फलज्योतिष…एक जीवघेणे लटांबर

फलज्योतिष…एक जीवघेणे लटांबर

सूर्यमालेतील ग्रह, अवकाशातील धूमकेतू मधून मधून येणारी ग्रहणे यांचा माणसाच्या जीवनावर, त्याच्या स्वभावावर आणि त्याच्या जीवनातील चांगल्या-वाईट घटनांवर प्रभाव पडतो, अशा समजुतीतून फलज्योतिष या विषयाचा जन्म झाला. खगोलशास्त्र हा विज्ञानाच्या नियमातून, अभ्यासातून अस्तित्वात आलेला विषय आहे. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष या दोन विषयांमध्ये फार मोठा फरक आहे. तथापि, नामसदृश्यामुळे सर्वसामान्यांमध्ये याबाबत घोटाळे होताना दिसतात.

खगोलशास्त्र हे महत्वाचे विज्ञान आहे. तर फलज्योतिष हे पूर्णपणे थोतांड असून, अंधश्रद्धेचाच तो प्रकार आहे. कोणत्याही विज्ञान शाखेत काही नियम, काही गृहितके आधारभूत मानली जातात. त्यातून काही भाकीते वर्तवली जातात. वर्तविलेल्या भाकितांची सत्यासत्यता प्रयोगाद्वारे कुणालाही, कुठेही पडताळून पाहता येते. त्यात फरक पडत नाही. कारण विज्ञानाचे प्रयोग हे व्यक्तिनिरपेक्ष असतात. याउलट फलज्योतिषात एकाच पत्रिकेवरून केलेली भाकिते वेगवेगळी असल्याचे दिसते. प्रत्येकासाठी तेथे वेगळा नियम लावला जातो. फलज्योतिषाची भाकिते ही व्यक्तिसापेक्ष असतात. फलज्योतिषात कोणतीच अशी निश्चित गृहितके सांगितली जात नाहीत. म्हणून ते शास्त्र ठरत नाही.

खगोलशास्त्रात सतत बदल होत असतात. त्यामध्ये सतत प्रगती होत आली आहे. फलज्योतिष मात्र जसेच्या तसे स्थिर आहे. त्यात कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. मात्र लोकांना आकर्षूण घेण्यासाठी आणि धंद्याचा भाग म्हणून आधुनिक विज्ञानाने शोधलेल्या साधनांचा फलज्योतिषी मोठ्या खुबीने वापर करून घेताना दिसतात. ‘संगणकाद्वारे कुंडली बनवून दिली जाईल’, अशा पाट्या आपल्याला गल्लोगल्ली दिसतात. आकाशस्थ ग्रहगोल व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचे नियंत्रण करतात, असे ठासून सांगितले जाते. आता आकाशात अब्जावधी ग्रह, तारे आहेत त्यातील कोणत्या ग्रहाचा नेमका काय परिणाम होतो, हे कसे ठरवले, ह्या प्रश्नांची उत्तरे फलज्योतिषीच जाणू बापडे !! हा परिणाम व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असतो, असे सांगितले जाते. म्हणून ते व्यक्तीची जन्मवेळ महत्वाची मानतात. खरं तर, मातेच्या गर्भात कोणत्या क्षणी जीव जन्माला आला, हे कोडे अजून आधुनिक विज्ञानालाही उलगडलेले नाही.

