संजय राऊत यांचे काय चुकले?

संजय राऊत यांचे काय चुकले?

संजय राऊत यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोपवली म्हणजेच साधारणपणे ९१-९२ चा तो काळ असावा, तेव्हापासून सतत कमी अधिक प्रमाणात त्यांचे नाव सातत्याने मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेत राहिले. शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेली आक्रमक भाषाशैली, अरेला कारे करण्याची वृत्ती, लढवय्येपणा आणि राजकीय वर्तुळात दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीपर्यंत असलेला नेत्यांचा सर्वदूर संपर्क यामुळे संजय राऊत हे केवळ संपादक म्हणून पत्रकारितेच्या भूमिकेतच न राहता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते सामनाच्या आणि शिवसेना नेत्याच्या भूमिकेतून कान, नाक, डोळे अर्थात पंचेंद्रिय म्हणून राजकीय वर्तुळात वावरू लागले.

बाळासाहेब ठाकरे हे हयात असेपर्यंत संजय राऊत यांचे ते दैवत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर सहाजिकच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यासाठी दैवत झाले. बाळासाहेब आणि त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला कमालीचा निष्ठावंतपणा ही संजय राऊत यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वांना अंगावर घेतलेले अत्यंत बेडर शिवसेना नेते म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. बाळासाहेब हयात असतानादेखील संजय राऊत हे शिवसेनेच्या अंगावर आलेल्यांना शिंगावर घेत होते आणि त्यानंतरही जर कोणी संजय राऊत यांच्या अंगावर आले तर त्यांना स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिंगावर घ्यायचे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जेव्हा शिवसेनेची सर्व धुरा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आली त्यानंतर मात्र संजय राऊत यांच्यावर जे चालून आले त्यांना शिंगावर घेण्यात अथवा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांना परतवून लावण्यात कोठेतरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे कमी पडले.

२०१४ नंतर देशाच्या राजकारणाचा संपूर्ण नकाशा बदलला. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रचंड झंझावात म्हणा अथवा तुफानी लाट आली. या लाटेने भारतातील काँग्रेससारखी पारंपरिक विचारधारा संपूर्णपणे मुळासकट उखडून टाकली. मोदी लाटेचे तडाखे हे जसे काँग्रेसच्या विचारधारेला बसले तसेच ते देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांनादेखील बसले. मात्र या लाटेतही २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती मोडून दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही शिवसेनेला स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात ६३ आमदार निवडून आणता आले. यांना प्रमुख कारण जे होते ते म्हणजे शिवसेनेची महाराष्ट्राच्या जमिनीशी जुळलेली नाळ आणि त्याचबरोबर आक्रमक मराठी भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना म्हणून २०१४ मध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेने राज ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करत तुलनेने सौम्य मात्र तरी देखील सालस, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून शिवसेनेच्या रूपाने उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात भाजपानंतर क्रमांक दोनची मते टाकली.

महाराष्ट्राच्या राजकारणाने वास्तविक येथेच कलाटणी घेतली होती. कारण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप यांची युती असताना युतीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ तर भाजप हा लहान भावाच्या भूमिकेत वागत होता. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यापूर्वीचे सारेच राजकीय संदर्भ समीकरणे ही प्रचंड प्रमाणावर बदलली. शिवसेना जी स्वतःला भाजपपेक्षा महाराष्ट्रात आपणच क्रमांक एकवर आहोत असे समजत होती आणि दाखवत होती ती शिवसेना जेव्हा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले त्यावेळी भाजपपेक्षा निम्म्याहून अधिक संख्येने खाली घसरली. त्यावेळी भाजपचे स्वबळावर १२२ आमदार निवडून आले होते तर शिवसेनेचे ६३ आले होते. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही जरी हिंदुत्वाच्या विचारसरणीचे पक्ष असले तरीदेखील अगदी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळापासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत राजकीय वर्चस्वाची लढाई त्यावेळीदेखील सुरूच असायची. मात्र मुंबई महाराष्ट्रात जरी शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद झाले तरीदेखील भाजपचे दिल्लीतील सर्वोच्च नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नेहमीच मिळते जुळते धोरण घ्यायचे.

शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह सातत्याने असल्याचे दिसून येते, त्यातील शिवसेना नेत्यांचा एक गट असा होता की जो हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे आणि भाजप हा राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख पक्ष असल्याने त्या विचारांशी निष्ठावंत असलेला होता. तर दुसरीकडे संजय राऊत हे भाजपला अंगावर घेत असताना त्यामध्ये शिवसेनेचा अधिकाधिक लाभ कसा होईल या हेतूने काम करणारा दुसरा गट होता. जोपर्यंत बाळासाहेब होते तसेच प्रमोद महाजन हे दिल्लीतील भाजपची प्रमुख कमान सांभाळत होते तोपर्यंत संजय राऊत हे सामनाच्या माध्यमातून भाजपवर अथवा भाजपा नेत्यांवर जी टीका करायचे ती फारशी गांभीर्याने भाजपने कधी घेतल्याचे दिसत नाही, मात्र जेव्हा भाजपमध्ये आणि देशांमध्ये नरेंद्र मोदी या पंचाक्षरी नेतृत्वाचा उदय झाला आणि देशात मोदी युगाचे पर्व सुरू झाले, त्यानंतर मात्र भाजपमधील पक्षांतर्गत धोरणात कमालीचा बदल झाला. हा बदल जसा भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांनाही लक्षात येऊ शकला नाही तसाच हा बदल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जे सातत्याने भाजपला अंगावर घेत होते त्यांच्यादेखील लक्षात येऊ शकला नाही. यामध्ये आज संजय राऊत यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे जे दिसत आहे त्याला प्रमुख कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्णपणे बदललेली भाजपची राजकीय निर्णयप्रणाली आहे.

