‘समायरा’तील ‘सुंदर ते ध्यान’ गाण्याला आधुनिकतेचा साज

‘समायरा’तील ‘सुंदर ते ध्यान’ गाण्याला आधुनिकतेचा साज

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा. याचा अनुभवच अतिशय अनोखा असतो. असाच एक सुंदर अनुभव देणारे ‘समायरा’ चित्रपटातील ‘सुंदर ते ध्यान’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सुंदर गाण्याला आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे. संत तुकाराम यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर हिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज लाभला आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली ‘समायरा’ आणि तिच्या त्या प्रवासात तिला झालेला बोध या गाण्यातून उलगडत आहे. ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, ”प्रत्येक वारकऱ्याची आपली एक कहाणी असते. तशीच समायराची सुद्धा आहे. समायराची ही अनन्यसाधारण कथा, व्यथा आणि त्यातून तिला झालेली विठूची प्रचिती म्हणजे हे गाणे. विठ्ठल सर्वांची माउली. सर्वांचा तारणहार आहे आणि याची प्रचिती समायरालाही येत आहे. तिचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, अनेक प्रश्नांनी व्याकुळ झालेले तिचे अस्थिर मन विठूचरणी येऊन असे शांत झाले आहे, हे आपल्याला या गाण्यातून दिसते. या गाण्याला जुईली यांनी खूप सुंदर सादर केले आहे. कीर्तनाला दिलेले हे नवीन रूप श्रोत्यांना नक्कीच भावणारे आहे.”

ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, ‘समायरा’ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

 


हेही वाचा :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

First Published on: August 10, 2022 2:09 PM
Exit mobile version