महाराणी एलिझाबेथ द्वितीय – एक कर्तव्यदक्ष क्वीन

महाराणी एलिझाबेथ द्वितीय – एक कर्तव्यदक्ष क्वीन

ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घकाळ विराजमान असलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली ७० वर्षे ब्रिटनचा राज्यकारभार एकहाती सांभाळणार्‍या महाराणी एलिझाबेथ यांनी फक्त स्वतःच्या देशातील स्थित्यंतरच नाही, तर जगातील आर्थिक आणि सामाजिक स्थित्यंतरही जवळून पाहिली. त्यातून ब्रिटनला वेगळी ओळख देण्यासाठी त्याची राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी महाराणी एलिझाबेथ आयुष्यभर झटल्या. आपल्या सर्वच जबाबदार्‍या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या. यामुळे फक्त कर्तव्यनिष्ठ महाराणीच नाही, तर जनतेसाठी झटणारी क्वीन म्हणून एलिझाबेथ ब्रिटिश जनतेच्या मनात कायम राहणार आहेत.

पण वरवरून महाराणी एलिझाबेथ यांचा ७० वर्षांचा राजकीय प्रवास दिसतो तितका आकर्षक आणि सहज सोपा कधीच नव्हता. त्यांच्या या राजकीय प्रवासात इंग्लंडच नाही, तर जगातील राजकारण ढवळून निघताना त्यांनी जवळून बघितले आणि अनुभवलेही. त्यातूनच ब्रिटनची ही महाराणी घडत गेली. एलिझाबेथ यांच्या डोक्यावर कोहीनूर जडीत महाराणीपदाचा मुकुट अशा कालखंडात घालण्यात आला ज्यावेळी जगभरात ब्रिटनचा दर्जा घसरत होता. ब्रिटनमध्ये क्रांतीचे वारे वाहू लागले होते. येथील राजघराण्याच्या भूमिकेवरच नागरिकांनी प्रश्नचिन्ह उगारले होते. ही परिस्थिती एवढी बिकट होती की महाराणीच नाही, तर त्यांच्या कर्मचार्‍यांचेही राजमहालाबाहेर पडणे कठीण झाले होते, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी न डगमगता आपल्या समजूतदारपणाने जबाबदार्‍या पार पाडल्या. तसेच देशातील जनतेचा ब्रिटनच्या राजघराण्यावरील विश्वासही कायम ठेवला.

एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी बर्केले येथे झाला. ब्रिटनचे तत्कालीन राजा जॉर्ज पाचवे यांचे द्वितीय पुत्र ड्यूक ऑफ यॉर्क अल्बर्ट यांची एलिझाबेथ थोरली कन्या होती. ती कधी ब्रिटनची महाराणी होईल याचा विचारही त्याकाळी कोणी केला नव्हता. एलिझाबेथने कधीच शाळेची पायरी चढली नाही, मात्र तिची धाकटी बहीण मार्गेट हिचे शिक्षण राजमहालातच झाले. एलिझाबेथ खेळकर चुणचुणीत, हुकूमी आणि चाणाक्ष, हुशार होती. यामुळे ती वडिलांची आणि आजोबा राजा जॉर्ज पाचवे यांची ती लाडकी होती. वयाच्या सहाव्या वर्षीच ती घोडेस्वारी शिकली. लहानपणापासूनच ती जबाबदारीने आणि समजूतदारीने वागायची. तिची ही वर्तणूक बघून ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलही भारावून गेले होते.

कधीही शाळेत न गेलेल्या एलिझाबेथला अनेक भाषा यायच्या. राजा किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले पुत्र डेविड, एडवर्ड आठवे यांच्या नावाने राजगादीवर बसले, मात्र एडवर्डने अमेरिकी महिला वॅलिस सिंपसन यांना आयु्ष्यसोबती म्हणून निवड केली. सिंपसन यांचा दोन वेळा घटस्फोट झालेला होता. धर्माच्या बाबतीतही त्या कर्मठ होत्या. यामुळे ब्रिटनमध्ये त्यांच्याविरोधात लाट उसळली. जनतेचा विरोध इतका विकोपाला गेला की एडवर्ड यांना राजगादी सोडावी लागली. त्यानंतर एलिझाबेथचे वडील ड्यूक ऑफ यॉर्क यांना राजा जॉर्ज आठवे यांच्या नावाने राजगादीवर बसावे लागले, पण त्यांना राजकारणात यायचे नव्हते, त्यांना राजाही व्हायचे नव्हते. एलिझाबेथला हे चांगलेच माहीत होते.