२०१४ नंतर भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये जे मूलभूत बदल झाले आहेत ते जर शिवसेनेने आणि त्याचबरोबर शिवसेनेचे थिंक टँक म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी बारकाईने लक्षात घेतले असते तर कदाचित आज शिवसेनेची जी अवस्था झाली आहे ती झाली नसती असेच म्हणावे लागेल. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवरील शिवसेनेच्या किंबहुना संजय राऊत यांच्या घणाघाती टिकेनंतरदेखील भाजपला शिवसेनेशी युती करायला लावली.

त्याचवेळी खरे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपची ताकद जी २०१४ च्या पूर्वी शिवसेनेच्या तुलनेत कमी होती ती प्रचंड वाढल्याचे जरी लक्षात घेतले असते आणि त्यानुसार जर शिवसेनेने समयसुचकता दाखवत स्वतःच्या पक्षाच्या भल्यापुरता तरी किमान भाजपला पाठिंबा दिला असता तरीदेखील शिवसेनेतील दोन महिन्यापूर्वी झालेली बंडखोरी उद्धव ठाकरे यांना टाळता आली असती. मात्र ज्याप्रमाणे शिवसेना नेते म्हणून संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समजून घेण्यात काहीसे कमी पडले त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून व गेल्या अडीच वर्षातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेदेखील मोदी आणि शहा यांना ओळखू शकले नाहीत असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे कमालीचे आग्रही होते. उद्धव ठाकरे यांचा हा आग्रह एक वेळ समजून घेता येऊ शकेल, मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी या भाजपशी परंपरागत वैर असलेल्या राजकीय पक्षांशी मुख्यमंत्री पदासाठी केलेली आघाडी ही शिवसेनेच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. जर भाजप नेते शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नव्हते तर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याऐवजी तटस्थ भूमिका घ्यायला पाहिजे होती. यामुळे शिवसेनेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिक्का बसला नसता तसेच भाजपकडून जी शिवसेनेची अवहेलना केली जात होती त्यालाही अटकाव करता आला असता. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी याच्या पूर्णपणे विरोधात भूमिका घेतली. भले त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद लाभलेदेखील असेल, मात्र आज उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचे जे काही फटके शिवसेनेला आणि शिवसेना नेत्यांना बसत आहेत ते जर लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेत असल्याचे दाखवताना सत्तेसाठी त्यांच्याबरोबर केलेली हात मिळवणी हे हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेसाठी समर्थनीय होऊ शकत नाही.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊन गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेसाठी असे काय कमावले हादेखील प्रश्न या निमित्ताने उभा राहतो आणि त्याचे उत्तर जर प्रामाणिकपणाने आणि स्वयंप्रेरणेने लक्षात घेतले तर तो केवळ शिवसेनेचा वैचारिक विनाश हेच समोर येते. संजय राऊत हे शिवसेनेचे अत्यंत फायर ब्रँड नेते म्हणून संपूर्ण देशात ओळखले जातात. शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी संजय राऊत यांनी ज्या प्रकारे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते अगदी मुंबई महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनाही अंगावर घेण्याची जी हिंमत दाखवली ती शिवसेनेचा अन्य कोणताही नेता दाखवू शकला नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. तथापि, संजय राऊत यांनी एवढे मोठे धाडस करत असताना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे संकटसमयी आणि कठीण प्रसंगात कोण उभा राहू शकेल, याचा जर विचार केला असता तर आज त्यांना ईडीच्या कोठडीत जाण्याची वेळ आली नसती.

राजकारणात पक्ष हितासाठी अन्य पक्षाच्या नेत्यांवर त्यांच्या ध्येयधोरणांवर, निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार हा भारतीय घटनेने सर्वसामान्य जनतेपासून सर्वांनाच दिलेला आहे. तथापि, ही टीका करत असताना ज्याला कोठे थांबायचे हे कळते तोच राजकीय वर्तुळामध्ये सदासर्वकाळ निभावून जाऊ शकतो. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे जेव्हा तुम्ही दुसर्‍या पक्षांवर दोषारोप करत असता तेव्हा तुमच्या स्वतःच्या आजूबाजूलादेखील बरेच काही घडलेले असते, घडत असते. आणि याचे भान सर्वांनीच राखायचे असते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लगाम घालण्यासाठी केला जाऊ लागला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सरकार आल्यानंतरच देशात सुरू झाला असे समजण्याचे काही कारण नाही. याआधीदेखील सीबीआयचा वापर हा काँग्रेस पक्षश्रेष्ठी अन्य पक्षांच्या नेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी करतच असायचे.

त्यामुळे ईडी, एनआयए, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या केवळ केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून विरोधकांना दाबण्यासाठी वापरल्या जात आहेत, या आरोपात तथ्य नाही. कारण पूर्वाश्रमीच्या सत्ताधार्‍यांनीदेखील आजच्या इतका या संस्थांचा वापर केला नसेल, पण तो केला नाही असे नाही. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना राज्यातील गृहखात्याचा वापर हा भाजप नेत्यांच्या विरोधात केला जात होताच. त्यामुळे याबाबत भाजपवर होणारे आरोप आणि भाजपकडून महाविकास आघाडीवर होणारे आरोप हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने तसे गैरलागू ठरतात. मात्र या सर्व लढाईमध्ये संजय राऊत यांच्यासारखा लढवय्या, निर्भीड आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी कमालीचा निष्ठावंत असलेला शिवसेना नेता बळी पडला हे शिवसेनेचे अपरिमित असे नुकसान आहे. हे नुकसान पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना यापुढील काळात भरून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे.

First Published on: August 2, 2022 11:20 AM
Exit mobile version