मानवी अवगुण वनस्पतींच्या मुळावर

मानवी अवगुण वनस्पतींच्या मुळावर

आयुर्वेद, तंत्रविज्ञान, जादूटोणा, नक्षत्रविज्ञान, वास्तुशास्त्र, वनस्पतीविज्ञान अशा सर्वच प्रकारांत एकसमान माध्यम आढळतं, ते म्हणजे त्यात वनस्पतींना देण्यात आलेलं असामान्य महत्त्व. आजही फेसबुक, यूट्युबसारख्या सोशल मीडियावर हजारो व्यक्ती, संस्था अशा चमत्कारांचा दावा करत स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेताहेत. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात आढळणार्‍या काळी हळदीला तर सोन्यापेक्षा अधिक दराने विकली जाते. त्यातही ही हळद खरी की खोटी, याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. जी वनस्पती सहजासहजी आढळत नाही तिच्याबद्दलच अधिक गुण सांगितले जात असल्याचंही दिसून येतं. म्हणूनच काळी हळद, सफेद मुसळी, रिंगणी, सर्पगंधा, अश्वगंधा, रक्तचंदन, पांढरा पळस, रुई, लाजाळू अशा असंख्य वनस्पती आज त्यांच्यातील चमत्कारिक औषधी गुण आणि अंधश्रद्धेमुळे अखेरच्या घटका मोजताहेत.

विकास व उत्पन्नाच्या नावाने होत असलेली जंगलतोड आणि वसाहतींसाठी नष्ट केली जाणारी वनसंपदा यामुळे भारतातली वनसंपदा संकटात सापडलीय. नांदेड शहरातील स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जैवतंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती. त्यातही या विषयावर सखोल चर्चा झाली. विविध देशांतल्या वनस्पती तज्ज्ञांचा सहभागी आणि त्यांनी मांडलेले विचार लक्षवेधी ठरले. महाराष्ट्रात दोन, तर भारतात 35 प्रयोगशाळांमध्ये वनौषधींवर संशोधन सुरू आहे. त्यात मुंबई आणि पुण्यातील प्रयोगशाळेचा समावेश आहे. अशा संशोधनांसाठी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून अवघे 10 ते 15 लाख रुपयांचा निधी दिला जातो आणि तोही विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना मिळतो. त्यामुळे आजही वनस्पतींच्या विषयाला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचंच यातून दिसतंय.

महाराष्ट्रात आढळून येणार्‍या करवी, शिवाला, रानवांगी, रानतीळ, कनवेल, खापरखोडा, सफेद मुसळी, काळी मुसळी, कटेरी, जकरा अशा अनेक वनस्पती संकटात आहेत. खरंतर भारतासारखी नैसर्गिक अनुकूलता जगाच्या पाठीवर अपवादानेच उपलब्ध असावी. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या वनस्पतींचं अस्तित्त्वच संकटात आलंय. विकास आणि उत्पन्नाच्या नावाखाली होत असलेली जंगलतोड व वसाहतींसाठी नष्ट केली जाणारी वनसंपदा हेदेखील यामागचं मोठं कारण आहे. सद्यस्थितीत दीड हजार औषधी वनस्पती संकटात आहेत. असं असतानाही त्यांचं संगोपन आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. इतर वनस्पतींप्रमाणेच या दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यास, त्यांचं अस्तित्त्व तर टिकेलच, शिवाय शेतकर्‍यांना चांगला पैसाही मिळू शकेल. त्यासाठी कृषी विद्यापीठांसह शासकीय रोपवाटिकांकडूनही प्रयत्न होण्याची गरज आहे.

नाशिकलाही दुर्मिळ वारसा

आदिवासी पट्ट्यात ज्या पद्धतीनं अंधश्रद्धेचं गारुड मोठ्या प्रमाणावर पसरलेलं दिसतंय, त्याच प्रमाणात दुर्मिळ वनस्पतीदेखील आढळून येतात. नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण आणि त्र्यंबकेश्वर भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी भागाचा समावेश आहे. याशिवाय ब्रह्मगिरी, सप्तश्रुंग गड, अंजनेरी या ठिकाणीही दुर्मिळ वनस्पती तग धरून आहेत. अलिकडेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) संस्थेनं नामशेष म्हणून घोषित केलेल्या सेरोपेजिया या प्रकारातील एक वनौषधी अंजनेरी परिसरात आढळून आली. ही वनस्पती संपूर्ण जगभरात केवळ याच भागात सापडल्याचा दावाही जैवविविधता क्षेत्रातल्या संशोधकांनी केलाय. त्यामुळे ही वनसंपदा जपण्यासाठी स्थानिक यंत्रणांनीही हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जपण्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत.

तंत्रमंत्रांसाठीही भरमसाठ तोड

काविळ उतरवणं, नजर दूर करणं, गंडेदोरे, ताईत, बाधानिवारक तोडगे यांसाठी वनस्पतींची पानं, खोड आणि मुळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय गावाकडच्या बाबा-बुवांकडून विविध आजारांवर जी औषधं बनवली जातात, त्यासाठीही वनस्पतींची भरमसाठ तोड सुरू आहे. अंधश्रद्धेचा मोठा पगडा आजही कायम असल्याने पैसे मिळवण्यासाठी, भरभराट होण्यासाठी, इच्छित फलप्राप्तीसाठी काळ्या जादुचा आधार घेतला जातो. यासाठी आदिवासी पाड्यांवर अनेक मांत्रिक आजही सर्वकार्य करुन देण्याचा दावा करतात. त्यासाठी ज्या वनस्पती लागणार असतात, त्यापोटी हजारो रुपयांची मागणी केली जाते. त्यातून अंधश्रद्धाळूंच्या पदरी काही पडो न पडो, मात्र मांत्रिकांची मात्र चांगलीच भरभराट होतेय, एवढं मात्र खरं!

तणनाशकाने केला घात

मुख्य पीक वगळता बांधांवर उगवणार्‍या वनस्पतींना अनावश्यक किंवा तण ठरवून त्यांचा नाश करण्यासाठी गेल्या काही वर्षांत तणनाशकाचा बेसुमार वापर सर्वदूर सुरू आहे. दुर्दैवाने याच अनावश्यक समजल्या जाणार्‍या वनस्पतींमध्ये आघाडा, दुर्वा, नागरमोथा, माका, वेलवर्गिय विविध वनस्पतींचादेखील नाहक बळी जातोय. मानवाला नकोशा वनस्पतींना तण किंवा अनावश्यक ठरवून, त्यांचा नाश केला जातोय. प्रत्यक्षात या वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या आहेत, हेच कुणी लक्षात घेत नाही.

First Published on: January 31, 2021 5:00 AM
Exit mobile version