अनुराग कश्यप प्रकरण: पायल घोषने मानले रूपा गांगुलीसह कंगनाचे आभार; म्हणाली…

अनुराग कश्यप प्रकरण: पायल घोषने मानले रूपा गांगुलीसह कंगनाचे आभार; म्हणाली…

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर बरेच लोक अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ आले आहेत. पण आतापर्यंत केवळ पायलच्या समर्थनार्थ भाजप नेत्या रूपा गांगुली आणि अभिनेत्री कंगना रनौत या दोघी आल्या आहेत. पायलने या दोघांचे आभार मानले आहेत. यासह ती असेही म्हणाली की, बॉलिवूडमधील कोणीही त्याला पाठिंबा देणार नाही.

पायल घोष सोमवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली, मात्र तेथे तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही महिला अधिकारी नसल्यामुळे तिला तिची तक्रार नोंदवता आली नाही. ती पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन आज अहवाल दाखल करणार आहे. दरम्यान पायल निराश झाली असून तिचे असे म्हणने आहे की, लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप करूनही लोक अनुराग कश्यपचे समर्थन करत आहेत, तर कोणीही तिला पाठिंबा देताना दिसत नाहीये.

पायल घोषने असं म्हणाली की, “मला माहित आहे की बॉलिवूडमधील कोणीही मला साथ देणार नाही. मला कोणाकडूनही अशी अपेक्षा नाही.” तर अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यामध्ये तापसी पन्नू, कल्कि कोचलीन, माही गिल, राधिका आप्टे आणि सयानी गुप्ता यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा आणि दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बबील खान यांनीही अनुराग कश्यपचे समर्थन केले आहे.

पायल हिने ट्विटरवर रूपा गांगुलीचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले आणि लिहिले की “थँक्स यू मॅम तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल.” तर कंगना रनौतने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तिने असे लिहिले की, “कंगना रनौत पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. ही योग्य वेळ आहे आणि आपले समर्थन खूप महत्वाचे आहे. आपण महिला आहोत आणि आपण सर्वांना एकत्र आणू शकतो.”

काय आहे प्रकरण

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पायलने ट्विट करत अनुरागवर हे आरोप केले असून सोबतच एका मुलाखतीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसेच तिने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा, असे पायलने ट्विट करत म्हटले होते.


अनुराग कश्यप यांच्यावर आरोप करणाऱ्या पायल घोषची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
First Published on: September 22, 2020 3:03 PM
Exit mobile version