अभाचिम निवडणूक यादीतून माधुरी दीक्षित, प्राजक्ता माळीसह 2500 कलाकारांची नावं वगळली, नेमकं प्रकरण काय?

अभाचिम निवडणूक यादीतून माधुरी दीक्षित, प्राजक्ता माळीसह 2500 कलाकारांची नावं वगळली, नेमकं प्रकरण काय?

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक यादीतील एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या निवडणूक यादीतील तब्बल 2500 पेक्षा जास्त कलाकारांची नावं वगळल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामध्ये मराठी कलाकारांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु त्या यादीतून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, जॉन अब्राहम, प्राजक्ता माळी, महेश टिळेकर, तुषार दळवी, लोकेश गुप्ते यांच्यासह इतर 2500 कलाकारांची नावं यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप सलाम पुणे संघटनेचे अध्यक्ष शरद लोणकर यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अडीच हजार मतदारांची नावे नियमबाह्य असल्याचे ठरवून ती काढून टाकण्यात आली आहेत. ज्या सभासदांनी वर्गणी भरली ,पावती घेतली त्या सभासदांना देखील मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्यात येत आहे. तसेच अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही ही एकप्रकारे फसवणूकच आहे.

या यादीतून माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, जॉन अब्राहम, प्राजक्ता माळी, महेश टिळेकर, तुषार दळवी, लोकेश गुप्ते आणि मराठी तारका प्रोडक्शन यांच्यासोबतच अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असल्याची प्रथम जाहीर झालेली मतदारांची यादी आणि काल जाहीर करण्यात आलेली मतदारांची अंतिम यादी पाहून स्पष्ट झाले आहे.

तसेच आता दुसरीकडे सभासदांच्या नावांना कार्यकारिणीची बैठक घेऊन मंजुरी द्यायला हवी होती ती 4 वर्षात दिली गेली नाही, त्यामुळे ही नावं आता वगळण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या महामंडळाचे प्रत्यक्षात अ आणि ब वर्गातील असे मिळून सुमारे 40,000 सभासद असल्याची चर्चा होती , त्या महामंडळाच्या निवडणुकीत आता फक्त 3400 मतदार उरल्याचे समोर आले आहे. शिवाय ब वर्गातील सभासदत्व लागोपाठ 3 वर्षे पूर्ण झाल्यावर त्या सभासदास अ वर्ग प्राप्त होऊन तो सभासद मतदार होतो असे 6250 मतदारांची नावे असलेली कच्ची मतदार यादी याआधी देखील निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केली होती. निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयावरून आता मोठा गोंधळ झाला आहे.

 


हेही वाचा :

हॉलिवूडच्या गाण्यांना टक्कर देत RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’

First Published on: January 11, 2023 9:52 AM
Exit mobile version