दुश्मनी लाख सही, खत्म न कीजे रिश्ता

दुश्मनी लाख सही, खत्म न कीजे रिश्ता

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात लढले. एकमेकांवर टीकादेखील केली. बाळासाहेब ठाकरेंच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, ‘आमच्यात वैर आहे पण हाडवैर नाही,’ असं जाहीर सभेत सांगण्याचं धाडस आजचा एकही नेता करू शकेल का? गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे दोन्ही नेते सभागृहात एकमेकांविरोधात बोलताना दिसत. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जात. मुंडे आणि देशमुख यांचे विधानसभा मतदारसंघ हे शेजारी-शेजारी होते. त्यामुळे हे दोघे विरोधात असूनही एकमेकांना कसे सहकार्य करत हेही उघड गुपित होते. आज विरोधी पक्षाचे दोन नेते एकत्र चालताना दिसले तरी सर्वांच्या भुवया उंचावतात. याला कारणही हे नेतेच आहेत. सभा, संमेलन, पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांवर वैयक्तिक आरोप करताना समोरची व्यक्ती शत्रूच आहे अशा स्वरूपाची टीका टिप्पणी त्यांच्याकडून होत आहे. कोणताही आरोप हा खेळकरपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून घेतला जात नाही.

उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून ठाण्यात मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर ठाकरेंनी सपत्नीक रोशनी यांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत या घटनेचा गृहमंत्र्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूस गृहमंत्री’ म्हटल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातून त्यांच्यावर चहूबाजूंनी वार-प्रहार करण्यास सुरुवात झाली. या टीकेची पातळी एवढी खाली घसरली की मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ‘उद्ध्वस्त’ आणि ‘उद्धट’ ठाकरे अजून त्यांना म्हटले नाही म्हणत, जे म्हणायचं ते म्हणून घेतलं आहे. फडणवीसांनीही ‘मैं फडतूस नही काडतूस हूँ, झुकेगा नही, घुसेगा’ अशी डायलॉगबाजी करून भाजपचे पार्टी विथ डिफरन्स आता असे काही राहिले नाही हेच जाहीर करून टाकले. आतापर्यंत पक्षातील दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील नेते, कार्यकर्ते हे अर्वाच्च आणि शिवराळ भाषेत बोलताना दिसत होते.

आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच पातळी सोडल्याने कोणी कोणाला सांभाळायचे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. फडतूस शब्दावरून सुरू झालेला हा भाषेचा बाजार सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणखी आरोळ्या ठोकत अधिकच प्रदूषित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना महाफडतूस म्हटले आहे. यात कडी केली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी भाषेची आणि साधनशुचितेची ऐसीतैशी करून ठेवली. उद्धव ठाकरेंना घरकोंबडा, यांच्या रक्तात खोट आहे, असे गलिच्छ आरोप बावनकुळेंकडून करण्यात आले. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील सभेत समाचार घेतला होता. तुमची १५२ कुळं आली तरी शिवसेनेला आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही, असा टोमणा ठाकरेंनी त्यांना लगावला होता. त्याचेच उट्टे फडणवीसांच्या निमित्ताने बावनकुळेंनी काढले की काय अशी शंका यावी असा त्यांचा आविर्भाव आणि भाषा होती.

शिवसेना पक्ष फोडून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हापासून शिंदे आणि ठाकरे यांच्यात वैयक्तिक वार-पलटवार सुरू आहेत. ठाकरेंकडून खासदार संजय राऊत हे नित्यनियमाने फुटीर गटाला टार्गेट करत असतात, तर त्यांना शिंदे गटातील बुलढाण्याचे संजय गायकवाड, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, मंत्री अब्दुल सत्तार हेदेखील त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. शिंदे गटावर खोक्याचा, गद्दारीचा आरोप ठाकरे गटाकडून होतो. त्याला उत्तर देताना या नेत्यांची भाषा शिवराळ होते. अब्दुल सत्तार यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पातळी सोडून टीका केली. संजय शिरसाट यांनीही सुषमा अंधारेंबद्दल भर सभेत अपशब्दांचा वापर केला. याची तक्रारही अद्याप महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये नोंदवून घेण्यात आलेली नाही, हेही विशेष.

बाळासाहेब ठाकरे असताना छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी लखोबा लोखंडे, खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ असे म्हणून त्यांचा समाचार घेतला होता. राणेंचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या चालण्या बोलण्यावर व्यंगात्मक टिप्पणी बाळासाहेब शेवटपर्यंत करत राहिले. शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यानंतर त्यांच्याकडून अशा शिवराळ भाषेची महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. जी भाषा ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणात वापरली जात होती, तीच भाषा नंतर मुंबई आणि इतर महानगरांच्या निवडणुकीच्या निमित्ताने वापरली जाऊ लागली आणि वरून खाली झिरपली. आणखी मागे गेल्यास आपल्याला आचार्य अत्रे यांची भाषणेही अशाच पद्धतीची असल्याची आढळतील. अत्रेंच्या भाषणाला होणारी गर्दी ही त्यांची विनोदी, उपरोधिक टीका आणि शिवराळ भाषा ऐकण्यासाठीच होत होती, मात्र आचार्य अत्रेंच्या टीकेला तेव्हाचे काँग्रेसी नेते हे कोणतेही प्रत्युत्तर देत नव्हते. ते त्यांची मर्यादा पाळून होते.

