क्रौर्याला धार्मिक रंग नको, मनोविकृतांना वेळीच ओळखायला हवे!

क्रौर्याला धार्मिक रंग नको, मनोविकृतांना वेळीच ओळखायला हवे!

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आफताब पूनावालासारखे मनोरुग्ण मारेकरी धुमाकूळ घालत आहेत. अशा हत्याच नव्हे तर सीरियल किलिंगच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. डेहराडूनच्या राजेश गुलाटीने 17 ऑक्टोबर 2010 रोजी पत्नी अनुपमा गुलाटीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे 72 तुकडे करून डीप फ्रीजमध्ये ठेवले होते. काही वर्षांपूर्वी सुशील शर्माने पत्नी नयना सहानीची हत्या करून तिचा मृतदेह तंदूरमध्ये जाळून टाकला. आफताबने श्रद्धाच्या प्रेताचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा जंगलात फेकला. यात धर्माचा संबंध नाही. ही मनोविकृती आहे. अशा मनोविकृतांना मुलींनी वेळीच ओळखले तर त्यांच्या हत्या टळू शकतील. त्यामुळे धर्म, लिव्ह-इन रिलेशन, आधुनिक राहणीमान, समाजमाध्यमे, धार्मिक, सामाजिक कट्टरता असे निकष लावणे चुकीचे आहे.

तिहेरी तलाक, सीएए, एनआरसीला देशातील अल्पसंख्याक समाजाने कडाडून विरोध केला. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं होतं. यातून एक विशिष्ट धर्म टीकेचा धनी ठरला, पण कोरोनामुळे सीएए, एनआरसीविरोधातील आंदोलनाची धार बोथट ठरली. आता लव्ह-जिहादविरोधी कायदा आणण्याची तयारी भाजपप्रणित राज्यांमध्ये केली जात आहे. भाजपचं राजकारण धर्मावर आधारलेलं असल्यानं हिंदू-मुस्लीम यांच्यातील धार्मिक मुद्यांवरून वातावरण सतत तापत ठेवण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. म्हणूनच लव्ह-जिहाद विरोधी कायदा भाजपसाठी महत्वाचा आहे. वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर लव्ह-जिहादवरून पुन्हा एकदा वातावरण तापवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. श्रद्धा वालकर हत्यांकाडात पोलिसांकडून दररोज होत असलेल्या खुलाशांमुळे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. असं असलं तरी भाजपचे काही नेते लव्ह-जिहादविरोधात राज्य सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत लव्ह-जिहादवरून आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सध्या देशात लव्ह-जिहादबाबत कोणताही कायदा नसून झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश या नऊ राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यामधील तरतुदी राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत, मात्र लव्ह-जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा याचा थेट संबंध नाही. याला फ्रीडम ऑफ रिलिजन असंही म्हटलं जातं. ओडिसा फ्रीडम ऑफ रिलिजन, हिमाचल प्रदेश फ्रीडम ऑफ रिलिजन. धर्मांतर विरोधी कायदा 1968 ला आणणारे ओडिसा हे पहिलं राज्य ठरलं. धर्मांतर म्हणजे स्वतःचा धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे हा होय. 2006 साली वीरभद्र सिंह सरकारने धर्मांतरविरोधी कायदा आणला. जबरदस्तीने, लालच, प्रलोभन दाखवून केलेले धर्मांतर थांबवण्यासाठी हा कायदा आणला गेला.

आता भाजपची सत्ता असणारी राज्ये लव्ह-जिहाद कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि कर्नाटक ही भाजपशासित असणार्‍या राज्यांनी लव्ह-जिहाद कायदा व्हावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत. उत्तर प्रदेश राज्याने लव्ह-जिहाद विरोधातील कायद्यासाठी पुढाकार घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह-जिहाद सक्तीने रोखण्यात येईल. त्यानंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी लव्ह-जिहाद कायद्यासाठी पावलं उचलली. आसाम, हरियाणा, कर्नाटक या राज्यांनीदेखील समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. लव्ह-जिहादविरोधी कायद्यानुसार हा अजामीन पात्र गुन्हा असून दोषी आढळल्यास पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. महत्वाची बाब म्हणजे लव्ह-जिहादसाठी मदत करणार्‍यांनाही मुख्य आरोपींइतकीच शिक्षा देण्यात येईल. जबरदस्तीने जे धर्मांतर करण्यास भाग पाडतील त्यांनादेखील शिक्षा देण्यात येईल. जबरदस्तीने केलेला विवाह, फसवणूक, ओळख लपवून केलेला विवाह ग्राह्य मानला जाणार नाही. या कायद्याला मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेश धर्मस्वातंत्र्य विधेयक असं नाव दिलं आहे.

