मुके बोल : ७७७ चार्ली

मुके बोल : ७७७ चार्ली

सध्या दाक्षिणात्य सिनेमा म्हंटलं की, समोर येतो. भव्यदिव्य असा सिनेमॅटिक एक्सपीरियन्स … नायक-खलनायक आणि मारधाड हे यशस्वी सूत्र सर्वत्र गाजतंय, याव्यतिरिक्त काही वेगळं पाहण्याची मानसिकता पॅन इंडिया प्रेक्षकांचीदेखील नव्हती, पण त्यातच एक कन्नड सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याने आपली वगेळी छाप सोडली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कन्नड सिनेमा हा तेलगू आणि तामिळ सिनेमांच्या तुलनेत तितका महत्वाचा मानला जात नाही, पण केजीएफच्या यशानंतर या सिनेसृष्टीला एक नवसंजीवनी मिळाली आणि कन्नड सिनेमादेखील पॅनइंडिया प्रेक्षकांपर्यंत पोहचला. दिग्दर्शक किरणराज के दिग्दर्शित ‘ ७७७ चार्ली’ हा सिनेमा मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाला, सुरुवातीला कोणतेही मोठे डिस्ट्रिब्युटर हा सिनेमा भारतभर रिलीज करण्यासाठी तयार नव्हते, पण ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर हा सिनेमा हिंदीपट्ट्यात रिलीज करण्यात आला.

प्राण्यांवर आधारित सिनेमांची यादी भारतीय सिनेमात तितकी मोठी पाहायला मिळत नसली, तरी काही अशी नाव आहेत, जे हा विषय निघाला की, आपल्यासमोर येतात. तेरी मेहेरबानिया, हाथी मेरे साथी ही त्यापैकीच काही नावं, यातला तेरी मेहेरबानिया सिनेमा हादेखील एका कन्नड सिनेमाचा रिमेक होता, ज्यात एका पाळीव कुत्र्याची महत्वाची भूमिका होती. ७७७ चार्ली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे ती, चार्ली नावाच्या एका लॅब्रॉडॉर जातीच्या कुत्र्याने आणि त्याच्यासोबत सेकंड लीडला आहे कन्नड इंडस्ट्रीतील एक प्रयोगशील अभिनेता अशी ओळख असलेला रक्षित शेट्टी… चार्ली नावाच्या कुत्र्याने साकारलेली भूमिका हीच या सिनेमाची सर्वात मोठी खासियत आहे, यात जितकी मेहनत त्या पाळीव प्राण्याची असेल त्याहून अधिक मेहनत सिनेमाचा दिग्दर्शक किरणराज के आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांची देखील आहे. एका प्राण्याकडून अशा प्रकारचं काम करवून घेणं, हे कुठल्याही ट्रेनिंगमधून शक्य नाही. म्हणून एक अतिशय वेगळा प्रयोग, हटके कथा आणि उत्तम सादरीकरण यामुळे हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो.

पाळीव प्राण्यांवर याआधी अनेक सिनेमे बनले आहेत आणि कदाचित यानंतर देखील बनतील. पण या सिनेमातला मुख्य नायक असलेला चार्ली कदाचितच तुम्हाला पुढे कुठे पाहायला मिळेल, कारण प्राणी कधीच अभिनय करत नसतात. या सिनेमातही चार्लीचे जितके सीन्स असतील ते सगळे तिच्या खर्‍या प्रतिक्रिया, हावभाव याच असतील, तरीदेखील तिचा प्रत्येक सीन हा खास वाटतो आणि आपण तिच्या प्रेमात पडतो. मला या गोष्टीचं आश्चर्य आहे की, दिग्दर्शकाने त्या मुक्या प्राण्याकडून इतके उत्तम शॉट्स कसे घेतले असतील आणि अभिनेता रक्षित शेट्टी याची त्या चार्ली सोबतची केमिस्ट्री इतकी भन्नाट कशी दाखवली असेल? कारण हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये. सिनेमाच्या कथेनुसार तब्बल २ वर्षं वयाचा होईपर्यंतचा चार्ली आपल्याला पडद्यावर दिसतो आणि तोपर्यंत रक्षित सोबत त्याची केमिस्ट्री तितकीच घट्ट झालेली दिसते. सिनेमाची कथा ही देखील या सिनेमाची एक खासियत आहे, या कथेचं उद्दिष्ट मसाला किंवा ट्विस्ट असं काहीच नसून , जे आहे ते दाखवणं इतकंच असल्याने हिचा साधेपणा आपल्याला भावतो.