एकीकडे जर्मनीच्या क्रूर शहा हिटलरची ताकद वाढत होती. युरोपमध्ये तणावाचे वातावरण होते. त्याचदरम्यान जॉर्ज आपल्या कुटुंबासमेत देशयात्रेला निघाले. या यात्रेत एलिझाबेथला बरंच काही शिकायला आणि पहायला मिळाले. या अनुभवातूनच एलिझाबेथ घडत होती. १९३९ मध्ये एलिझाबेथ यांची ओळख ग्रीसचे प्रिंस फिलिपबरोबर झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेक अडचणी आणि विरोधांचा सामना करत अखेर २० नोव्हेंबर १९४७ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर प्रिंस फिलिप यांना ड्यूक ऑफ एडीनबरा ही उपाधी मिळाली. त्यानंतर १९४८ साली प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी प्रिन्सेस एन यांचा जन्म झाला. यादरम्यान फुफ्फुसाच्या कॅन्सरने एलिझाबेथचे वडील राजा जॉर्ज यांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच एलिझाबेथ ब्रिटनला आली. त्यावेळी घाईघाईत त्यांना ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. एलिझाबेथच्या राज्यभिषेक सोहळ्याचे पहिल्यांदाच टीव्ही वरून थेट प्रसारण करण्यात आले होते. दुसर्‍या युद्धाच्या झळा पोहचल्याने ब्रिटन त्यावेळी आर्थिक संकटाचा सामना करत होता.

यामुळे या सोहळ्यावर खर्चावरून पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी टीका केली होती. दुसर्‍या महायुद्धामुळे ब्रिटनचे लौकिक धूळीस मिळाले होते. भारतासह अनेक देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाले होते. यामुळे ब्रिटनने गमावलेले लौकिक परत मिळवण्यासाठी महाराणी एलिझाबेथ यांनी कॉमनवेल्थ देशांचा दौरा केला, पण ब्रिटनला लौकिक मिळवून देण्यात महाराणी एलिझाबेथ यांचे प्रयत्नांना यश मिळाले नाही. राजकीय आव्हाने वाढत होती. यादरम्यान पंतप्रधानांनी एलिझाबेथ यांची साथ सोडली. त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांच्यावरही वैयक्तिक टीका करण्यात आल्या. त्यांना काहीच येत नाही. भाषणाची प्रत हातात नसेल तर त्या भाषणही करू शकत नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर टीका करणार्‍या लॉर्ड अल्ट्ींचम यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामुळे ब्रिटिश राजघराण्याविरोधात बोलणार्‍यांवर हल्ले होतात. अशी चर्चा सुरू झाली. ब्रिटिश घराणेशाहीविरोधात लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या पतीने स्वतःला काळानुसार बदलण्याचा सल्ला दिला.

नंतर एलिझाबेथ यांनी वर्षानुवर्षे असलेले राजघराण्यातील नियम बदलले. यादरम्यान बर्‍याच घटना घडल्या. ब्रिटिश राजघराण्यावर त्यांच्या जीवनशैलीवर टीका होऊ लागली. यामुळे आपणही सामान्य आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जनेतेचा विश्वास मिळवण्यासाठी एक ड्यॉक्युमेंटरी बनवण्यात आली. त्यात राजघराण्यातील व्यक्तींमध्ये आणि सामान्यमधील सामान्य जीवनशैलीतील सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यातून महाराणीला फारसे काही साध्य करता आले नाही. त्यानंतर मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पहील्या पंतप्रधान झाल्या, पण त्यांचे महाराणी एलिझाबेथ यांच्याशी फारसे पटत नव्हते. थॅचर यांचे काही देशांप्रती आकसाने वागणे एलिझाबेथ यांना खटकायचे, पण महाराणी एलिझाबेथ शांत होत्या.

