काँग्रेस लेना जानती है, देना नहीं – अबू आझमी

काँग्रेस लेना जानती है, देना नहीं – अबू आझमी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

ध्या देशभरात काँग्रेसने पाच राज्यांमध्ये मिळवलेल्या यशाची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला कडवी टक्कर देत सत्तेचं पारडं आपल्या बाजूला झुकवलं आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाशी आघाडी केली आहे. मात्र, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून देखील ‘काँग्रेस सिर्फ लेना जानती है, देना नहीं’, अशी टीका समाजवादी पक्षाचे मुंबईतले आमदार अबू आझमी यांनी केली आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये अबू आझमी यांनी काँग्रेससोबतच राम मंदिर, मुस्लीम आरक्षण, मराठी भाषा आणि राज ठाकरेंचा उत्तर भारतीयांसोबतचा संवाद अशा सर्वच विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून विविध मान्यवरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येतं. यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातली समाजवादी पक्षाची वाटचाल आणि विधानसभा निवडणुकांसाठीची सपाची व्हिजन काय असेल? या गोष्टींवर प्रकाश टाकला.

‘निवडणुका झाल्यावर यांचा सेक्युलॅरिजम जागा होतो’

काँग्रेस पक्षाचा सेक्युलॅरिजम अर्थात धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन संधीसाधू असल्याची टीका आझमींनी काँग्रेसवर केली. ते म्हणाले, ‘राहुल गांधी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघतात. पण ज्यांना पंतप्रधान व्हायचं असतं, ते सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन चालतात. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा समाजवादी पक्षासोबत फटकून वागलं जातं. पण जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा मग यांचा सेक्युलॅरिजम जागा होतो’, असा दावा त्यांनी केला. ‘उत्तर प्रदेशच्या मागच्या निवडणुकांमध्ये सपाने काँग्रेस आणि बसपासोबत भाजपला थांबवायचं काम केलं. आमची निती सुरुवातीपासूनच साफ आहे. पण काँग्रेससा फक्त घेणं माहिती आहे, देणं माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मागच्या निवडणुकीत इथे आघाडीची बोलणी केली. सगळं ठरलं. पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी आघाडीसाठी तयार नाहीत’, असं आझमी यांनी सांगितलं. तसेच, ‘ हे सगळं माहिती असून देखील उत्तर प्रदेशमध्ये फक्त भाजपला थांबवण्यासाठीच आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला’, असंही ते म्हणाले.

‘म्हणून मुस्लीम आरक्षण हवंय’

दरम्यान, यावेळी अबू आझमींनी मुस्लीम आरक्षणाची पाठराखण केली आहे. ‘जेव्हा २०१४ मध्ये मोदींची लाट आली, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ५% आरक्षण जाहीर केलं. पण तेव्हा कायदा केला नाही. त्यामुळे ६ वर्षांमध्ये ते रद्द झालं. कोर्टाचं म्हणणं आहे की मुस्लिमांना ५% आरक्षण मिळायला हवं. पण मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कायद्यात आरक्षण बसत नाही. मग त्यांनीच कोर्टाला विचारायला हवं की हे आरक्षण कशाच्या आधारावर द्यायला हवं?’,असं ते म्हणाले. तसेच, सध्या नेतेमंडळी वोटबँकेचा विचार करून बोलण्याची हिंमत करत नाहीत, असा दावा त्यांनी केला. ‘सध्या इथे कुणाचीही बोलण्याची हिंमत नाही. सगळेच पक्ष ज्याच्याकडे पैशाची ताकद आहे, त्यांच्यासाठीच आवाज देतात. त्यांना माहितीये, की ते बोलले तर त्यांची वोटबँक निघून जाईल. मी सांगतो वोटबँक गेली खड्ड्यात. समाजात ज्याला आरक्षणाची गरज आहे, त्याला ते मिळालंच पाहिजे’, असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा – मुस्लिम आरक्षणासाठी MIM सर्वोच्च न्यायालयात जाणार

‘हल्ली कुणालाही विचारसरणी नाही’

सध्याच्या राजकीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आझमींनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ‘हुसेन दलवाई, नवाब मलिक, बशीर पटेल यांना आम्ही सपामध्ये आणलं. पण सत्तेच्या आणि पदाच्या लोभामुळे ते बाहेर पडले’, अगदी नारायण राणेंनी देखील पदासाठी शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप अशी वाटचाल केली’, असा आरोप त्यांनी केला. ‘हल्ली कार्यकर्ते पदांसाठी किंवा सत्तेसाठी मोठ्या पक्षांमध्ये जातात आणि छोट्या पक्षांचं नुकसान होतं’, असंही ते म्हणाले.

