‘पठाण’ : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर महानायक अमिताभ बच्चन यांचं मोठं विधान

‘पठाण’ : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर महानायक अमिताभ बच्चन यांचं मोठं विधान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमातील बेशरम रंग या गाण्याला मोठ्या प्रमाणात काही लोक विरोध करत आहेत. तसेच या सिनेमावर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यावर शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया दिली असून हजारो चाहत्यांसमोर खंतही व्यक्त केली आहे. दरम्यान, या सिनेमाच्या वादावर हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठं विधान केलं आहे.

कोलकाता येथे झालेल्या 28व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अमिताभ बच्चन बोलत होते. 1952 सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सेंसरशीपचे स्वरूप काय असावे याबाबत फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत. असं असून सुद्धा नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

पठाणच्या वादात शाहरुखनं व्यक्त केली खंत

आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. नकारात्मकतेचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे. तसेच जग काहीही करो. मी, तुम्ही आणि सकारात्मक लोक अजून जिवंत आहेत, असं शाहरुख खान म्हणाला.

दरम्यान, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 28व्या आवृत्तीचे आज उद्घाटन करण्यात आले. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात 42 देशांतील 52 लघु आणि माहितीपटांसह 183 चित्रपट दहा ठिकाणी दाखवले जाणार आहेत.


हेही वाचा : नकारात्मकता पसरवण्याचं काम…, पठाणच्या वादात शाहरुखनं व्यक्त केली खंत


 

First Published on: December 15, 2022 10:20 PM
Exit mobile version