लव्ह जिहाद, धर्मांतर आणि घरवापसी!

लव्ह जिहाद, धर्मांतर आणि घरवापसी!

अलीकडच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने लव्ह जिहादच्या मुद्यावरून विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांची नावे घ्यायची तर खूप मोठी सूची होईल. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून गरीब हिंदू तसेच आदिवासींना विविध प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील पूर्वांचलातील बराचसा भाग हा ख्रिस्तीबहुल होत आहे. दुसरीकडे हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास आणि त्या धर्माच्या रुढी परंपरांनुसार वागण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यांनी तसे केले नाही तर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. असे सगळे प्रकार थांबविण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा, अशा मागण्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्‍या हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहेत. अगदी अलीकडे घडलेल्या काही हत्याकांडांचा लव्ह जिहादशी संबंध जोडण्यात आला.

त्यातील ठळक उदाहरण सांगितले जात होते ते आफताबने श्रद्धा वालकर या त्याच्या प्रेयसीची केलेली क्रूर हत्या. भारतातील अन्य काही राज्यांनी धर्मांतरविरोधी कायदा केला आहे. त्यामुळे तसा कायदा आता महाराष्ट्रात करण्यात यावा, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेने भारतातील नागरिकांना धर्मस्वातंत्र्य दिले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे कुणी कुठल्या धर्माचे आचरण करावे, कुणी कुणाच्या प्रेमात पडावे, कुणी कुणाशी विवाह करावा यावर कुणी बंधने आणू शकत नाहीत. तरुण-तरुणी कायद्याने निर्धारित केलेल्या वयात असतील, तर त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जोडीदार निवडून विवाह करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. अगदी त्यांचे जन्मदाते आईवडीलही रोखू शकत नाहीत. कारण त्यांनी तो विवाह स्वखुशीने केलेला असतो.

भारत बिटिशांच्या राजवटीतून १९४७ साली मुक्त झाल्यानंतर जी राज्यघटना तयार करण्यात आली तिचे स्वरूप धर्मनिरपेक्ष असे ठेवण्यात आले. खरेतर त्यावेळी हा देश हिंदूबहुल होता आणि आजही आहे. त्यामुळे राज्यघटना हिंदूधार्जिनी बनवता आली असती, पण तसे करण्यात आले नाही. भारतापासून वेगळे होऊन तयार झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यामुळे त्यांची राज्यघटना ही मुस्लिमांना अधिक पोषक असणार हे ओघाने आले. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये मुस्लीम धर्मीय सोडले तर अन्य धर्मीय कुणी फारसे शासन आणि प्रशासनामध्ये महत्त्वाच्या पदावर दिसत नाहीत. काही वेळा तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याच्या घटना प्रसारमाध्यमांवरून कळत असतात. असे असताना बांगलादेशातील अनेक लोक पोटापाण्यासाठी घुसखोरी करून भारतात येतात आणि पडेल ती कामे करतात. बांगलादेश आणि पाकिस्तान यांनी स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले असले तरी त्यांच्या निर्मितीपासूनचा प्रवास पाहिला तर त्यांनी फार मोठी प्रगती केलेली आहे असे काही दिसत नाही. आजही पाकिस्तान आणि बांगलादेशातील राज्यकर्ते भारताचा उल्लेख हिंदुस्तान असाच करतात, पण पाकिस्तान हे लक्षात घेत नाही की पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम लोकांची संख्या भारतात आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतांश काळ काँग्रेसची सत्ता केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये होती. भारतामध्ये विविध जातीधर्माचे लोक राहत असल्यामुळे ते गुण्यागोविंदाने राहावेत यासाठी देश हिंदूबहुल असला तरी काँग्रेसकडून केवळ हिंदूंच्या हिताला पोषक ठरतील असे निर्णय घेण्यात आले नाहीत, पण पुढे हा सर्वधर्मसमभाव विशिष्ट समाजगटांची वर्षानुवर्षे एकगठ्ठा मते मिळवण्याकडे जाऊ लागला. त्यात प्रामुख्याने मुस्लीम, ख्रिस्ती आणि दलित समाज गट होते. लोकशाहीमध्ये मतांची बेरीज ही फार महत्त्वाची असते. त्या आधारेच सत्तेचा सोपान चढता येतो. त्यामुळे ज्यांना अल्पसंख्याक म्हटले जाते, त्यांचे लांगुलचालन केले जाते. ते दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते. ते अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना आपण जपले पाहिजे, त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, असा बहुसंख्याकांवर दबाव आणला जातो. त्यातूनच मग बहुसंख्याकांच्या भावनांची उपेक्षा केली जाते. त्यांना गृहीत धरण्यात येते. काँग्रेसने वेळोवेळी मुस्लिमांना आपल्यात सामावून घेण्यासाठी स्वत:ला तसे वळवले.