वसईतील श्रद्धा वालकर हिचे आफताब पूनावाला याच्याशी प्रेमसंबंध होते. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी पाठिंबा दिला, मात्र पूनावाला कुटुंबीयांनी विरोध केल्याने श्रद्धा आणि आफताब दोघांनीही घर सोडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली, पण काही महिन्यांतच दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. तरीही दोघे एकत्रच राहात होते. आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करायचा, असे आता तपासातून पुढे आलं आहे, पण श्रद्धा त्यानंतरही त्याच्यासोबत दिल्लीला रहावयास गेली होती. तिथंच मे महिन्यात आफताबने तिची निर्घृण हत्या करून शरीराचे अमानुषपणे 35 तुकडे केले. नशेत हत्या केल्याचं आफताब आता पोलिसांना सांगू लागला आहे. खरं तर पूनावाला कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिली असती तर श्रद्धाचे प्राण वाचले असते, असं श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी म्हटलं आहे. दिल्ली पोलीस हत्येच्या खोलात जाण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहेत.

सततच्या वादामुळेच श्रद्धा आणि आफताब यांच्यामधील संबंध बिघडत चालले होते. श्रद्धाने आपल्या मित्रांकरवी आफताबपासून मुक्त होण्याचं अनेकदा म्हटलं होतं, पण त्याकडे तिच्या मित्रांनी आणि घरच्यांनीही गंभीरपणे पाहिलं नाही. श्रद्धानेही आफताबपासून विभक्त होण्याची हिंमत दाखवली नाही. अखेर तिच्या अमानुष हत्येनंतर श्रद्धाची सततच्या छळातून मुक्तता झाली. श्रद्धाच्या हत्येनंतर पोलीस तपासातून असाच निष्कर्ष काढला जात आहे.

म्हणूनच श्रद्धाच्या हत्याकांडाशी लव्ह-जिहादचा संबंध जोडला जाणं दुर्दैवी असलं तरी या हत्याकांडानंतर लव्ह-जिहादचा आरोप होऊन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आता भाजपनेच आणलेलं शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे आपसूकच लव्ह-जिहादची ओरड सुरू झाली आहे. भाजपला प्रत्येक राज्यात लव्ह-जिहादविरोधी कायदा आणायचा आहे. त्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाने मागणीला ताकद मिळाली, पण पोलीस तपासात लव्ह-जिहादचे कोणतेही ठोस पुरावे हाती लागत नसल्याने आंदोलनाला धार मिळेनाशी झाली आहे. त्याआधी एक महिन्यापूर्वी अमरावतीत एका प्रकरणाचा लव्ह-जिहादशी संबंध जोडण्याचा प्रयत्न भाजपसमर्थक खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला होता, पण मुलीनेच पुढे येत लव्ह-जिहादचा आरोप फेटाळून लावत खासदार नवनीत राणा यांना तोंडघशी पाडलं होतं.

श्रद्धा हत्याकांडानंतर माध्यमातून चौकशीच्या नावाखाली लव्ह-जिहादची प्रकरणे शोधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचं दिसून येत आहे. श्रद्धा हत्याकांडानंतर मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी दिलेला इशारा खूप काही सांगून जातो. लग्न झालेल्या पाचशेहून अधिक मुली महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत, असा दावा लोढा यांनी केला आहे. मुंबईत तुष्टीकरण आणि एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर मुंबईचा अफगाणिस्तान, काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा लोढा यांनी दिला आहे. राज्यातल्या अनेक तरुणी लव्ह-जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता लोढा यांनी व्यक्त केली आहे. बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याचेही लोढा यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी लव्ह-जिहाद हे महाराष्ट्रासह देशावर आलेले संकट आहे.

हिंदू समाजाला संख्येने कमी करण्याचं हे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. भाजप लव्ह-जिहादविरोधात सुरुवातीपासूनच आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हिंदू मुलींचे लव्ह जिहादपासून संरक्षण करण्यासाठी लवकरच लव्ह-जिहादविरोधात सक्षम कायदा आणेल, असंही आमदार राणे यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकार लव्ह-जिहादविरोधी कायदा लागू करण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी शंका घेण्यास त्यामुळे वाव मिळत आहे.