आवत गारी एक है, उलटत होइ अनेक,
कह कबीर नहिं उलटिए, वही एक की एक!!

कबीराच्या या दोह्याप्रमाणे तेव्हाचे राजकारणी समोरून होत असलेल्या टीकेला टीकेने प्रत्युत्तर देत नव्हते. साधनशुचिता पाळली जात होती. ग्रामीण भागातील निवडणुकीत मात्र कमरेखालचे वार हे होत होते. शिवसेनेच्या उदयानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रातून आणि जाहीर सभांमधून ही भाषा राजरोसपणे वापरायला सुरुवात केली.

ती ठाकरी भाषा म्हणून गौरवली गेली आणि त्यावर पलटवार कोणी फारसा केला नाही. तेव्हाचे सामाजिक वातावरणही त्याला जबाबदार आहे. त्या काळात ग्रामीण भागात वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य होत होते. त्यातून अशा प्रकारचे विनोद आणि टिंगलटवाळी केली जात होती. ती लोकांच्या अंगवळणी पडलेली होती.

राजकारणात प्रश्न आणि मुद्यांची जागा मसल आणि मनी पॉवरने घेतल्यापासून हे प्रकार वाढले आहेत. यामुळे भाषेचा स्तर किती खाली जात आहे याचा विचार न करता त्यामुळे प्रसिद्धी किती मिळत आहे याचाच अधिक विचार होत आहे. ही अतिशयोक्ती नसून आजच्या राजकारणाचे हेच वास्तव आहे. यामुळेच मूळ मुद्यांना बगल देऊन दिवसभर मीडियात चर्वण होत राहील आणि रात्री प्राईम टाईमला चर्चेत राहील अशी विधानेच जाणीवपूर्वक होत आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.

एकमेकांवरील आरोपांवरून एवढे आक्रमक होणारे राजकीय नेते जनतेच्या प्रश्नांवर मात्र ढिम्म दिसतात. मंत्रालयाच्या दारात येऊन तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या महिलेने मंत्रालयात येऊन आत्महत्या करणे म्हणजे किती पातळीवर तिच्या पदरी निराशा आली असेल याचा विचार सत्ताधारी आणि विरोधकही करणार आहेत की नाही? राज्यातील उद्योगात वाढ होत नाही, पर्यायाने रोजगार वाढत नाही. महागाई नवनवे उच्चांक गाठत आहे. उज्ज्वला सिलिंडर गरिबांच्या घरातून केव्हाच हद्दपार झाले आहेत. दिवसाढवळ्या कोयते घेऊन लोक रस्त्यावर येत आहेत. विरोधी पक्षनेत्याने दंगलीचे संकेत असल्याची सूचना देऊनही संवेदनशील शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखली जात नाही. याकडे सत्ताधारी पक्षाची सपशेल डोळेझाक होताना दिसत आहे. यावरून कोणी प्रश्न विचारला की त्याच्यावर वैयक्तिक आरोप आणि टिप्पणी करणे हे सुदृढ लोकशाहीला शोभणारे नाही.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार्‍या या नेत्यांनी महापुरुषांनाही सोडलेले नाही. महापुरुषांच्या अपमानाचीही एक मालिका गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राने पाहिली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप झाला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून विरोधकांनी राळ उठवली होती.

महाराष्ट्र हा कायम सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडे जनता एक समंजस नेतृत्व म्हणून पाहते. देवेंद्र फडणवीस हेदेखील सुसंस्कृत नेते म्हणूनच ओळखले जातात. जरी ते म्हणत असले की मी नागपूरचा आहे, पण ते नागपूरच्या त्या भागातून येतात जिथे भाषेची पातळी खाली घसरू दिली जात नाही. तेव्हा या नेत्यांवरच आता ही जबाबदारी आहे की, राजकीय मतभेद असले तरी मनभेद होणार नाही अशी भाषा वापरली जाईल. हे नेते आज एकमेकांविरोधात उभे आहेत, पण ते उद्या एकत्र येणार नाहीत याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. तेव्हा निदा फाजलींच्या या दोन ओळी या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत.

दुश्मनी लाख सही, खत्म न कीजे रिश्ता
दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिए…

First Published on: April 6, 2023 9:48 PM
Exit mobile version