पुरुषांवरील लैंगिक अत्याचार !

पुरुषांवरील लैंगिक अत्याचार !

आपल्या समाजात अत्याचार म्हटले की आणि त्यातून लैंगिक अत्याचार म्हटले की ते फक्त महिलांवरच होत असतील आणि होत आहेत असाच विचार केला जातो. महिला शरीराने दुर्बल असल्यामुळे, असहाय, मजबूर किंवा गरजवंत असल्यामुळे, लाचार आणि आर्थिक स्वावलंबी नसल्याने तिच लैंगिक शोषण करणं, तिला त्रास देण सोपं आहे आणि ती मानसिक कमकुवत असल्यामुळे कुठेही वाच्यता करणार नाही, स्त्री बदनामीला घाबरते म्हणून तिची शारीरिक पिळवणूक होणे स्वाभाविक आहे असाच समज आजही आपल्या सर्वांच्या मनात पक्का झालेला आहे, परंतु आजची सामाजिक परिस्थिती पाहता महिलांप्रमाणेच पुरुष, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थीदेखील मुलींनी केलेल्या, महिलांनी केलेल्या लैंगिक छळाला बळी पडताना दिसत आहेत.

हा छळ वैयक्तिक एका मुलीकडून एका मुलालाच केला जात नाही तर मुलींचे समुहसुद्धा कोणत्याही एका मुलाला मानसिक त्रास देऊन, त्याला दमदाटी करुन, धमकावून त्याच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेऊन करताना दिसतात. अनेक महाविद्यालयीन मुलं अबोल, शांत, घाबरट, बुजणारी अथवा स्वतःच्याच कोषात राहणारी असतात. अनेक महाविद्यालयीन मुलांना खूप मित्र मैत्रिणी नसतात ते एकटेच एकाकी राहणे पसंत करतात. शिक्षणासाठी घरापासून लांब राहायला आल्यामुळे नवीन शहरात असल्यामुळे पुरेसा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो. कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य, साधी सरळ असल्याने दुनियादारीचा अनुभव आलेला नसतो अशी मुलंमुलींच्या लैंगिक अत्याचाराला पटकन बळी पडताना दिसतात.

आपली कायदा सुव्यवस्था महिला आणि मुलींना जास्त संरक्षण देऊ करते किंवा त्यांनी कोणत्याही स्वरूपाची कुठेही तक्रार दिली की त्यावर अंमलबजावणी तातडीने केली जाते या कार्यप्रणालीचा गैरवापर आणि असा गैरसमज मुली आणि महिलांमध्ये असल्यामुळे पुरुषांना मानसिक लैंगिक त्रास देताना त्या जराही घाबरताना दिसत नाहीत. कायद्याचा गैरवापर करुन आपण कोणालाही कसही झुकवू शकतो, खोट्या पोलीस तक्रारी करुन पीडित मुलालाच अद्दल घडवू शकतो या मानसिकतेमधून अशा स्वरूपाच धाडस केलं जात आहे.

पुरुषांना अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे प्रचंड अपमानास्पद आणि खजील करणारे असते. जरी त्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर कोण आणि कितपत विश्वास ठेवेल ही खात्री त्याला नसते. स्वतःच्या कुटुंबातूनच त्याला कोणी साथ देईल का हा यक्षप्रश्न त्याला पडतो. पुरुषांवर होणार्‍या लैंगिक भावनिक मानसिक अत्याचारासाठी कोणतीही ठोस न्यायप्रणाली अथवा संरक्षण समिती, कठोर कायदा अद्याप तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा प्रकारे किशोर वयातील मुलांवर, पुरुषाच्या होणार्‍या लैंगिक छळाच्या घटनांना समाज माध्यमातून प्रसिद्धी मिळत नाही, ही प्रकरणे सहजासहजी उघड होत नाहीत आणि अशी प्रकरणे राजरोसपणे घडूनसुद्धा ती समाजासमोर येत नाहीत. तसेच या त्रासातून गेलेले अथवा जाणारे पण त्याबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. या स्वरूपाच्या अत्याचारांमधून जाणार्‍या पुरुषांना, युवकांना आवाज उठवण्याची हिंमतदेखील करणे कठीण होऊन बसलेले आहे. संबंधित महिला अथवा मुलगी त्याच्याच विरुद्ध विनयभंग, बलात्कार यासारख्या तक्रारी देऊन त्याला अधिक नुकसान होऊ शकते ही भीती याठिकाणी पुरुषाला सातत्याने वाटतं असते.

आपल्याच समाजातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या, सुशिक्षित रहिवासी राहत असलेल्या परिसरांमध्ये अमाप पैसा आणि श्रीमंती असणार्‍या अशा महिला आहेत ज्या त्यांच्या घरी काम करणार्‍या नोकर, ड्रायव्हर अथवा इतर पुरुष कामगारांना स्वतःहून शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडतात. पैशाचे आमिष दाखवून अथवा ब्लॅकमेल करुन संबंधित पुरुषांची इच्छा नसली तरीही केवळ स्वतःची शारीरिक गरज भागविण्यासाठी महिला अतिशय खालच्या पातळीवर जाताना दिसतात. पैशाच्या जोरावर एखादी महिला आपल्याला त्रास देऊ शकते, आपलं आयुष्य, कुटुंब उध्वस्त करु शकते या भीती पोटी असा अत्याचार पुरुष सहन करीत राहतो.

