चिंचवड पोटनिवडणूकही ‘माना’ची!

चिंचवड पोटनिवडणूकही ‘माना’ची!

संपादकीय

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत विधिमंडळाची तिसरी निवडणूक होऊ घातली आहे. पुण्यातील कसबा पेठ येथील भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या या दोन जागांसाठी २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. शुक्रवारी अर्जमाघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या दोन्ही जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढती होणार आहेत. जून अखेरीस ठाकरे सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती, पण त्यावरून राजकारण खूप रंगले. ही जागा शिवसेनेची असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला डावलून भाजपने ही जागा स्वत:कडे घेतली होती. या जागेसाठी त्यांनी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या ऋतुजा लटके होत्या. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले होते. त्यानुसार भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. वस्तुत: राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अंधेरीची पोटनिवडणूक ही खरी लिटमस टेस्ट ठरली असती. भाजपच्या उमेदवारीमुळे भाषिक वादाची झालरही या पोटनिवडणुकीला आली होती. त्यातच रमेश लटके यांचा झोपडपट्टी तसेच बैठ्या चाळींतील प्रभाव लक्षात घेता, भाजपला विजय सोपा नव्हता. अखेर भाजपच्या माघारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही निवडणूक एकहाती जिंकली. त्यानंतर विधान परिषदेच्या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या १० जागांप्रमाणेच उपमुख्यमंत्री फडणवीस याही निवडणुकीत काहीतरी करिष्मा दाखवतील, अशी अपेक्षा होती, मात्र पाच जागांपैकी केवळ एक जागा भाजपच्या गळाला लागली, तर तीन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. नाशिकच्या पाचव्या जागेवरच सर्वांचे लक्ष होते. ती जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती, मात्र डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून ही जागा लढविली आणि जिंकली.

चिंचवड आणि कसबा पेठ या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आता तिसर्‍यांदा शिंदे-फडणवीस महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येत आहेत. अर्थातच, या दोन्ही जागा भाजपकडे होत्या; त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आणि उमेदवार घोषित केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती येथे होईल, असे अपेक्षित होते, मात्र या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले. भाजपनेदेखील अंधेरीचाच हवाला विरोधकांना दिला. राज ठाकरे यांनी यावेळीदेखील पत्रप्रपंच केला, तोही महाविकास आघाडीच्या नावे. त्यातही ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करतानाच ‘रिक्त जागेवर जर दिवंगत आमदाराच्या घरातून उमेदवार उभा न केल्यास मतदारही सहानुभूती दाखवेलच असे नाही,’ अशी मेखही या पत्रात आहे.

विशेष म्हणजे, या सर्व निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरतेच दिसत आहे. तरीही, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले, पण त्याला महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही. आता चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट दिले आहे, तर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीने नाना काटे यांना उमेदवारी दिली असली तरी, ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हेही रिंगणात उतरले असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसेल. तर जगताप कुटुंबातील कथित नाराजीचा परिणाम भाजपच्या मतांवर होऊ शकतो.

कसबा पेठ निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे सांगितले गेले. हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करतानादेखील ते उपस्थित नसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले. आता महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, तर भाजप-शिंदे गट महायुतीकडून हेमंत रासने रिंगणात आहेत, पण यात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे तो ब्राह्मण समाजामुळे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली.

त्यानंतर आता मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने येथील ब्राह्मण समाजाने जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत झळकले होते. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेदेखील या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला बसण्याची जास्त शक्यता आहे. बिनविरोध निवडणूक करण्याचे भाजपचे आवाहन महाविकास आघाडीने धुडकावल्यामुळे कसबापेठ मतदारसंघाप्रमाणेच चिंचवडची निवडणूकदेखील आता ‘माना’ची होणार आहे.

First Published on: February 11, 2023 2:23 AM
Exit mobile version