‘सर्व धर्मांचा मान ठेवा’

‘सेक्युलॅरिझम म्हणतो मी मुसलमान आहे तर मी मुसलमान राहीन, तुम्ही हिंदू आहात तर तुम्ही हिंदू राहा. मी तुमच्या धर्माचा मान ठेवीन, तुम्ही माझ्या धर्माचा मान ठेवा. मी मुस्लिमांना सांगतो की गणेश मिरवणूक जात असेल तर तुम्ही त्यांना हार घाला, आणि गणपती मिरवणूक वाल्यांना सांगितो की नमाज सुरू असेल तर ५ मिनिटांसाठी ढोल बंद ठेवा. नमाजमध्ये मौलाना अल्ला हु अकबर म्हणेल, तेव्हा बाकीचे शेकडो लोकं त्याच्या पाठोपाठ म्हणत असतात. पण जर त्यांना ढोलमुळे मौलानाचा आवाजच ऐकू आला नाही तर ते नमाज कसे पढणार? त्यात मग काही उपद्रवी लोकं असतात जी भांडायला लागतात. पण मी असं नाही म्हणणार की त्यांनी गणेशाची पूजा करायला हवी. कारण त्यांचा धर्म वेगळा आहे.’

‘धर्मामुळेच वंदे मातरम् म्हणू शकत नाही’

बिस्मिल अजीम अबादी यांनी १९२१मध्ये मादरे वतनचा नारा दिला. मुख्तार अब्बास नक्वी, शेहनवाज हुसेन सुद्धा वंदे मातरम् बोलतातच. खरे मुसलमान दुसऱ्या कुणासमोर मान झुकवू शकत नाही. आमच्या धर्मात असं काही शिकवलेलंच नाही. धर्मामुळेच मी वंदे मातरम म्हणत नाही. संसदेत सुद्धा वंदे मातरम होतं. आम्ही सुद्धा उभे राहातो. पण म्हणू शकत नाही कारण धर्मामुळे आमचा नाईलाज आहे. कोर्टाने सुद्धा म्हणावंच लागेल असं काही म्हटलेलं नाही.

‘उद्धव ठाकरे अयोध्येत राजकारण करायला गेले’

१९९२मध्ये मशीद पाडली गेली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मशिदीच्या सुरक्षेची गॅरंटी कोर्टात प्रतिज्ञापत्रातून देऊन देखील मस्जिद पाडली. आणि त्यानंतर पंतप्रधान नरसिंह राव यांनीदेखील सांगितलं की इथे मस्जिद बनेल. पण नाही बनली. आता कोर्टात प्रकरण आहे. मुस्लिम म्हणतायत की जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य आहे. ते कुणी मस्जिद बांधायला जात नाहीयेत. पण उद्धव ठाकरे अयोध्येला राम मंदिराच्या नावाने राजकारण करायला गेले. त्यांचे वडील कधी गेले नव्हते. अयोध्येत दुसरी १५० मंदिरं तुटत आहेत. त्यांची दुरवस्था आहे. पण त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. फक्त बाबरी मशिदीच्या जागी मंदिर बनवायचंय. आणि कोर्टाच्या निर्णयाच्याही आधी बनवायचंय. हा कोर्टाचाच अपमान आहे. जर कोर्टाने सांगितलं मंदिर बनवा, तर आम्ही सगळे त्याचं स्वागत करू. पण जर मशिदीचा निर्णय झाला, तर तुम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत करायला हवं.


