पहिला बालकुमार मेळावा ज्ञानपर्वणी

पहिला बालकुमार मेळावा ज्ञानपर्वणी

नाशिक शहरात होणारे मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होण्यासाठी आयोजक नवनवीन उपक्रमांचा पायंडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कधी बालकुमार मेळावा आयोजित करण्यात आला नव्हता. यंदा प्रथमच हा बालसोहळा रंगणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यातून मराठी भाषेची महती, भाषेतील ज्ञानभांडार, संत साहित्य हा सर्व अनमोल ठेवा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मेळाव्यात बालसाहित्यिकांचे कवितावाचन रंगणार आहे. यावेळी प्रख्यात बालसाहित्यिक राजीव तांबे, रेणू गावस्कर, अर्चना कुडतरकर, पृथ्वीराज तौर, आनंद घैसास मुलांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा बोलणार्‍या, वाचणार्‍या आणि लिहिणार्‍या विद्यार्थ्यांना ज्ञानपर्वणीच ठरेल.

मराठी भाषेवर प्रादेशिक व परकीय भाषांचे आक्रमण होत आहे. त्यामुळे तरुणाई मराठी कमी बोलते. बोलणार्‍या मराठीत इतर भाषांचे मिश्रण होते. परिणामी, मिश्रीत भाषेविषयी पाहिजे त्या प्रमाणात आस्था नसते. प्रत्यक्षात टीकाकारसुद्धा कितपत मराठी बोलतात? ज्यांची मातृभाषा मराठी आहे, तेसुद्धा कितपत मराठी शब्दाचा वापर करतात, याबाबत साशंकता आहे. कारण, पोलीस, वकील, शिक्षण, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती दैनंदिन जीवनात वावरताना इंग्रजीसह इतर भाषेचा वापर करतात. समोरील व्यक्ती अमराठी बोलत असेल तर संबंधित व्यक्तीशी मराठी सोडून दुसर्‍या भाषेत बोलण्यास प्राधान्य दिले जाते. मराठी भाषेची मुलांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी घरापासून सुरुवात होणे आवश्यक आहे. मुले आजूबाजूच्या वातावरणातून भाषा शिकतात. त्यामुळे पालकांनी मातृभाषा मराठी असल्याने भाषेविषयी गोडी वाढवण्यासाठी मुलांना मराठी भाषण, कविता वाचन, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी केले पाहिजे.

साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात तरुणाईला सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यंदा प्रथमच संमेलनात तरुणाईसह मुलांनासुद्धा सहभागी केले जाणार आहे. बालपणीच मुलांवर भाषासंस्कार झाले तर ते भावी आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेले तरी त्यांना भाषेची अडचण येणार नाही आणि मराठीविषयी त्यांच्यामध्ये कायमस्वरुपी गोडी राहील. बालकुमार मेळाव्याची जगभर दखल घेतली जावी, यासाठी आयोजकांकडून मेळाव्यात डिजिटल मंच उभारला जाणार आहे. यामध्ये कॅलिफोर्निया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, अमेरिकेच्या सातही देशांसह जगभरात जिथे-जिथे मराठी माणूस आहे तिथून मुलेमुली ऑनलाइन हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा डंका जगभर पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद पण शिक्षण चालू होते. त्यामुळे अनेक मुलांवर मराठी भाषेविषयी तुलनेने गोडी निर्माण झाली नसल्याचे समोर आले आहे. ही पिढी भविष्यात मराठी भाषेपासून दुरावली जाण्याची शक्यता आहे. मुलांना मराठी भाषा शिकवताना अवघड पद्धतीने व जबरदस्तीने न शिकवता मित्र बनून आणि हसत-खेळत शिकवणे आवश्यक आहे. कारण, अतिरेक केला तर मुले मराठी भाषा शिकण्याऐवजी तिरस्कार करतील. मराठी भाषेविषयी मुलांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी पालक, शिक्षकांसह सहकारी मित्रांनी आवडत्या विषयावर सरळ, साध्या व सोप्या पद्धतीने संवाद साधला पाहिजे. यंदा साहित्य संमेलनातून प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकरसुद्धा मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करणार आहेत. त्यांचे मुलांसह पालकांनासुद्धा आकर्षण आहे. ही संधी साधत आयोजकांनी तयारी केली आहे. संमेलनस्थळी मुलांनी येताना कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. मुलांना दोन वर्षांनी संमेलनानिमित्त पहिल्यांदाच मित्रासह सारस्वतांच्या मेळ्यात सहभागी होता येणार आहे. मुलांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना नवनवे विषय समजावेत, भाषेतील गंमती-जमती समजाव्यात, यासाठीच आयोजकांनी बालकुमार मेळावा आयोजित केला आहे.