समजा, फलज्योतिषी सांगतात ती शुभ वेळ, तो शुभ मुहूर्त पाळून, आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने जर एका अत्यंत गरीब आणि एका अत्यंत श्रीमंत गरोदर मातेच्या बाळांना जवळजवळ एकाच वेळी जन्माला घातले तर त्यांची भविष्य सारखीच असतील, असे हमीपूर्वक हे तथाकथित फलज्योतिषी सांगू शकतील काय? आपल्याकडे विशेषतः विवाहाच्या वेळी कुंडलीतील गुरुबल, नाडी, पत्रिका, मंगळदोष अशा बाबी पाहिल्या जातात. त्यातील अनिष्ट ग्रह कोणते आहेत, तेही ज्योतिषी यजमानांना सांगतात. त्याबाबतचे कोणकोणते विधी करायचे, तेही सांगितले जाते. म्हणजे कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या अमुक एका ग्रहाची शांती केली की, त्या व्यक्तीच्या जीवनातील त्या ग्रहामुळे निर्माण झालेली अनिष्टता, दुष्परिणाम संपुष्टात येतात असा याचा अर्थ होतो. म्हणजे आकाशातील ग्रहगोलांवर आपल्याकडील फलज्योतिषांची सत्ता चालते, मंत्र घोषाने, होमहवन, विविध विधी केल्याने संतापलेले ग्रह शांत होतात. असा याचा अर्थ होतो. तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणार्‍या कोणाही व्यक्तीच्या बुद्धीला हे पटणारं नाही.

तरीपण फलज्योतिषांची आजही आपल्याकडे चलती आहे. पुराव्यानिशीच कुठल्याही प्रकारचे निष्कर्ष-निवाडे झाले पाहिजेत,असा संस्कार जोपर्यंत व्यक्तीवर होत नाही,तसा आग्रह व्यक्तीकडून धरला जाणार नाही, तोपर्यंत फाजील आत्मविश्वास असणारे भविष्यवेत्ते लोकांची दिशाभूल करीतच राहणार. आपल्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलेले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता, कुतूहल जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. त्याचे कारण अस्थिर समाज व्यवस्था आणि बदलता निसर्ग या बाबींशी व्यक्तीला साधर्म्य न साधता आल्याने, अनेक वेळा व्यक्तीच्या मनात अगतिकतेची, अतृप्ततेची आणि असुरक्षिततेची तीव्र भावना निर्माण होते. मनाला आधार मिळावा, आपल्या भविष्यात उज्वल काय आहे ते जाणून घेण्यासाठी माणसं फलज्योतिषासारखा तकलादू आधार शोधतात. मात्र मुळात ज्याला काडीचाही शास्त्राधार नाही, ते अशा माणसांना काय आणि कसा आधार देणार ?

तरी, आजही आपल्याकडे मोठ्या संख्येने समाज फलज्योतिषाचा आधार घेताना दिसतो. वरवर पाहता त्याची प्रमुख कारणं दिसतात ती म्हणजे परंपरा जोपासणारी आणि जतन करणारी कुटुंब आणि समाजव्यवस्था. त्याचबरोबर शिक्षणातून अपेक्षित असणार्‍या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव !! आपल्याकडे विशेषतः विवाह, वास्तुशांती अशा महत्वाच्या प्रसंगी जाणीवपूर्वक मुहूर्त पाहिला जातो. हा मुहूर्त कशाप्रकारे जीवघेणा ठरू शकतो, यासाठी पुढील प्रत्यक्ष घडलेला सत्य प्रसंग आता आपण पाहूया..

आपल्याकडे मे महिना हा तसा दाट लग्नसराईचा असतो. ग्रामीण भागात लग्नासाठी लॉनसंस्कृती जेव्हा फारशी रुजली नव्हती, तेव्हाची ही घटना आहे. त्यावेळी खेडेगावात सामान्य कुटुंबातील लग्न समारंभ हे विशेषतः घरासमोर किंवा शेतात वस्ती असेल तर तेथे मंडप टाकून करण्याची पद्धत रूढ होती. अशाच एका जवळच्या नात्यातील लग्नसमारंभासाठी कार्यकर्ता गेला असता,तेथे घडलेला हा प्रसंग ! त्यादिवशी लग्नाची तिथी दाट होती. त्यामुळे आचारी, लग्न लावणारे पुरोहित, वाजंत्री अशा लग्नप्रथेशी निगडित व्यावसायिकांची त्यादिवशी चंगळ होती. ज्या लग्नसमारंभासाठी जास्त बिदागी मिळेल, त्याचा क्रमांक प्रथम, अशी स्पर्धा त्यादिवशी अशा व्यावसायिकांमध्ये असल्याचे जाणवले. कार्यकर्ता ज्या लग्नसमारंभासाठी उपस्थित होता, ते ठिकाण गावापासून बरेच दूर, माळरानावर होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या या कुटुंबात हा लग्नसमारंभ पार पाडणार होता. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाचा लग्नमूहूर्त असल्याचे लग्नपत्रिकेत नमूद केलेले होते.