तुम्ही हे वाचलंत का? – शिवसेनेचा अयोध्या दौरा ‘रामदर्शना’साठीच

मोदी-शाह यांचं दबावतंत्र

मोदी-शहा देशातल्या यंत्रणांवर दबाव टाकण्यात एक्स्पर्ट आहेत. सीबीआय, पोलीस सारख्या यंत्रणांवर कुणाला बसवायचं, कुणाला नाही, हे सगळं अमित शाहजी करत आहेत. मी असं वाचलंय की हिमांशू त्रिवेदी नावाचे गुजरातमधले एक न्यायाधीश म्हणाले होते की मोदी सरकारकडून माझ्यावर असा दबाव आहे की गुजरात दंगलींमध्ये मुस्लिमांना नीट करा. ते नोकरी सोडून न्यूझीलंडमध्ये काम करायला निघून गेले. मी बाबू बजरंगीचा कबुलीजबाब देखील वाचलाय. तो म्हणाला की आम्ही जेलमध्ये होतो. मोदी म्हणाले की कुणी चांगला न्यायाधीश आला की तुमची सुटका करून देतो.

‘मला मराठी येत नाही यासाठी माफी मागतो’

राज्यात राहाणाऱ्या प्रत्येकाने मराठी बोलायलाच हवं. मीसुद्धा मराठी बोलायचा प्रयत्न करतोय. पण मला मराठी बोलता येत नाही त्याचं वाईट वाटतं. माझ्या घरी मुंबईत शिकलेल्या माझ्या मुलांना देखील मराठी येत नाही. इथे फक्त मराठीच्या बाता होतात. पण शाळेत मराठीची सक्ती केली जात नाही. मी मागणी केली होती, की प्रत्येक मुलाला मराठी शिकवलं जायला हवं. फक्त राजकारण करू नका. आपण जिथे राहातो, तिथली भाषा बोलणं आवश्यक आहे. माझ्या मागे इतकं काम असतं, की मला ते शिकायला वेळ मिळत नाही. पण मी यासाठी माफी मागतो की मला मराठी बोलता येत नाही.

‘राज ठाकरे डबक्यातले बेडूक’

राज ठाकरे डबक्यातल्या बेडकाप्रमाणे बोलतात. बेडूक डबक्यातच जन्माला येऊन तिथेच मरून जातो. राज ठाकरेंना वाटत असेल, की मुंबई शहरावर ताण वाढतोय, तर त्यांनी जावं पंतप्रधान मोदींकडे आणि आता गावांना शहरं बनवा अशी मागणी करावी. लाखो भारतीय परदेशात काम करतात. तुम्हा त्यांना त्रास करून द्यायचा आहे का? उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विकास होत नाही, तर राज ठाकरेंनी मोदींना विचारावं. पण स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यायलाच हवं हे मात्र नक्की. तुम्ही स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचा कायदा करा. पण परप्रांतीयांना मारहाण करणं हे चूक आहे.

‘मानखुर्द-गोवंडीच्या दुरवस्थेसाठी सरकार जबाबदार’

गोवंडी, मानखुर्दमध्ये झोपडपट्टी वाढते, त्याला सरकार कारणीभूत आहे. आज कारवाई होते, उद्या परत झोपड्या बनतात. मी एक सल्ला दिला होता, की जेव्हा तुम्ही झोपड्या तोडाल, तेव्हा तिथे पंचनामा करा. ज्यांच्या झोपड्या तोडल्या, त्यांच्याकडून तोडण्याचे पैसे वसूल करा. पण ते होत नाहीये. यामध्ये पोलिसांना हफ्ता मिळतो, पालिकेला पैसे मिळतात. आमदार, नगरसेवकाला पैसे मिळतात. शिवाय जिथे कुठे मुंबईत विकास होतो, तिथल्या झोपड्या गोवंडीत पाठवून देतात. कचरा देखील गोवंडीमध्येच पाठवला जातो. जोपर्यंत या सगळ्यासाठी सरकार सुविधा देत नाही, तोपर्यंत या समस्या सुटणार नाही.

पाहा संपूर्ण मुलाखत

First Published on: December 12, 2018 9:58 PM
Exit mobile version