सध्या देशात प्रत्येक घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. निर्घृण कृत्य करणार्‍याच्या जाती-धर्माचा शोध घेऊन व्यक्त होऊ लागलो आहोत. ही आजच्या भारतीय समाजाची शोकांतिका आहे. ‘माणूस प्रेमाने जोडला जातो तेव्हा त्याला जात, धर्म, देश, देव, प्रथा, परंपरा, संस्कृती, पैसा अडका काहीही अडवू शकत नाहीत. प्रेम ही नैसर्गिक भावना असली तरी ती अनैसर्गिक होऊ पाहत आहे, याची जाणीव होण्याची क्षमता सर्वसामान्यपणे स्त्रियांमध्ये असते. किंबहुना त्यामुळेच लिव्ह इन् रिलेशनशिपला येऊ लागलेला आफताबच्या विकृतीचा रंग श्रद्धाला दिसू लागला असावा. पण ‘लांडगा आला रे आला’प्रमाणे दोन-तीनदा आफताबने माफीनाट्य केले आणि वडिलांनीही मुलीकडे लक्ष देणे बंद केले. शेवटची तिची आर्त हाक दुर्लक्षित राहिली.

विकृतीची ही रात्र अन्य कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून पालकांनी आपल्या तथाकथित सज्ञान मुला-मुलींवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे. पाल्यांवर समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, भडक वेबमालिका यांचा काय परिणाम होत आहे, यावर पालकांचे लक्ष असले पाहिजे. त्यांना योग्य निर्णय घेण्यास सक्षम करणे ही पालकांचीच जबाबदारी आहे. मुले भरकटत आहेत, असे वाटले तर घरच्या घरी आणि त्याचाही फायदा न झाल्यास तज्ज्ञांकरवी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात लिव्ह-इन, लग्नाचा आग्रह, पालकांना झिडकारणे, पालकांनी झिडकारणे हे सर्व असले तरी आफताबचा क्रूरपणा काळजीत टाकणारा आहे. ज्याप्रकारे त्याने श्रद्धाचा खून केला आणि थंड डोक्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ती पाहता त्याच्यावरील संस्कारांचा प्रश्न नक्कीच उभा राहातो. तीन-चार वर्षे एकत्र राहिलेल्या मुलीचा असा काटा काढणारा समाजात राहण्याच्या योग्यतेचा आहे का? जो काळजीपोटी आपले कुटुंब 15 दिवसांपूर्वी वसईहून अन्यत्र नेतो, त्याला श्रद्धाबद्दल कुठलीच भावना नव्हती? हे प्रकरण समस्त तरुणाईला धोक्याचा इशारा देणारे आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात असे मनोरुग्ण मारेकरी धुमाकूळ घालत आहेत. अशा हत्याच नव्हे तर सीरियल किलिंगच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. डेहराडूनच्या राजेश गुलाटीने 17 ऑक्टोबर 2010 रोजी पत्नी अनुपमा गुलाटीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे 72 तुकडे करून डीप फ्रीजमध्ये ठेवले होते. 12 डिसेंबर 2010 रोजी अनुपमाचा भाऊ दिल्लीहून डेहराडूनला आला तेव्हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. काही वर्षांपूर्वी सुशील शर्माने पत्नी नयना सहानीची हत्या करून तिचा मृतदेह तंदूरमध्ये जाळून टाकला. त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. नंतर त्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत झाले. आता कैदेतून मुक्त झाल्यावर तो उजळ माथ्याने समाजात फिरत आहे. आफताबने श्रद्धाच्या प्रेताचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा जंगलात फेकला. श्रद्धाचा ठावठिकाणा शोधणार्‍या पोलिसांना सहा महिन्यांनी या खुनाचा तपास लागला. यात धर्माचा संबंध नाही. ही एक मनोविकृती आहे. त्यामुळे धर्म, लिव्ह-इन रिलेशन, आधुनिक राहणीमान, समाजमाध्यमे, धार्मिक सामाजिक कट्टरता असे निकष लावणे चुकीचे आहे. यातून सोयीचे मतलबी राजकारण करून देशाच्या एकात्मतेला तडे जातील असे वर्तन कोणीही करता कामा नये. गुन्हा भयंकरच, पण त्याला धार्मिक रंग देणारे त्याहूनही अधिक धोकादायक आणि घृणास्पद असतात.


First Published on: November 22, 2022 7:45 AM
Exit mobile version