त्याप्रमाणे वराची मिरवणूक लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारात आली. मात्र लग्न लावणारा पुरोहित अद्याप या गावापासून दूर, माळरानावर असलेल्या लग्न ठिकाणी पोहचलेला नव्हता. त्यामुळे वराला प्रवेशद्वाराजवळच थांबविण्यात आले. उन्हाचा भयंकर तडाखा जाणवत होता. एव्हाना लग्नमुहूर्त टळून गेला होता. तास झाला, दोन तास झाले पण पुरोहित काही येईना!! त्याला आणण्यासाठी एकामागून एक, असे अनेक जण गावाच्या दिशेने पळाले. बराच वेळ झाला तरी पुरोहिताला आणण्यासाठी गेलेली माणसंही परत येण्याची चिन्ह दिसेनात. बायाबापड्यांची घालमेल पाहवत नव्हती. उन्हाचा तडाखा आणि तीव्र भूक लागली असल्याने लहान मुलंबाळं यांनी प्रचंड काहूर केले होते आणि ते साहजिकच होते. सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते.

शेवटी अडीच वाजता पुरोहित महाराज घामाघूम होऊन, लग्नस्थळी पोहोचले. ठरलेल्या लग्न मुहूर्ताची वेळ टळली होती. मात्र याबाबत कुणीही काहीही बोलले नाही. कसा का होईना पुरोहित आला, त्याने लग्न लावले, यावर सगळेजण समाधानी असल्याचे दिसले. जेवणाच्या पंगती बसल्या. मात्र जेवणासाठी शिजवलेल्या अन्न पदार्थांपैकी, मटकीची पातळ उसळ खराब झाल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. कारण या लग्नासाठी स्वयंपाक बनवायची ज्या आचार्यांनी सुपारी घेतली होती, त्यांनीच आणखी दुसर्‍या लग्नाची स्वयंपाक बनवण्याची सुपारी घेतली होती. त्यामुळे या लग्नाचा स्वयंपाक सकाळी लवकर उरकून, ते दुसर्‍या लग्नाच्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी निघून गेले होते. मात्र हा सर्व स्वयंपाक भर उन्हात, झाकून ठेवला असल्याचे कार्यकर्त्याने पाहिले होते. दुपारचे तीन वाजत आले होते. तेव्हा मटकीची रस्सेदार उसळ आंबून, फेसाळलेली होती, असे दिसले. ती आता खाण्याच्या योग्यतेची राहिली नव्हती. हे लवकर लक्षात आल्याने, पुढील अनर्थ टळला.

सांगण्याचे तात्पर्य असे की, फलज्योतिषानुसार लग्नमुहूर्त पाहणे आणि लग्न लावण्यासाठी अमूक एक व्यक्तीच हवी, ह्या अट्टाहासाच्या नादी लागल्याने किती फजिती होते, कसे संकट ओढवतेे आणि कशाप्रकारे प्रसंगी जीवावर बेतण्याची वेळ येते, हे या घटनेवरून लक्षात येते. विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे लग्नाचा मूहूर्त टळून गेल्यावर, हे लग्न लागले होते. खरं तर पुढील आयुष्यात ह्या जोडप्याच्या आयुष्यात बरीच विघ्न यायला पाहिजे होती. पण त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला आणि त्यांची मुलं मुली उच्च शिक्षित झाली आहेत. मात्र अजूनही समाज मूहूर्त सांगणारे फलज्योतिषाचे हे जीवघेणे लटांबर बाळगूनच वाटचाल करीत आहे.

First Published on: September 5, 2021 6:00 AM
Exit mobile version