महिला क्रिकेटमध्ये सुवर्णयुग…

महिला क्रिकेटमध्ये सुवर्णयुग…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजेत्या युवा संघाचे अभिनंदन केले. भारतीय क्रिकेट मंडळाने 5 कोटींचे इनाम जाहीर केले ते या अजिंक्य संघातील खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफसहित सार्‍यांनाच त्यांच्या कामगिरीची केवळ दखल घेतली गेली असे नव्हे, तर कदरही केली गेली. भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते या रणरागिणींचा गौरव करण्यात आला, 5 कोटींचा धनादेश देण्यात आला अन् सचिनसहीत बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच माजी वर्ल्ड कप विजेते रॉजर बिन्नी उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच चिटणीस जय शहादेखील या आनंदसोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

महिला क्रिकेट संघाला जगज्जेतेपदाने याआधी अनेकदा हुलकावणी दिली होती, पण परदेशात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावण्याची किमया प्रशिक्षक नुशीन अल खदीर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करणार्‍या सर्वसामान्य घरातून आलेल्या या युवतींनी केला हीच मोठी यशोगाथा. हरयाणा, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश या क्रिकेटेत्तर खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातून आर्थिक तंगीचा मुकाबला करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी या मुलींनी कडवा संघर्ष केला शिवाय यांच्या पालकांना (माता, बंधू भगिनी ) यांना टीका टिप्पणी टोमणे तसेच कुत्सित शेरेबाजीला सामोरे जावे लागले ही बाब नजरेआड करून चालणार नाही.

आणखी एक बाब प्रकर्षाने नमूद करण्याजोगी आहे ती म्हणजे याचदरम्यान मायदेशी ओडिशा राज्यात भुवनेश्वर आणि राऊरकेला येथील भव्यदिव्य स्टेडियमवर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा खेळली जात होती, पण (यात यजमान भारतीय संघाची नवव्या क्रमांकावर घसरण झाली) प्रसारमाध्यमांनी भारतीय युवतींच्या भीमपराक्रमाची दखल घेत फ्रंट पेजवर सचित्र बातमी छान मथळे देत सजवली आणि तमाम क्रीडारसिकांनी याची दखल घेतली आणि त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला

देशाच्या सिनियर संघाची मजबुती ही जुनियर संघाच्या ताकदीवर अवलंबून असते तसेच त्याचा भविष्यकाळदेखील उज्ज्वल असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारतीय युवतींनी (19 वर्षांखालील) वर्ल्ड कप जिंकला अन् आता लवकरच (10 ते 26 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतच महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होतेय हा भारतासाठी शुभशकुन ठरावा. शफाली वर्मा तर युवा संघाची कर्णधार होती. तिने आपल्या सार्‍या नवोदित सहकार्‍यांच्या साथीने वर्ल्ड कप हस्तगत केला. शफाली तर अनुभवसमृद्ध अशी खेळाडू आणि तीच शफाली आता सिनियर भारतीय संघातून खेळेल तिचा ताजा अनुभव हरमनप्रीतच्या संघाला निश्चितच फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय क्रिकेटचा पाया मजबूत आहे. ज्याप्रकारे विविध स्तरांवर मुला-मुलींसाठी विविध वयोगटातील स्पर्धा घेतल्या जातात त्याच अखिल भारतीय स्तरावर मोठे जाळे पसरलेले आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. विविध सामाजिक घटकातून खेळाडू पुढे येताहेत तेदेखील परिस्थितीचा नेटाने मुकाबला करूनच. ज्युनियर पातळीवर खेळताना त्याचा भार पडतो पालकांवरच. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरू,कोलकाता यासारख्या महानगरात शाळा, कॉलेज, क्लब, प्रशिक्षक या सोयी सुविधा थोडया फार प्रमाणात का होईना उपलब्ध असतात, पण महानगरातील खर्चदेखील अफाट, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे काही नाही. मग ग्रामीण भागातून धडपड करत पुढे येणार्‍या उमलत्या कळ्यांना जपून पुढे वाटचाल करणे कर्मकठीण बाब. काटेरी वाटचाल करून बहुतेक सार्‍याजणी (एखाददुसरा अपवाद असू शकेल ) राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवून पहिल्यावहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावतात ही स्वप्नवत कामगिरी म्हणायला हवी.

