भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी केली. भारताच्या सर्वांगीण इतिहास संशोधनासाठी आवश्यक ती ऐतिहासिक साधने संग्रहीत करून त्यांचे शास्त्रशुद्ध जतन व प्रदर्शन करणे आणि त्यांसाठी आवश्यक अशा इमारती बांधणे, ही संस्थेची सुरुवातीची उद्दिष्टे होती. पुढे ही साधने आणि भारतीय इतिहास व संस्कृती याविषयीचे संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कामही संस्थेने अंगिकारले.

संस्थेच्या घटनेनुसार मंडळाचा प्रमुख अध्यक्ष असून प्रशासकीय व्यवहार चिटणीसांमार्फत केला जातो. मंडळाचे वार्षिक व आजीव असे एकूण ५५० सभासद होते (१९८२). तेरा सभासदांचे कारभारी मंडळ दर तीन वर्षांनी निवडतात. त्यातून चिटणीसांची निवड होते. विद्यमान तीन चिटणीस असून कार्याध्यक्ष व खजिनदार हे सर्व सभासदांनी प्रत्यक्ष निवडून द्यावयाचे असतात.

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड दर तीन वर्षांनी सर्वसाधारण सभेत होते. सभासदांना ग्रंथालय, पोथीशाळा, दप्तरखाना इत्यादी विभागांत संशोधन करण्याची सुविधा आहे. मंडळाने इतिहासतज्ज्ञांचे अनेक संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. स्वीय मालेतील एकशे पंधरा प्रकाशने असून त्यांपैकी (१) मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १ ते १२ (राजवाडे, वि. का.), (२) ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड १ ते ६ (खरे, ग. ह. कुलकर्णी, गो. त्र्यं.), (३) दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, खंड १ ते ४ (खरे, ग. ह.), (४) फार्सी – मराठी कोश (पटवर्धन, मा. त्रिं.), (५) पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १ ते ४, (६) महाराष्ट्रातील काही प्राचीन ताम्रपट व शिलालेख (दीक्षित, मो. गं.), (७) ताल पेंटिंग्ज (रानडे, उषा चव्हाण, कमल), (८) भागवत पुराण पेंटिंग्ज (माटे, म. श्री. रानडे, उषा) इत्यादी प्रमुख ग्रंथ होत. याशिवाय मंडळाने पुरस्कृत केलेले अनेक ग्रंथ आहेत.

First Published on: July 7, 2022 2:29 AM
Exit mobile version