कॉलेजमध्ये मोबाईलवर बंदी; उ. प्रदेश सरकारचा मोठा निर्णय!

कॉलेजमध्ये मोबाईलवर बंदी; उ. प्रदेश सरकारचा मोठा निर्णय!

मोबाईलवर चिकटलेली तरूण पिढी आणि तिच्यावर टीका करणारी जुनी पिढी, असं चित्र आपल्याकडे आता नेहमीचं झालं आहे. मात्र, हेच चित्र बदलण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून उत्तर प्रदेशमधील सर्व विदयापीठ आणि सर्व कॉलेजमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही बंदी विद्यार्थ्यांसोबतच या कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांवर देखील घालण्यात आली आहे. विद्यापीठ आणि कॉलेजमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या बंदीवर राज्यातून आणि देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विद्यार्थी-शिक्षकांचा मोबाईलमुळे वेळ वाया!

यासंदर्भात उत्तर प्रदेशमधील उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ही बंदी लागू असेल. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये उत्तर शिक्षणविषयक वातावरण निर्माण होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर आणि प्राध्यापकांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत असल्याचं निरीक्षण देखील विभागाकडून नोंदवण्यात आलं आहे.

मंत्र्यांना देखील मोबाईल बंदी!

याआधी देखील योगी आदित्यनाथ सरकारने अशाच प्रकारे मंत्रिमंडळ बैठक किंवा कोणत्याही सरकारी बैठकीमध्ये मोबाईल बंदी जाहीर केली आहे. काही मंत्री सरकारी बैठकीवेळी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता मंत्र्यांसोबतच विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी देखील मोबाईल बंदी जाहीर करण्यात आली आहे.

First Published on: October 18, 2019 7:04 PM
Exit mobile version