श्रेष्ठ नाटककार, समीक्षक माधव मनोहर

श्रेष्ठ नाटककार, समीक्षक माधव मनोहर

माधव मनोहर वैद्य उर्फ माधव मनोहर यांचा आज स्मृतिदिन. माधव मनोहर हे मराठी समीक्षक, नाटककार, लेखक होते. त्यांचा जन्म 20 मार्च 1911 रोजी नाशिक याठिकाणी झाला. बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात ते प्राध्यापक झाले आणि तेथूनच निवृत्त झाले. इंग्रजी वाङ्मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ‘चौपाटीवरून’ या सदरात व ‘सोबत’मध्ये ‘पंचम’ या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. ‘नवशक्ती’,‘रत्नाकर, ‘रसरंग’मधूनही त्यांचे समीक्षालेख प्रकाशित होत. त्यांच्या स्वतःच्या साहित्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.

ते वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोन्हीही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. आपल्या पुस्तकांवर सातत्याने टीका होत असली तरी अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांच्या प्रस्तावना माधव मनोहर यांच्याकडून लिहून घेतल्या. माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यामुळे ते साहित्यातील चोर्‍या सहज पकडत. वाङ्मयचौर्य पकडण्याच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना ‘साहित्यातले फौजदार’ म्हणत. माधव मनोहर यांच्यानंतर साहित्याला दिशा दाखवणारा इतका समर्थ टीकाकार मिळणे दुर्मीळ आहे. अशा या श्रेष्ठ समीक्षकाचे १६ मे १९९४ रोजी निधन झाले.

First Published on: May 16, 2023 4:45 AM
Exit mobile version