त्यानंतर मात्र ब्रिटिश राजघराण्याला दृष्ट लागली. ९० वे शतक तर ब्रिटनच्या राजघराण्यासाठी शापित ठरले. महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र ड्यूक ऑफ यॉर्क आणि पत्नी सारा विभक्त झाले, तर त्यांची मुलगी राजकुमारी ऐन यांनीही पती मार्कबरोबर काडीमोड घेतला. नंतर प्रिन्स चार्ल्स यांचे अफेयर्स आणि लेडी डायना यांच्याबरोबरील नाते चव्हाट्यावर आले. ब्रिटनच्या राजघराण्यातील कुटुंबांची, नात्यांची ही पडझड ब्रिटनच्या जनतेच्या जिव्हारी लागली. कारण आपल्या ७० वर्षांच्या राजकीय कार्यकिर्दीत महाराणी एलिझाबेथ यांनी कधीही त्यांच्या कुटुंबातील कुठलीच अंतर्गत बाब कधीच राजमहालाच्या बाहेर जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली होती. तसे विश्वासू कर्मचारीच त्यांनी राजमहालात नियुक्त केले होते, पण म्हणतात ना भिंतींनाही कान असतात. तसे काळ बदलला, तसे माणसेही बदलली आणि राजमहालाच्या बंदिस्त भिंतीतल्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या.

तर दुसरीकडे महाराणी एलिझाबेथ आता वार्ध्यक्याकडे झुकत होत्या. त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्यावर जबाबदारी सोपवली. राजघराण्यातील पडझड चव्हाट्यावर येत असल्याने जनतेमध्ये ब्रिटिश घराण्याची प्रतिमा बदलत होती. घरात येणार्‍या नव्या पिढीला ब्रिटिश राजघराण्यातील नियम जाचक वाटत होते. लेडी डायनाने त्याची जाहीर वाच्यता केल्याने महाराणी एलिझाबेथ नाराज झाल्या, पण प्रिन्स चार्ल्सच्या अफेयरमुळे दुखावलेल्या लेडी डायनाने जणू ब्रिटिश राजघराण्याविरोधात बंड पुकारले होते. ती लोकांमध्ये थेट जात होती. ब्रिटिश राजघराण्याच्या जोखड नियमांना तिने हरताळ फासला. त्यामुळे सामान्य जनता आणि ब्रिटिश राजघराणे यांच्यातील अंतर वाढले. सामान्य जनता डायनाच्या प्रेमात होती, तर प्रिन्स चार्ल्स आणि महाराणी एलिझाबेथच्या विरोधात. हे अंतर वाढत होते.

अखेर डायनाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा ब्रिटिश राजघराण्याविरोधात ब्रिटिश जनतेने एल्गार पुकारला, पण तोपर्यंत राजकारण कोळून प्यायलेल्या महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या अनुभवाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या लेडी लव बरोबर लग्न केले. अशा पद्धतीने महाराणी एलिझाबेथ यांनी डायनाच्या विषयावरच पडदा टाकला, पण डायनाप्रमाणेच तिचे लेकही थेट जनतेत मिसळतात. लोकांजवळ गेल्यावरच ते आपल्या जवळ येतात. हे राजकारणाचे नवीन गणित आता त्यांना चांगलं अवगत झालंय. यामुळे आता चर्चा होते ती डायना पुत्रांची त्यांच्या सामान्य नागरिकांमधील छवीची. त्यात अनेक वादळे अंगावर घेत ब्रिटिश राजघराण्याचे दिपस्तंभ कायम तेवत राहील यासाठी उभी हयात झटणार्‍या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा उल्लेख न होणे शक्यच नाही.

First Published on: September 11, 2022 4:30 AM
Exit mobile version