राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन!

kanchan nayak

अस्मिता चित्र बॅनरच्या ‘कळत नकळत’ या चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक कांचन नायक यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६५ इतके होते. भावनात्मक कथा हाताळणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे एक दिग्दर्शक म्हणजे कांचन नायक. त्यांचा जन्म पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रभाकर नायक हेदेखील दिग्दर्शक होते. कांचन नायक यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती.

१९७२ साली आपले वडील प्रभाकर नायक यांच्या समवेत ‘थापाड्या’, ‘पटलं तर व्हय म्हणा’ या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी  कारकिर्दीला सुरुवात केली. पण यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला. त्या वेळेस त्यांनी लेथ मशीनवरही काम केले. पण यात मन न रमल्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रातच काम करण्याचा निश्‍चिय केला.  हा निर्णय घेतल्यावर त्यांनी वडिलांच्या तालमीत तयार होण्यापेक्षा इतर दिग्दर्शकांकडे काम करण्याचे ठरवले आणि ‘राजदत्त’ यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अरे संसार संसार’, ‘भानू’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले.  कांचन नायक यांनी ‘सिंहासन’पासून ‘उंबरठा’पर्यंत ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या इंग्लिश चित्रपटापर्यंत जब्बार पटेल यांचे सहकारी म्हणून काम केले.

१९८९ मध्ये स्मिता तळवळकर यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांच्या हाती सोपवली. त्यातून ‘कळत नकळत’ हा चित्रपट आकाराला आला. कौटुंबिक जीवनातले भावनात्मक ताणतणाव व त्यांची हळुवार पद्धतीने केलेली उकल असा आशय असलेला हा चित्रपट त्यातल्या एकूणच बांधणीमुळे रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. या  चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिके व सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नऊ राज्य पारितोषिके मिळाली.  त्यानंतर २००७ साली सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वि.वा. शिरवाडकर लिखित ‘विश्वनाथ-एक शिंपी’ या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला.  याच वर्षी त्यांनी ‘घर दोघांचे’ या त्रिकोणी प्रेमकथा असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.

कांचन नायक यांनी २००० साली ‘राजू’ या सिनेमास्कोप संगीतमय चित्रपटाचे दिग्दर्शन केले. भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणार्‍या कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’ व ‘डंक्यावर डंका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना सहज हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. २००८ साली  दाक्षिणात्य निर्माते डी. रामनायडू यांच्या ‘माझी आई’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. २०१३ मध्ये त्यांनी ‘दणक्यावर दणका’ या  चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.

जयवंत दळवींच्या ‘पर्याय’ या हुंडाबळीवरील प्रसिद्ध नाटकावर आधारित ‘आव्हान’ या दूरदर्शन मालिकेचे पटकथा व संवादलेखन (१९८६) त्यांनीच केले. कांचन नायक यांनी झी मराठी वाहिनीसाठी ‘इंद्रधनुष्य’, तसेच ‘बंधन’ या दैनिक मालिकांचेही दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे दिल्ली दूरदर्शनसाठी ‘प्रारंभ’ या हिंदी मालिकेचेही दिग्दर्शन केले. ई-टीव्ही या वाहिनीसाठी त्यांनी २०११ मध्ये ‘क्राईम डायरी’ या मालिकेच्या १५०हून अधिक भागांचे दिग्दर्शन केले आहे. कांचन नायक यांनी दूरदर्शनसाठी काही मालिका, ‘यशवंतराव चव्हाण’ व ‘शोभना समर्थ’ यांच्या जीवनावर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले. शासकीय पातळीवर त्यांनी अनेक माहितीपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले.


हे ही वाचा – पाकिस्ताच्या इस्लामाबादमधून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता!


 

First Published on: June 15, 2020 1:54 PM
Exit mobile version