मोठमोठ्या महाविद्यालय, शाळा यामधील मुलीदेखील आपल्यापेक्षा खालच्या वर्गात असलेल्या, वयाने लहान असलेल्या मुलांना शारीरिक त्रास देतात, त्यांना मारहाण करुन, मानसिक खच्चीकरण करुन, दबाव टाकून स्वतःच्या लैंगिक अपेक्षा आजकाल तरुण मुली सर्रास पूर्ण करतात. पुरुषासाठी, मुलांसाठी हा छळ सहन करणे अतिशय त्रासदायक, क्लेशकारक असून यामध्ये अनेकजण नैराश्य, मानसिक आजार, विकृती, स्वतःच्या करियरचे नुकसान, तब्येतीची हेळसांड, सतत अपराधीपणाची भावना, कुटुंबापासून दुरावणे अथवा आत्महत्या करणे यासारख्या घटनांना सामोरे जाताना दिसतात.

अनेक पुरुषांना, मुलांना शेजारी राहणार्‍या मुली, नातेवाईक महिला, ओळखीतून मैत्री झालेल्या महिला, कार्यालयात असणार्‍या महिलांकडूनदेखील लैंगिक शोषणाचा कटू अनुभव येतो. स्वतःहून पुरुषांना आकर्षित करुन, त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ, फोटो काढून त्याला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडणे आणि त्याने नकार दिल्यास त्याला ब्लॅकमेल करणे यामध्ये महिलाही अग्रेसर आहेत. सामाजिक माध्यमातून यासारख्या विषयावर जनजागृती होणे, प्रबोधन होणे, शाळा महाविद्यालय याठिकाणी मुलांना अशा समस्यांना सामोर जाण्यासाठी परिपूर्ण परिपक्व बनविणे, त्यांना समुपदेशन करणे, समजावून घेणे आणि समजावून सांगणे यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य होणे अपेक्षित आहे.

अन्याय करणार्‍यापेक्षाही अन्याय सहन करणारा तितकाच दोषी असतो आणि त्यामुळेच समाजात अशा विकृती वाढताना दिसतात. ज्याठिकाणी पुरुषांना, मुलांना कोणताही अनुचित अनुभव येईल त्यावर ताबडतोब प्रतिउत्तर देणे, न्याय मागणे, योग्य ती भूमिका घेणे आपला अधिकार आहे हा आत्मविश्वास मनामध्ये रुजणे काळाची गरज आहे.

अनेकदा अशा घटना समोर येत आहेत की, विवाहित पुरुषांनासुद्धा त्यांच्या पत्नीमार्फत शारीरिक संबंधांमध्ये, त्या दरम्यान मानसिक ताण देणे, पतीच्या इच्छा आणि भावना तसेच गरजांना किंमत न देता त्याला कमी लेखणे, शारीरिक संबंधादरम्यान अपमानास्पद वागणूक देणे, सातत्याने मोबदला म्हणून पतीकडे काहींना काही मागण्या करणे या सारखी वर्तवणूक महिला करताना दिसतात. मुलं बाळ होत नसल्यास विचारपूर्वक परिस्थिती न हाताळता, पतीला दोष देणे, त्याच्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणे, नकार देणे, त्याला हिणवणे आणि त्याच्याशी शारीरिक संबंध तोडणे अथवा त्याला अपेक्षित प्रतिसाद न देणे यासारखी कृत्यंदेखील काही महिला करताना आढळून येतात.

अनेकदा पती-पत्नीमधील अतिशय खासगी प्रसंगांचे वर्णन अथवा गार्‍हाणी, पतीकडून त्या दरम्यान होणार्‍या सर्व क्रिया, कृती याची महिला जाहीर चर्चा नातेवाईक अथवा मैत्रिणी यांच्यासोबतसुद्धा करतात. या माहितीचा वापर करुन अनेक नातेवाईक कुटुंबातील लोक पतीला विविध सल्लेदेखील देतात आणि असे विषय चव्हाट्यावर आणल्यामुळे पतीचे मानसिक खच्चीकरण होत जाते. हादेखील अप्रत्यक्षरित्या पुरुषावर होणारा मानसिक, लैंगिक अत्याचारच आहे. शारीरिक संबंधांदरम्यान पतीशी वादविवाद करणे, त्याच्यावर संशय घेणे, त्याला समजावून न घेणे हा देखील पुरुषावर होणारा अत्याचार आहे. यासारखे विषय समाजात राजरोस घडत आहेत, परंतु याबाबत कोणीही कुठेही दाद मागू शकत नाही. अतिशय वैयक्तिक, खासगी अशा विषयांवर चर्चा करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे प्रत्येकालाच पटेल आणि जमेल असं नाही.

शाळा कॉलेजच्या युवकांसाठी अशा कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आलीच तर त्यांनी त्याबाबत निसंकोचपणे योग्य ठिकाणी दाद मागणे, समुपदेशनाची मदत घेणे, पालकांना विश्वासात घेऊन न लाजता स्वतःच्या समस्या सांगणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्यात उद्भवणारे धोके टाळता येतील आणि जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल.

First Published on: May 22, 2022 4:30 AM
Exit mobile version