धर्मा (रक्षित शेट्टी) नावाचा एक तरुण आहे जो कंपनीत काम करतो आणि एकटा राहतो. शेवटी कधी हसला होता कुणालाच माहीत नाही, पण भांडण आणि चिडणं हाच त्याचा स्वभाव सर्वाना परिचित आहे. बालपणी घडलेली एक घटना त्याला एकटं पाडून गेली आणि त्याने हाच एकाकीपणा स्वीकारलाय, दुसरीकडं चार्ली जो सिनेमाचा मुख्य नायक आहे त्याचं बालपणदेखील असंच काहीस गेलंय आणि तो मालकापासून पळून या धर्माच्या सोसायटीत आलाय. एका घटनेनंतर धर्मा चार्लीला दत्तक घेतो आणि चार्लीबद्दलची एक गोष्ट त्याला समजते, ती गोष्ट काय ? पुढे काय घडतं यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. सिनेमाची ही कथा महाभारतातील एका घटनेपासून प्रेरित वाटते, धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांच्यासोबत स्वर्गापर्यंत आलेला त्यांचा कुत्रा, या गोष्टीपासूनच सिनेमाची कथा प्रेरित आहे. तिथं धर्मराज होते आणि इकडं धर्मा, तिथं त्यांच्याही सोबत प्रवासात कुणी नव्हतं आणि इकडं धर्मादेखील एकटा दाखवलेला आहे. बाकी सिनेमात एक कुत्र्याचा डॉक्टर, कुत्र्यांसाठी काम करणारी एक महिला आणि धर्माच्या कॉलनीत राहणारी लहान मुलगीसुद्धा आहे, ज्यांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिलाय.

‘७७७ चार्ली’ सिनेमा ही रोलरकोस्टर राईड मुळीच नाहीये, या सिनेमात ना तुमचं खूप जास्त मनोरंजन होईल, ना इथं तुम्हाला दर दुसर्‍या वाक्याला काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. हा सिनेमा म्हणजे फक्त एक अनुभव आहे, प्रेमाचा अनुभव ज्यात एकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दुसरा काहीही करायला तयार असतो. जेव्हाजेव्हा चार्ली समोर येतो तेव्हा तेव्हा आपल्याला जीवनात कधीतरी आवडलेल्या एखाद्या कुत्र्याची आठवण येते, बर्‍याच वेळा आपण वेगळ्याच विश्वात हरवून जातो आणि हे त्या कथेमुळे होते.. आपण त्या पात्राशी रिलेट करतो, त्यात दाखवलेल्या सीन्स सोबत रिलेट करतो म्हणून तब्बल पाऊणेतीन तासांचा अवधी असतानाही हा सिनेमा फार बोर करत नाही. पण एक गोष्ट जी दिग्दर्शक नक्की करू शकला असता, ती म्हणजे याची लांबी जर काहीशी कमी असती, तर सिनेमा अधिक प्रभावी होऊ शकला असता, कदाचित कथेच्या मागणीमुळे याची लांबी तितकी असावी.

दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमाच्या हिंदी डबमध्ये असलेले इंग्रजी आणि पाश्चात्य भाषेतील गाणी चांगली आहेत, पण हिंदी गाणी तितकी प्रभावी ठरत नाहीत. सिनेमा पाहताना जरी ती गाणी रिलेटेबल वाटत असली तरी सिनेमा संपल्यावर लक्षात राहील असं गाणं या सिनेमात नाही. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक दोघांचंही कौतुक करावं तितकं कमी यासाठी की, चार्लीचे सीन्स त्यांनी अतिउत्तमरित्या टिपले आहेत, टीव्हीसमोर नाचणं असो किंवा नाराज होऊन बसणं, त्याच्या डोळ्यात पाणी दिसतं आणि आपण भावूक होतो हे त्या दिग्दर्शकाचं यश आहे. मुक्या प्राण्यांकडून उड्या मारून घेणे, त्यांना स्टॅन्डअप सीट डाऊन शिकवणे, स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्याकडून कसरती करवून घेणे , सोपं काम आहे जे ट्रेनिंगने तुम्ही करवून घेऊ शकता.. पण जे या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल, ते अतिशय कठीण काम होतं. याच आशयाचा एक सीन सिनेमात आहे, तो सीन इतका अप्रतिम जमून आलाय की, आपण केवळ त्या सीनसाठी का होईना संपूर्ण सिनेमा पाहू शकतो. तेव्हा जर काही वेगळं पाहायचं असेल, तुम्ही एक पेटलव्हर असाल किंवा नसाल, पण तुमच्यात पेशन्स असेल आणि तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा एकवेळ नक्की पाहावा.

First Published on: June 26, 2022 4:20 AM
Exit mobile version