UP: सर्व जिल्ह्यांमध्ये दर रविवारी होणार लॉकडाऊन, योगी सरकारचा निर्णय

UP: सर्व जिल्ह्यांमध्ये दर रविवारी होणार लॉकडाऊन, योगी सरकारचा निर्णय

उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

कोरोना विषाणूचा प्रसार देशभर झपाट्याने होत आहे. उत्तर प्रदेशातील कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी योगी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आता दर रविवारी पूर्णतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रविवारी केवळ ग्रामीण आणि शहरी भागात सॅनिटाईझेशन करण्याचं काम केलं जाणार असून फक्त आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. असे असतानाही योगी आदित्यनाथ हे रोज टीम -११ आणि फील्ड अधिकाऱ्यांसह वर्च्युली बैठक घेत आहेत. शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे लोकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री योगी यांनी श्रमिक भरण पोषण योजनेची यादी अद्ययावत करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे लवकरच गरिबांना दिलासा मिळणार असून त्यांना मदत साहित्य पुरविण्यात येणार आहे. यासह आमदार निधीचा वापर कोविड केअर फंडासाठी केला जाईल. राज्यात विनामास्क घराबाहेर फिरताना आढळल्यास प्रथम हजार रुपयांचा दंड आणि दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगींनी असेही सांगितले की, उत्तर प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले पाहिजे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवीन कोविड रुग्णालयेही बांधण्यात आली पाहिजेत. बेड्सची संख्या वाढविण्यात यावी तसेच खासगी रुग्णालयांचे रूपांतर कोव्हिड रुग्णालय म्हणून करण्यात यावे. प्रयागराजमधील बाधितांचा आकडा लक्षात घेता त्यांनी त्वरित कोविड हॉस्पिटल बनवण्याचे निर्देश युनाइटेड मेडिकल कॉलेजला दिले. ५० टक्के रुग्णवाहिका कोरोना रूग्णांसाठी राखीव असाव्यात आणि क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीला कोणतीही अडचण येऊ नये, अशी व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


First Published on: April 16, 2021 2:28 PM
Exit mobile version