भारताची अभिमानास्पद कामगिरी

भारताची अभिमानास्पद कामगिरी

भारताची अभिमानास्पद कामगिरी

यंदाचे २०२१ हे वर्ष सरून अवघ्या काही दिवसांतच नववर्षाचे आगमन होत आहे. खरंतर २०२० हे वर्ष कोरोनाच्या सावटामुळे आणि लागोपाठ घडणार्‍या नकारात्मक गोष्टींचा सपाटा यामुळे सर्वच बाबतीत देशवासीयांसाठी निराशाजनक ठरले होते. त्यामुळे २०२१ मध्ये नवी क्रांती घडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. या वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक भारतीयांनी आपल्या क्षेत्रात विजय मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याशिवाय आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटावा, अशा अनेक घटना या वर्षात घडल्या आहेत. या वर्षात देशाने कोणती कामगिरी केली यावर एक नजर टाकूया….

भारताने गाठला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा

भारताने कोरोना महामारीविरुद्ध सर्वात कमी वेळेत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. कोरोना विषाणू विरुद्ध चालू असलेल्या लढ्यात भारताने २१ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक कामगिरी केली. १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या कामगिरीचे संयुक्त राष्ट्रांनीही कौतुक केले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणात १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी

जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या या खेळांच्या महाकुंभमध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली. प्रदीर्घ कालावधीनंतर देशाने सात पदके पटकावली. एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह भारत पदकतालिकेत ४८ व्या स्थानावर पोहोचला आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम रचला. नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला, तर वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी कुमार यांनी रौप्यपदक जिंकले. दुसरीकडे, बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, शटलर पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय हॉकी संघाने कांस्यपदके पटकावली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

हरनाज संधू बनली विश्वसुंदरी

भारताची हरनाज संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. ती अवघ्या २१ वर्षांची आहे. हरनाज विश्वसुंदरी होणारी तिसरी भारतीय आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २००० साली लारा दत्ताने विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता २०२१ मध्ये हरनाज संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. भारताची मान उंचावत हरनाज मिस युनिव्हर्स २०२१ किताबाची मानकरी ठरली आहे.

प्रथमच भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद

भारताने या वर्षी कामगिरीच्या बाबतीत आणखी एक मोठी झेप घेतली आहे. भारताने प्रथमच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) अध्यक्षपद स्वीकारले. २ ऑगस्ट रोजी भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला. यादरम्यान भारताने सागरी सुरक्षा, शांतता राखणे आणि दहशतवादविरोधी या तीन प्रमुख क्षेत्रांवर आपले मत व्यक्त केले. त्याला कसे सामोरे जायचे याचा मार्ग संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दाखवला. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ पासून सुरू झाला.

अन्न निर्यातीत भारताने पहिल्यांदाच ब्राझीलला टाकले मागे

अरब देशांना अन्न निर्यात करण्यात भारताने ब्राझीलला मागे टाकून इतिहास रचला आहे. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. अरब देश हे ब्राझीलसाठी सर्वात महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. परंतु कोविड महामारीमुळे अरब देश आणि ब्राझीलमधील अंतरामुळे जागतिक लॉजिस्टिक सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अन्न निर्यातीच्या बाबतीत ब्राझील भारताच्या मागे पडला.

जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे १५ नोव्हेंबर रोजी जागतिक दर्जाच्या सुविधांसह राणी कमलापती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशनचे स्वप्न साकार झाले. पीपीपी मॉडेलवर बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे जर्मनीच्या हेडलबर्ग रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर नूतनीकरण करण्यात आले आहे. १९५५ साली बांधलेल्या जर्मन हेडलबर्ग रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे ४२ हजार प्रवासी ये-जा करतात. पण येथे गर्दी नाही आणि कोणतीही समस्या नाही. या स्थानकाप्रमाणेच राणी कमलापती रेल्वे स्थानकावरही सुरक्षिततेची सोय करण्यात आली आहे. राणी कमलापती रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

भारताने बनवले जगातील सर्वात हलके लढाऊ हेलिकॉप्टर

भारत आपली सुरक्षा अभेद्य करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवरील अवलंबून राहणे दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. भारताने जगातील सर्वात हलके लढाऊ हेलिकॉप्टर बनवले आहे. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ झाशी येथे आयोजित ‘राष्ट्रीय संरक्षण आत्मसमर्पण’ समारंभात भारतीय हवाई दलाला स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर सुपूर्द केले.

हवाई दलात लवकरच ८३ तेजस विमानांचा समावेश

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच ८३ तेजस विमानांचा समावेश होणार आहे. ४८ हजार कोटींच्या लढाऊ विमान तेजसच्या कराराला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने मंजुरी दिली. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात ८३ स्वदेशी तेजस विमानांसाठी करार करण्यात आला. या करारानुसार भारतीय हवाई दलाला ४८ हजार कोटी रुपयांमध्ये ८३ तेजस विमाने मिळणार आहेत.


हेही वाचा – बॉलिवूड सेलिब्रेटींनी वेधले लक्ष


 

 

First Published on: December 27, 2021 6:51 PM
Exit mobile version