मी लिहितो म्‍हणजे..!!

मी लिहितो म्‍हणजे..!!

हा प्रश्न पडण्याचे कारण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे. या निमित्ताने मराठी साहित्यात काही वैचारिक वाद-प्रतिवाद झडतात का? की नेहमीच्या निरर्थक वादातच आम्ही ‘रम’तो. साहित्य, समाज, संस्कृती आणि भवतालच्या अस्वस्थ वर्तमानाविषयी या निमित्ताने कोणी ‘ब्र’ काढते का? किंवा साहित्याविषयी नवं सिद्धांत, नवं प्रमेयांची काही मांडणी होते काय? संमेलनाध्यक्ष काही नवी दिशादर्शक मांडणी करतात काय? गेल्या संमेलनाध्यक्षांनी वर्षभरात नेमके समाज, भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी काय केले? मराठी समुदायाच्या अनुषंगाने काही ठोस कृतीशीलता दाखवली काय? संमेलन अध्यक्षांचे ‘भाषण’या पलिकडे मराठी सारस्वतांचा आवाज बनून तरी काही कार्य होते का? की फक्त हार तुरे आणि स्वागतापुरतेच हे पद उरले!साधारणतः इतर निवडणुकीत राजकीय पक्षांचा स्वतःचा एक जाहीरनामा असतो. आणि निवडणूक संपल्यानंतर त्या जाहीरनाम्याचा सत्ताधारी पक्षाला सोयीस्कर विसरही पडतो. तसे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत होते का?

पण ही अनाठायी तुलना नको.
अर्थात त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व(?) मोठे असते हे मान्यच. पण ते संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर करतात तरी काय? तर संमेलनात मानाचे अध्यक्षीय भाषण. बरं पुढे त्या भाषणांचे नेमके होते काय? म्हणजे त्या भाषणाला कोणी गंभीरपणे घेते काय? किंवा ते ‘भाषण’ साहित्य, संस्कृती विषयक काही नवा वैचारिक आशय किंवा दृष्टी देते काय? एकूण वाङ्मयव्यवहार व जीवनव्यवहाराचा काही नव्याने ‘अन्वयार्थ’ लावण्याचे कार्य भाषणातून साध्य होते काय? तसे हे प्रश्न गैरलागूच; पण गेल्या दशकभरात एखाद्या भाषणाने असे घडले. किंवा ते भाषण प्रंचड लोकप्रिय झाले. किंवा उत्तम बौद्धिक खाद्य म्हणून लोकांनी थंडीच्या दिवसात त्याची ‘पारायणे’ केली. किंवा वर्षभर त्या भाषणाची चर्चा साहित्य वर्तुळात झाली. असे काही घडले काय? वाचन संस्कृती लोप पावल्याने ही शक्यता तशी धुसर मानली तरी दुसरीकडे दहा कोटी भाषा बोलणार्‍या जनतेचा वाङ्मयीन प्रतिनिधी काय म्हणतोय म्हणून राज्यकर्त्यांनी त्या भाषणातील एखाद्या मुद्यावर लक्ष देऊन धोरणात्मक असा काही निर्णय घेतला.(किमान पक्षी भाषाविषयक )असे काही घडल्या-बिघडल्याची खबरबात या पाच-दहा वर्षांत तरी ऐकीवात नाही.अपवादी असे काही घडले असेल तर आनंदी आनंद. माझे अज्ञान मान्य. परंतु असे काही घडत नसेल तर का घडत नाही.याचा उपद्व्यापी विचार करायला नको का…?

एक तर नव्वदीनंतर ‘कूस’बदललेल्या समाजाच्या व नव्या ‘मुक्त’ व्यवस्थेच्या आकलनात आम्ही कमी पडतो? की समाजाला आम्ही काय लिहितो त्याचे आकलन होत नाही. नेमकं काय घडतंय? समाजापासून ‘तुटलेपणा’चा विचार कधी करायचा की नाही? म्हणून कदाचित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य माणूस हे लेखक आहेत का? आम्ही तर हे नाव आजच ऐकले वगैरे. असे प्रश्न उपस्थित करतात. ते यातूनच घडत असावे; अर्थात सर्वच लेखकांच्या वाट्याला लोकप्रियता येते असे माझे मत नाही. कारण काही विद्वान मंडळी अगदी व्रतस्थपणे सैद्धांतिक, संशोधनात्मक, सृजनाचे कार्य यात भर करीत असतात. त्यांच्या बाबतीत असा प्रश्न येणे तसे ओघानेच आले. परंतु इतर वेळी जीवनव्यवहार, समाज, संस्कृती, सामाजिक प्रश्नांवर बोलताना आम्ही कायमच ‘पान्हा’ चोरलेला असतो. त्याचे काय? आमच्या ‘समाजविन्मुख’ असण्यातून तर असे घडत नाही ना? याचाही विचार झाला पाहिजे. समकाळातील परिस्थिती या तथ्यावर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहे.