हम सब हिंदी हैं, यावरून हम सब भारतीय हैं, असे करण्यात आले. म्हणजे जिथे हिंदू किंवा हिंदी असेल ते दूर करण्यात आले. त्यात पुन्हा भारतात हिंदू बहुसंख्य असले तरी ते विविध जातींमध्ये विभागले गेले आहेत. त्यात पुन्हा सवर्ण आणि मागास असा भेद आहे. ब्राम्हण ब्राम्हणेतर असा भेद आहे. त्यात पुन्हा ब्राम्हणांमध्ये विविध भेद आहेत. जहालवादी, मवाळवादी अशा विचारसरणी आहेत. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी हे हिंदूच होते, पण त्यांची विचारसरणी वेगळी होती. त्यामुळे भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या असली तरी त्यांच्यामध्ये एकसंधता नव्हती. खरेतर त्यामुळे मूठभर आक्रमकांपुढे भारत बरेचदा पराभूत झाला. जेव्हा अलेक्झांडरने भारतावर हल्ला केला, तेव्हा त्याने पुरूला कैद केले, पण त्याच्या मदतीला शेजारचा हिंदू राजा अंभी धावून गेला नाही. एकसंधतेच्या अभावामुळे भारताला अनेक वर्षे परकीयांच्या गुलामीत राहावे लागले. मुस्लीम आक्रमक भारतात येऊन त्यांनी इथेच आपले बस्तान बसवले. बाहेरून आलेल्या या आक्रमकांकडे मोठे संख्याबळ नव्हते, पण इथल्या दुहीचा त्यांना फायदा मिळत गेला. त्यामुळे त्यांनी धर्मांतराचा मार्ग निवडला. आपल्याला मानणारा मोठा समुदाय हवा असल्यामुळे त्यांनी काही वेळा प्रलोभने दाखवून तर बरेचदा सक्तीने धर्मांतर घडवून आणले.

काही वेळा धर्मांतर हा इथल्या दलित, पतितांचा, पिचलेल्या, गांजलेल्या, जातीच्या नावाने कायम अपमान आणि अवहेलना सहन करायला लागणार्‍यांसाठी सुटकेचा मार्ग ठरलेला आहे. त्यामुळेही अशा अनेक हिंदूंनी मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. अगदी अलीकडचे उदाहरण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक दलित अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारल्याचे आहे. हिंदू धर्माचा त्याग करावा आणि दुसर्‍या धर्माचा स्वीकार करावा असे का वाटते, याचा हिंदू धर्मातील धर्माचार्यांनी कधी बारकाईने विचार केल्याचे दिसत नाही. कारण इतिहासाचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येईल की इतर धर्मातील लोक हिंदूंना आपल्या धर्मात घेऊन धर्मांतरित करत होते, पण त्या धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यास हिंदू लोक तयार नव्हते. कारण तशी शास्त्रांज्ञा नाही, हे धर्माचार्यांचे उत्तर होते. हिंदू धर्मांच्या ताठर भूमिकेमुळेच एकेकाळी स्वत: हिंदू क्षत्रिय असलेल्या सिद्धार्थ गौतम यांना वेगळ्या बौद्ध धर्माची स्थापना करावी लागली होती. त्यावेळी तोही हिंदू धर्मातील पिचलेल्या, गांजलेल्यांसाठी सुटकेचा मार्ग होता.

भारतीय उपखंडाचा विचार केला म्हणजे त्यात पाकिस्तान आणि बांगलादेश तसेच बाजूचे अन्य काही देशही येतात. या भागावर राहणारे लोक हे हिंदू होते, पण पुढे जशी मुस्लिमांची आक्रमणे झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक बटले गेले. जेव्हा ते पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी हातापाया पडले तेव्हा त्यांच्यासाठी प्रवेशाची दारे बंद करण्यात आली. अनेक हिंदू संघटना आज असे म्हणत आहेत की, अनेक ख्रिस्ती मिशनरींनी मागास भागामध्ये आदिवासींकडे जाऊन त्यांना जेवण आणि आरोग्य सेवा दिल्या. सेवेच्या माध्यमातून त्यांचे धर्मांतर केले, पण आपल्या या मागास बंधूभगिनींसाठी आपण काय केले, असा प्रश्न स्वत:ला विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर आपल्याला मिळणार नाही. आजही कितीतरी गावांमध्ये सार्वजनिक विहिरींवर मागासवर्गीयांना पाणी भरण्याची परवानगी नाही.

हिंदू संघटना आज रस्त्यावर उतरून आपल्यावर धार्मिक अन्याय होत आहे, त्याला प्रतिबंध करणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणी करत आहेत, पण त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घरवापसीचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जे पूर्वी जोरजबरदस्तीने दुसर्‍या धर्मात गेले आहेत, त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात यावे. त्यावर इतर धर्मियांकडून भगवीकरणाचा आरोप करून विरोध होत आहे. त्यांचे म्हणणे असे काही की आम्हाला पुन्हा पिळवणूक आणि अवमान नको. हिंदू संघटना आज हिंदू धर्मावर होत असलेल्या धार्मिक आक्रमणाबद्दल आवाज उठवत आहेत, पण त्याचबरोबर आपले काय चुकले, त्यामुळे एकेकाळी आपल्याच धर्मात असलेली माणसे आपल्यापासून का दुरावली याचाही त्यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण कायदा हा दुधारी असतो. त्याची एक धार समोरच्या, तर दुसरी आपल्या बाजूने आहे हे लक्षात ठेवायला हवे.

First Published on: January 25, 2023 10:29 PM
Exit mobile version