पाण्याचा सर्वाधिक उपसा भारतातच , नासाचा अहवाल

पाण्याचा सर्वाधिक उपसा भारतातच , नासाचा अहवाल

(फोटो प्रातिनिधीक आहे)

गहू आणि तांदूळ पिकांसाठी पाण्याचा वापर अधिक

पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. मात्र, जगभरात भारतातच पाण्याचा सर्वाधिक उपसा केला जातो. हे धक्कादायक सत्य नासाच्या एका अहवालातून समोर आले आहे. हा पाण्याचा उपसाच घातक ठरत असून देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१४ वर्षांपासून होतोय पृथ्वीचा अभ्यास

नासाच्या अर्थ ऑब्जर्व्हिंग सॅटेलाईटने हा अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला आहे. गेल्या १४ वर्षांपासून नासाचे सॅटेलाईट पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करत आहे. हवामान बदल, त्याचा होणारा परिणाम, जलस्त्रोत या सगळ्याचा अभ्यास करत असताना पहिल्यांदाच नासाने ‘पाण्याचा उपसा’वरील अहवाल ‘जनरल नेचर’मध्ये सादर केला आहे. भारताच्या उत्तर, पूर्व आणि मध्य भागात हा पाण्याचा उपसा होत असून गहू आणि तांदूळ या पिकांसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या राज्यांमध्ये होतो पाण्याचा अधिक उपसा

भारताच्या उत्तर भागात गहू पिकवणारी पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार ही राज्य आहेत. पूर्व भागातील बंगाल, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओरिसा, झारखंड तर मध्य भागातील महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

गहू आणि तांदळाचे पीक अधिक होते. त्यामुळे या ठिकाणी अधिक पाणी वापरले जाते, असे नासाने अहवालात नमूद केले आहे.

३४ देशांमध्ये भारत सर्वाधिक पाणी पितो

पाण्याच्या पातळीचा अभ्यास करताना नासाने एकूण ३४ देशांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून जगभरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी होतो, हे नमूद केले आहे. हा अभ्यास करताना जगभरातील पाण्याचा स्त्रोतांवर नासाचे लक्ष असून पाण्याची पातळी अनेक देशांमध्ये दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे.

पृथ्वी कोरडी होतेय!
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पाण्याचा साठा अनेक ठिकाणी वाढला आहे. कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया या देशांचा यात समावेश आहे. मात्र पाण्याचा उपसा त्यामानाने जास्त असल्यामुळे पाण्याची पातळी म्हणावी इतकी वाढलेली नाही. तसेच जगभरात विखुरलेल्या पाणथळ जागा आता कोरड्या व्हायला लागल्या असून कोरड्या जागा अतिकोरड्या होऊ लागल्या असल्याचे देखील नासाने या अहवालात नमूद केले आहे.

First Published on: May 21, 2018 5:26 AM
Exit mobile version