भारतात बनावट लसी सापडल्याने WHO चा केंद्राला इशारा

भारतात बनावट लसी सापडल्याने WHO चा केंद्राला इशारा

केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारला एक अलर्ट जारी करत कोरोना विरोधी लस प्रमाणित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. देशव्यापी कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गतच या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या टीमने कोलकाता येथून बनावट कोविशिल्डच्या कुप्या हस्तगत केल्यानंतर हा इशारा केंद्राकडून देण्यात आला आहे. केंद्राकडून सर्व राज्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी लसीला असलेले लेबल तपासावे असे आदेश दिले आहेत. त्यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक V यासारख्या लसींचा समावेश आहे. लसीच्या कुपी या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे तपासण्यासाठीच्या सूचना पत्रातून देण्यात आल्या आहेत. (WHO alert for indian health ministry after counterfeit Covishield vials found in kolkata)

अगनानी यांनी राज्य सरकारला सर्व माहिती ही केंद्राच्या लसीकरण मोहिमेतील व्यवस्थापक आणि सेवा पुरवठादारांना देण्यास सांगितली आहे. सेवा पुरवठादारांकडून तसेच निरीक्षणासाठी असणाऱ्या टीमकडून कोरोना विरोधी लसीकरणाची माहिती ही वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे बनावट लसीच्या वापराला आळा बसेल असेही अगनानी यांनी स्पष्ट केले आहे.

लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्डचे लेबल आणि एल्युमिनिअम फ्लिप ऑफ सिल हे गडद हिरव्या रंगाचे (Pantone 355C) असे असेल. तसेच ट्रेड मार्क हा COVISHIELD असेल. तर जेनेरिक नाव हे बोल्ड अक्षरात नसेल. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा लोगो हा विशिष्ट एंगलमध्ये प्रिंट केलेला असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोवॅक्सिनच्या बाबतीत यूव्ही हेलिक्स लेबलचा वापर करण्यात आला आहे. हे लेबल अल्ट्राव्हायलेट लाईटमध्येच दिसू शकेल. या लसीच्या आवरणाला ग्रीन फॉईल इफेक्टही दिला आहे.

तर स्पुटनिक V लसीच्या बाबतीत ही उत्पादने दोन परदेशी पुरवठादारांकडून आयात करण्यात येत आहेत. रशियातून येणाऱ्या या लीसासाठी दोन विशिष्ट प्रकारची अशी लेबल्स आहेत. त्यासाठी माहिती आणि डिझाईन एकसारखीच असेल फक्त उत्पादनकर्ता कंपनी वेगळी असेल. या लसीच्या बॉक्ससाठी इंग्रजी अक्षरांचा वापर करण्यात आला आहे. तर उर्वरीत सर्व माहिती ही रशियन लिपितील आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मालविय यांनीही याआधीच स्पष्ट केले आहे की, सरकारने याआधीच कोविशिल्डच्या बनावट लसींचा शोध सुरू केला आहे. देशात अनेक ठिकाणी कोविशिल्डच्या लसींची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळेच सरकारकडून बनावट लसी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला हॉस्पिटलमध्ये, क्लिनिक तसेच आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणखी वाढवण्याच्या सूचना केली आहे. त्यासोबतच घाऊक विक्रेते, वितरक, फार्मसी आणि वैद्यकीय उत्पादनांचे पुरवठादार यांच्याकडूनही मिळणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीतही निरीक्षणासाठीची तपासणी यंत्रणा वाढवण्याची आणखी गरज असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


हे ही वाचा – कोरोनाच्या आणखी एका व्हेरियंटने वाढवली जगाची डोकेदुखी, लस ठरतेय निष्प्रभ-WHO


 

First Published on: September 6, 2021 10:11 AM
Exit mobile version