रोहितने विचारलं नवीन आणि जुन्या संघात फरक काय?; युवराजने दिलं ‘हे’ उत्तर

रोहितने विचारलं नवीन आणि जुन्या संघात फरक काय?; युवराजने दिलं ‘हे’ उत्तर

देशात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच खेळाडू सोशल मिडीयावर सक्रिय झाले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला. यावेळी रोहित शर्माने युवराज सिंगला सध्याचा संघ आणि त्याच्या काळातील संघ यातील फरक विचारला. यावेळी युवराज सिंगने मोठा खुलासा केला. माजी अष्टपैलू युवराज सिंग म्हणाला की, सध्याच्या भारतीय संघात तीनही प्रकारच्या खेळात विराट कोहली आणि रोहित शर्मा वगळता आता कोणताही रोल मॉडेल नाही आहे. तसंच आता तरुण खेळाडू वरिष्ठ खेळाडूंचा फारसा आदर करत नाहीत. भारतात लॉकडाऊन सुरू आहे. सध्या सर्व खेळाडू त्यांच्या घरी आहेत. यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांच्याशी संवाद साधला होता.

… आमचे वरिष्ठ खूप शिस्तबद्ध होते

रोहितने जेव्हा युवराजला विचारले की टी-२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये जिंकलेल्या संघात आणि सध्याच्या संघात काय फरक आहे? तेव्हा युवराज म्हणाला, “जेव्हा मी किंवा तुम्ही संघात आलात तेव्हा आमचे वरिष्ठ खूप शिस्तबद्ध होते. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता आणि लक्ष विचलित होत नव्हतं. प्रत्येकाला आचरणाची विशेष काळजी घ्यावी लागत होती.” युवराज म्हणाला, ‘आम्ही आमच्या वरिष्ठ खेळाडूंकडे माध्यमात कसे बोलतात आणि इतर सर्व काही पाहत होतो. ते आमचं नेतृत्व करत होते. सर्व काही आम्ही त्यांच्याकडून शिकलो आणि आपल्याला देखील सांगितलं.


हेही वाचा – आयआयएल कंपनी शोधणार कोरोनाची लस; ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत करार

… संघात आणखी रोल मॉडेल नाहीत

यूवराज म्हणाला, ” मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की भारताकडून खेळताना तुमच्या प्रतिमेची विशेष काळजी घ्या. विराट आणि तु संघातील सर्व फॉर्मेट खेळत आहात. मात्र, इतरजण येतात जातात.” युवराज पुढे म्हणाला, “आता संघात रोल मॉडेल्स नाहीत. ज्येष्ठांबद्दलचा आदरही कमी झाला आहे, कोणीही कोणाला काहीही बोलतो.”

दरम्यान, युवराजने २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. युवराज भारताच्या दोन विश्व चँपियन (२००७ मधील टी-20 वर्ल्ड कप आणि २०११ मधील विश्वचषक) संघात सहभागी होता आणि दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने खास ठसा उमटवला. युवराजने ३० कसोटी सामने खेळत १९०० धावा केल्या आहेत. तर ३०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ३०४ सामन्यांमध्ये ८ हजार ७०१ धावा केल्या आहेत.

 

First Published on: April 8, 2020 10:54 AM
Exit mobile version