नोकरी टिकवायचीय? मग जास्त काम करा, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

नोकरी टिकवायचीय? मग जास्त काम करा, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

नवी दिल्ली – एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) मालकी घेतल्यापासून निरनिराळे नियम कर्मचाऱ्यांवर लादले. आता त्यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. नोकरी वाचवायची असेल तर जास्त वेळ काम करायचे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – कोणताही सीईओ कायद्यापेक्षा मोठा नाही, नियामक मंडळाची एलॉन मस्कला तंबी

एलॉन मस्क यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे. या मेलमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना इशारा वजा सूचना केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीत राहायचे असेल त्यांनी या ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर होयवर क्लिक करा. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत (युरोपिअन वेळ) कर्मचाऱ्यांना वेळ देण्यात आला आहे. या वेळेत कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर न दिल्यास त्यांनी तीन महिन्यांची नोटीस देण्यात येणार आहे. तसंच, ट्विटरला यशस्वी केल्याबद्दल एलॉन मस्क यांनी आभारही व्यक्त केले आहेत.

ट्विटर २.० तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. यशासाठी दीर्घकाळ काम आणि उच्च कार्यक्षमता दाखवावी लागणार आहे, असं एलॉन मस्कने आपल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

हेही – नोकरीचा पहिला दिवस आनंदाचा अन् दुसरा दिवस अखेरचा; METAच्या कर्मचाऱ्याची भावनिक पोस्ट

एलॉन मस्क यांनी कंपनीचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ट्विटरच्या टेक्निकल धोरणातच नव्हे तर मानव संसाधन, व्यवसाय, या सर्व विभागात त्यांनी हस्तक्षेप करत अनेक बदल घडवून आणले आहेत. ब्लू टीकसाठी पैसे मोजणे असो वा ठराविक व्यक्तींना ऑफिशिअल लेबल देणं असो, ट्विटरने गेल्या काही दिवसांत बदल केले आहेत. तर, पहिल्या फळीतील तब्बल ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना एलॉन मस्क यांनी कामावरून काढून टाकले आहे. तर, ट्विटरमधील ९० टक्के भारतीयांनाही त्यांनी नारळ दिला आहे.

ट्विटर प्रचंड तोट्यात आहे असं सांगण्यात येतंय. त्यामुळे कर्मचार्यांना काढण्याशिवाय पर्याय नाही, असं एलॉन मस्कने म्हटलंय. त्यामुळे त्यांनी ट्विटरच्या ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे. तेव्हापासून अनेक फेक अकाऊंट्स सुरू झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे एकीकडे एलॉन मस्क ट्विटरच्या धोरणात बदल करायला जात असताना कंपनीविरोधातच जगभरात वातावरणा निर्माण होत असल्याचं चित्र तयार झालं आहे.

First Published on: November 17, 2022 3:31 PM
Exit mobile version