प्रादेशिक विभागासह ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मराठी भाषेत वेगळेपण असल्याने अनेकांची मराठी भाषा इतरांना वेगळी वाटते. भाषेविषयी अज्ञान असलेले पालक मुलांना वेळ मारुन नेण्यासाठी जमेल तशी मराठी शिकवताना दिसून येतात. त्यातून मुलांची मराठी भाषा प्रगल्भ होण्याऐवजी बिघडत आहे. मुलांना दैनंदिन व्यवहारासह अचूक मराठी लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे. त्यासाठी पालकांनी मुलांना शब्द ओळख करुन देण्यासह लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यांच्याकडून सराव करुन घेतला पाहिजे. तर मुलांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवता येईल. काळानुरुप मुलांच्या गोष्टी, कवितांचे स्वरुप कसे बदलले आहे. भविष्यातील मराठी भाषेपुढे असलेली आव्हाने काय आहेत, याची माहिती मुलांसह पालकांना बालकुमार मेळाव्यातून मिळाणार आहे. त्यामुळे हा मेळावा सर्वांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

1872 साली सर्वप्रथम मराठीमध्ये बालबोध मेवा नावाचे मासिक सुरू झाले होते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक बाल नियतकालिकांना सुरुवात झाली होती. मराठीत खेळगडी, शाळापत्रक, बालमित्र, बालोद्यान, सचित्र बालमासिक, मुलांचे मासिक, गोकुळ, फुलबाग, बालवीर, गंमत, गंमत-जंमत, आनंदवन, टुणटुणनगरी, बिरबल, टारझन, क्रीडांगण, किशोर, छावा, ठकठक, चांदोबा, चंपक, कुमार, टॉनिक, रानवार, विज्ञानयुग ही साप्ताहिके आणि मासिके सुरू होती. पालकांचे वाचन कमी झाल्याने मुलांचेसुद्धा वाचन कमी झाले आहे. परिणामी, मराठी बालसाहित्याला मागणी कमी झाली आहे. मराठीतील चांदोबा, ठकठक ही एकेकाळी प्रचंड मागणी व खप असलेली बाल नियतकालिके बंद पडली असून, चंपक, किशोर सध्या सुरू आहे. किशोर मासिक ई स्वरूपात सुरू झाले आहे. त्यातील कथा, कथांची मांडणी, चित्रे बदलली आहेत. फक्त शहरांतील मुलांनाच लक्ष न करता ग्रामीण भागांचाही विचार केला. त्यामुळे किशोर मासिक टिकून आहे.

कोरोनामुळे मुलांना मुक्त वातावरणात जाता आले नाही की मुलांचा शिक्षकांशी प्रत्यक्ष संपर्क आलेला नाही. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा वाढला आहे. मुलांच्या वयोमानानुसार मातृभाषेतील शब्दसंग्रह तुलनेने कमी झाला आहे. मुले मराठी भाषेसह अभ्यासापासून दुरावली आहेत. मुलांना निबंध लेखनासह वाचनातून भाषेची गोडी निर्माण होते. पण कोरोनामुळे मुलांचे लेखन हरवले आहे. मुले आई, वडील, शिक्षकांचे अनुकरुन करतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर बालपणीच मराठी भाषेचे संस्कार करावेत. मुलांशी मनमोकळेपणे मराठी भाषेतून संवाद साधला पाहिले. मुलांना मराठीतून बोलते केले पाहिजे. मुलांना बोलताना शब्दांचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. मराठी भाषा शिकवताना इतर भाषा वाईट आहेत, असे कधीही सांगू नयेत.

मराठी आपली मातृभाषा आहे. मातृभाषेवर प्रभत्व मिळवता आले तर दुसर्‍या भाषा शिकणेसुद्धा सोपे जाते, हेसुद्धा पालकांनी समजून घेतले पाहिजे. कोणतीही भाषा वाईट नसते. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. मुले बालपणापासून जी भाषा शिकतात ती त्यांची मातृभाषा असते. मातृभाषा मुलांना भावी आयुष्यात जडण-घडणीसाठी उपयोगी पडते. मराठी मातृभाषा असलेल्या पालकांनी मुलांना इतर भाषा शिकवण्यासाठी मराठी अगोदर शिकवली पाहिजे. मुले कोणते मराठी शब्द बोलताना अडखळतात. त्यांना कोणते शब्द समजत नाहीत. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातून मराठी भाषा समृद्ध होईल आणि भावी पिढी चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकेल.

आधुनिक काळात मुले तंत्रस्नेही झाली आहेत. संगणक, लॅपटॉप व मोबाईल मुले सहजरित्या हाताळत आहेत. मात्र, मुलांना मराठी भाषेचा अडथळा येत आहे. मुलांना मोबाईलवर मराठी लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर करण्यास पालक सांगत आहेत. शिवाय, पालक लिहिताना शॉर्टकट शब्दांचा वापर करत आहेत. तेच मुले अनुकरण करत आहेत. त्यामुळे मुले मराठीच्या मूळ शब्दांपासून दुरावली जात आहेत. त्यामुळे संगणक, लॅपटॉप व मोबाईलवर मुले शब्दांऐवजी शॉर्टकट शब्द किंवा चिन्हाचा वापर करत आहेत. परिणामी, मुलांची मराठी भाषा बिघडत आहे. तंत्रज्ञानामुळे मुले लेखन करण्यास टाळाटाळ करत असल्याने मुलांची अक्षरे वळणदार न होता बिघडत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडून मराठी भाषा लिहिणे, वाचणे व बोलण्याचा सराव करुन घेतला पाहिजे. नाशिकमधील साहित्य संमेलनातील बालकुमार मेळावा मुलांसह पालकांसाठी दिशादर्शकच ठरणार आहे.

First Published on: November 28, 2021 6:19 AM
Exit mobile version