खेळ मग तो कोणताही असो त्यात आशा, निराशा, हर्ष, खेद, अन्याय, वैफल्य, स्वप्नपूर्ती, स्वप्नभंग या गोष्टी अटळ आहेत. गुणवत्तेला यशस्वी कृतीची जोड लाभली की त्याला इनाम देऊन गुणगौरव करणेदेखील योग्य, त्याची दखल योग्य वेळी घेतली गेली तर दुग्धशर्करा योग म्हणायला हवा. दक्षिण आफ्रिकेत तो घडवून आणला तो रोहटकच्या शफाली वर्मा आणि तिच्या ताज्या दमाच्या साथीदार युवतींनी. भारतीय क्रिकेट मंडळाने महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या मानधनात समानता आणली, पण ते फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यासाठीच! काही निवडक खेळाडूंनाच यात संधी लाभते. सर्वसामान्य महिला क्रिकेटपटू ज्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळतात त्याबाबत पुरुष आणि महिला यांच्या मानधनात प्रचंड तफावत आढळून येते. देशांतर्गत (डोमेस्टिक) होणार्‍या स्पर्धेत अनेक महिला क्रिकेटपटू सहभागी होतात, त्यांच्यात गुणवत्ता आहे, पण या स्पर्धांमध्ये खेळणार्‍या खेळाडूंचे मानधन वाढले तर अनेक खेळाडू क्रिकेटकडे आकर्षित होतील. मानधनात वृद्धी झाली तर समाजात या खेळाडूंना मान मरातब लाभेल, दाम करी काम. अलीकडे महिला क्रिकेटपटूंना लागोपाठ सामने खेळावे लागतात. आशिया चषक स्पर्धा भारतीय महिला संघाने सातव्यांदा जिंकली. त्याआधी त्यांनी इंग्लंडला 3-0 असे खडे चारले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रोप्यपदकाची कमाई केली.

आगामी 3 वर्षांत भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला असून भारतीय महिला क्रिकेटपटूंना सुमारे 60-70 आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असेचित्र दिसत आहे, त्यात आता भर पडेल ती मार्चमध्ये खेळल्या जाणार्‍या महिला क्रिकेट लीगची. या लीगसाठी संघाच्या लिलावातून भारतीय क्रिकेट मंडळाला 4670 कोटींची कमाई झाली. त्यापैकी 951 कोटी मीडिया हक्क विक्रीमुळे. प्रचंड उलाढाल होतेय क्रिकेटमध्ये. त्याचा फायदा महिला क्रिकेटपटूनांदेखील होईल.
भारतात खासकरून मुंबई (सीसीआय, माटुंगा जिमखाना, पुरंदरे स्टेडियम, इंडियन जिमखाना)पुणे, कोलकाता, मद्रास, बंगळुरू याठिकाणी 1970 च्या दशकात सुमारास महिला क्रिकेटला सुरुवात झाली.. डायना एडलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी, शोभा पंडित, नूतन गावसकर (सुनीलची बहीण) सुधा शहा यांनी क्रिकेटला सुरुवात केली.

पदरमोड करावी लागली त्यांना. त्यावेळी प्रवास तसेच खाण्याचा खर्च महिला क्रिकेटपटू स्वतःच करीत असत. नंतर हळूहळू चित्र बदलू लागले. शरद पवारांच्या पुढाकारामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने महिला क्रिकेटचे विलीनीकरण आपल्यात करण्यासाठी संमती दिली आणि त्याचा फायदा थोड्या प्रमाणात का होईना महिला खेळाडूंना झाला. चांगली मैदाने, स्टेडियम्स, विमानप्रवास चांगल्या हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था या सोयीसुविधांचा लाभ त्यांना मिळू लागला. कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे परदेशी दौरे तसेच पाहुण्या परदेशी संघांचे भारतात सामने वारंवार होऊ लागले.

2017 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला इंग्लंडमध्ये भारतीय महिलांनी कडवी झुंज दिली, पण 9 धावांनी यजमान इंग्लंडने अंतिम सामना जिंकून वर्ल्ड कप पटकावला. भारताने हा अंतिम सामना गमावला तरी प्रेक्षकांनी या संघांच्या जिगरीचे कौतुक केले. साखळी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीने सर्वांची मने जिंकली. तिने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रखर हल्ला चढवताना 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकारानिशी 171 धावांची यादगार खेळी केली.

मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर अशा जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने ठसा उमटविणार्‍या खेळाडूंमुळे प्रेक्षकांची पावले स्टेडियमकडे वळू लागली अलीकडेच ऑस्ट्रेलियन महिला संघ भारत दौर्‍यावर आला होता. त्यांचे टी-20 चे सामने नेरूळच्या डी वाय पाटील तसेच ब्रेबर्न स्टेडियमवर खेळवण्यात आले. त्यापैकी नेरूळच्या डी वाय पाटील येथील दुसर्‍या टी-20 सामन्याला 45 हजार प्रेक्षकांचा पाठिंबा लाभला. हादेखील एक विक्रमच! या सामन्यात (टाय) बरोबरी झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. त्यात भारताने विजय संपादला. त्यात भर पडली ती ज्यनियर मुलींच्या वर्ल्ड कप विजेतेपदाची. महिला क्रिकेटला सुगीचे दिवस येवोत हीच सदिच्छा.

First Published on: February 5, 2023 5:13 AM
Exit mobile version