्त केले. २५ प्रवाशांसह ६ क्रू मेंबरला वाहून नेण्याची विमानाची क्षमता आहे. विमानामध्ये बेडरूम, बाथरूम, बार आणि कॉन्फरन्स रूमचा समावेश आहे. भारतातून पळ काढल्यानंतर विजय मल्ल्याचे हे विमान सध्या मुंबई विमातळावरच उभे आहे.

विमानाच्या देखभालीसाठी आणि पार्किंगसाठी तासाला १५ हजारांचा खर्च येतो. आत्तापर्यत विमानाच्या देखभालीसाठी १० कोटी खर्च आला आहे. मुंबई विमानतळावर A-३१९ ने ६ हजार क्युबिक फूट ऐवढी जागा व्यापली आहे. मुंबईसारख्या सर्वात व्यस्त विमानतळावर विमानाने विनाकारण जागा व्यापने योग्य नसल्याचे मत एका खासगी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. A-३१९ विमान उड्डाणासाठी तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसल्याचेही मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. शिवाय भंगारात काढल्यास या विमानाचे वजन हे १० टन भरेल, अशी माहिती देखील या अधिकाऱ्याने दिली आहे.

विजय माल्ल्याच्या हस्तांतरासाठी भारताचे प्रयत्न

कर्जबुडवा विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये राहत आहे. त्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकार इंग्लंड सरकारशी बोलणी करत आहे. शिवाय ईडी आणि सीबीआय देखील विजय मल्ल्याच्या विरोधात चौकशी करून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.

First Published on: June 15, 2018 10:03 AM
Exit mobile version