देश, समाज आणि उभा भवताल वर्तमानात अस्वस्थ असताना मराठी लेखकांची कृती काय? तो काय बोलतो आहे? तो काय लिहितो आहे? समाजाला कोणता शब्द देतो आहे? वर्तमानात त्याची काही मत आहेत काय? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आणि तसा तो काही अप्रस्तुत ठरत नाही. कारण गेल्या पाच वर्षांत अवतीभवती घडलेल्या असंख्य घटना, घटिते व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, समाजातील वाढती असहिष्णुता ते थेट शेतकरी आत्महत्या, सतत पडणारा दुष्काळ, भूकबळी, कुपोषण, लाखोंच्या संख्येने निघालेले जातीजातींचे मोर्चे, त्यातून आकाराला आलेले सामाजिक विद्वेषाचे वातावरण, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी-अखलाक व्हाया गुजरातेतील ‘उना’तील दलितांवरील अत्याचार, भीमा कोरेगावची दंगल, रोहित वेमुलापर्यंत विद्वेषाने घेतलेले बळी. हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मध्य प्रदेशात शेतकर्‍यांवर झाडलेल्या गोळ्यांपासून ते यवतमाळच्या विषबाधित शेतकर्‍यांच्या करुण अंतापर्यंत, काश्मीर ते केरळपर्यंत मूलतत्ववाद्यांनी घातलेला हैदोस, 370च्या नंतर गायब झालेला काश्मिरी आवाज जेएनयूतील विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी, त्यांच्यावर होणारे हल्ले, अशा असंख्य घटनांनी या वर्तमानात असह्य वेदनांना जन्माला घातले आहे. धर्म, साहित्य, संस्कृती, राष्ट्रवाद याविषयी एकांगी विचारांचा बोलबाला वाढला आहे.

अयोध्येतल्या ‘रामा’पासून ते ‘नथुरामा’पर्यंतच्या मुद्यांनीच समाजाचा ‘अवकाश’ व्यापला आहे. धर्म, संस्कृती, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा याविषयी विवेकाधिष्ठित समाजमन घडविण्यासाठी ‘सत्यान्वेशी’ स्पष्ट आणि ‘वस्तुनिष्ठ’ लिहिणार्‍या लेखकाला एक तर ‘माझ्यातला लेखक मेला आहे’ , असे जाहीर करावे लागते. किंवा बंदुकीच्या गोळीने शहीद व्हावे लागते. व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका करणारे जी. बाला असो किंवा पंतप्रधानांच्या आवाजाची नक्कल करणारा शाम रंगेला असोत. की वर्तमानपत्राच्या अग्रलेखांचा जाहिरातींच्या भपकार्‍याने कोंडलेला श्वास असो, किंवा चोवीस तास बातम्या देणार्‍या वाहिन्यांच्या संपादकांची केलेली मुस्कटदाबी असो, अभिव्यक्तीच्या सर्वच माध्यमांसह समाजात या अशा अपप्रवृत्तींनी थैमान घातलेल्या समकाळात फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, वि.रा.शिंदे, शेजवलकर, प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखनाचा वारसा असणार्‍या मराठी भाषेचा लेखक मौन व्रत धारण करून बसला होता. तसं हे मनाला न पटणारे. पण ‘कालाय तस्मै नमः’ ही वृत्ती अंगिकारल्याने समूहमनाच्या हितापेक्षा स्वहीत अधिक महत्त्वाचे वाटायला लागल्याने माणसं ‘आवाजी’ राहिली नाहीत हे सत्य. सामाजिक प्रश्नांची ‘सल’ असणारा आणि त्यावर भाष्य करणारा. आपल्या लेखणीने व्यवस्थेच्या कानशिलात लावणारा लिहिता वर्ग आपल्याकडे सत्तर ते नव्वदच्या दशकात मोठा होता. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा सांगत व्यवस्थेला ताठ मानेने प्रश्न विचारायची हिंमत तेव्हा दाखवली जायची. आज मात्र या सर्वांनी एक तर पाठीचा ‘कणा’ काढून सत्तेच्या वळचणीला पडून केसांची बट, गालावरची खळी यात सौंदर्याची बेटं शोधणार्‍यांच्या रंजनवादी परंपरेत सामील होणं पसंद केले. म्हणून तर सत्तेचे भाट बनून गौरव पर कवणं रचण्यात प्रतिभा खर्च करणारे ‘हुजरे’ कधी सामाजिक आशय मनात साठवून आपल्या शब्दांना धार देत परिवर्तनाच्या लढाईत आपले अस्तित्व पणाला लावतील असा अलिकडील अनुभव नाही.

‘सत्याला’ आणि ‘वास्तवाला’ पाठमोरे होऊन सामान्यांचा बुद्धीभेद करीत सत्तेची मखलाशी करणार्‍या व सुमार दर्जाचे लिहिणार्‍यांचा भरणा साहित्य प्रांती तसा कमी नाही. परंतु खरी ‘वाणवा’ जाणवते ती व्यवस्थेच्या थोबाडीत मारणार्‍या लेखकांची. ‘काळ तर मोठा कठीण आला’, असं म्हणण्याची हिंमत कमविण्यापेक्षा देशातील ‘वारे’ पाहून सत्तेच्या ‘कलाकलाने’ अभिव्यक्तीच्या प्रसव ‘कळा’ देणार्‍यांसाठी सर्व काळ सारखा असतो. म्हणून तर मराठी साहित्यात ‘आणीबाणी’ पासून ते आजतागायत व्यवस्थेच्या विरोधी आवाज बुलंद करणारे वैचारिक बेटं तसे कमीच होती. आजच्याही वातावरणात आज ‘उजव्या सोडेंच्या बाहुल्या’, इंडियन अ‍ॅनिमल फार्म सारख्या कलाकृती असो किंवा ‘दक्षिणायन’चे प्रयोग, ‘पुरस्कार वापसीची’ मोहीम, किंवा कालचा आझाद मैदानावर जमून सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बुलंद केलेला आवाज असो.. व्यवस्थेला लाथाडणे अशी कृती करणारेही अपवादच आहेत….साहित्याच्या सर्वात मोठ्या उत्सवात या समाजवास्तवाची काय चर्चा होते हे पाहणे अधिक औत्सुकतेचे!

First Published on: January 12, 2020 3:11 AM
Exit mobile version