अन्नसुरक्षा ऐरणीवर…

अन्नसुरक्षा ऐरणीवर…

‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर जगभरातील ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरुक झाली आहे. या आधी अशा मोठ्या रोगांच्या साथी आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. विशेषत: उच्च गुणवत्तेचे आणि सुरक्षित अन्न मिळवण्याच्या बाबतीत जागरुकता वाढली आहे. त्यातूनच सेंद्रियला मागणी वाढली आहे. मागणी तसा पुरवठा या सुत्रानुसार बाजारात सेंद्रिय उत्पादनांचा पुरवठा वाढला आहे. मात्र तो खरोखरच ‘सेंद्रिय’ आहे का? तो पूर्णपणे उच्च गुणवत्तेचा आणि संपूर्ण सुरक्षित आहे का? याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे.

कुठलेही प्रमाणिकरण नसतांना सेंद्रियच्या नावाखाली काहीही विकले जाण्याचे प्रकारही समोर येत आहे. यातून अन्नुसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी अधिक जागरुक राहणे गरजेचे आहे. नव्याने सुरु झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन थेट ग्राहकांना प्रमाणित रासायनिक अवशेषविरहीत तसेच सेंद्रिय शेतमालाचा पुरवठा केल्यास या बाजारातील अपप्रवृत्तीला वेसन तर बसेलच त्या शिवाय ग्राहकांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाईल आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही भर पडू शकेल.

‘सेंद्रिय’ची मागणी वाढली..
कोरोनामुळे ‘सेंद्रिय’उत्पादनांना मागणी वाढली आहे. जगभरात सेंद्रियमध्ये तब्बल 100 अब्ज डॉलरची उलाढाल होत आहे. पुढील 5 वर्षात 150 अब्ज डॉलर पर्यंत जाईल, अशी माहिती ‘फ्रेशप्लाझा’च्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे.
रोगाची साथ आल्यानंतर सर्वसामान्य ग्राहक आपल्या आरोग्याबाबत आणि विशेषत: आहाराबाबत जागरुक होतात. असे आतापर्यंतच्या इतिहासातील साथीच्या घटनांवरुन दिसून येते. या दरम्यान सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ होते. 1990 मध्ये जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांचे फारसे ठळक अस्तित्व नव्हते. आजमितीस सेंद्रिय शेतमाल उत्पादनांची बाजारपेठ 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाच्या या महामारीच्या साथीनंतर पुढील 5 वर्षात सेंद्रियची जागतिक बाजारातील उलाढाल 150 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार आहे.

रिटेल मधून मागणी
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात त्याविरुध्द युध्द सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील ग्राहक आहाराबाबतीत अधिक जागरुक झाले आहेत. त्यातून सेंद्रिय शेतमाला उत्पादनांना मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. होल मार्केट चेनच्या रिपार्टनुसार इंग्लंडमधील रिटेल साखळ्यांतून मागील दोन महिन्यातून 25 टक्के अधिक सेंद्रिय उत्पादनांची विक्री झाली असून या उत्पादनांच्या मागणीत वाढ होत आहे. भारतातील सेंद्रिय उत्पादनांच्या ऑनलाईन रिटेल विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे. तर फ्रान्समध्ये ही वाढ 40 टक्के इतकी नोंदली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सुविधेचा भाग म्हणून जगभरात फूड सप्लाय चेन सुरळीत राहण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक आरोग्याबाबत सर्वाधिक जागरुक होत असताना सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदीकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंतच्या जगभरातील घडामोडींचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की जेव्हा जेव्हा अशा साथीच्या प्रसारामुळे भीतीचे वातावरण तयार होते. तेव्हा तेव्हा लोक आरोग्याबाबत आणि विशेषत: आहाराबाबत खूप जागरुक होतात. ते शुध्द स्वच्छ आणि सेंद्रियची मागणी करतात.

आपत्ती आणि सेंद्रियचा असाही संबंध..
2000 मध्ये ‘बीएसई’ नावाचे संकट उभे राहिले तेव्हा नंतरच्या काळात युरोपमध्ये सेंद्रिय मांसाला मागणी वाढली. 2004 मध्ये ‘सार्स’च्या साथीनंतर सेंद्रिय भाजीपाल्याला मागणी वाढली. 2008 मध्ये मेलामाईन घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बालकासाठी तयार होणार्‍या अन्न निर्मिती उद्योगात मोठे बदल झाले. त्यासाठीही सेंद्रिय उत्पादनांची मागणी जोर धरु लागली.

कोरोनामुळे पुरवठा अडचणीत
सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्यास अनेक मर्यादा आहेत. जगभरातील बहुतांश भागात ही अवघड बाब आहे. सेंद्रिय उत्पादनासाठी बहुतांश कच्चा माल, आशिया, लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेत मिळतो. कोरोनाच्या या वातावरणात या मालाची उपलब्धता होत नसल्याच्या अडचणी मोठ्या आहेत. भारत हा जगासाठी सेंद्रिय चहा, मसाले पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा मोठा पुरवठादार आहे. मात्र आंतर्राष्ट्रीय स्तरावर वाहतुकीच्या समस्या असल्याने सध्यातरी हा व्यापार ठप्प झाला आहे.

दीडशे अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार
1990 मध्ये पहिल्यांदा सेंद्रिय शेतमाल उत्पादने जगाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाली. प्रचलित बाजारव्यवस्थेत सेंद्रिय उत्पादने स्थिर होण्यास 15 वर्षे लागली. 2008 मध्ये केवळ सेंद्रिय उत्पादनांची उलाढाल 50 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. पुढील 10 वर्षात म्हणजे 2018 पर्यंत हा व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. कोविड-19 च्या या परिस्थितीनंतर सेंद्रियच्या मागणीत वाढ होत जाणार हे स्पष्ट आहे. पुढील 5 वर्षातच सेंद्रियची जागतिक बाजारातील उलाढाल 150 अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सेंद्रियच्या नावाने…
चकाकते ते सारे सोने नसते, अशा अर्थाची एक म्हण प्रसिध्द आहे. त्यानुसार बाजारात सेंद्रियच्या नावाने जे खपते ते सेंद्रिय असेलच असे नाही. मात्र दुकानात किंवा एखाद्या रिटेल आऊटलेटमध्ये उत्पादनाच्या आवेष्टनावर सेंद्रिय उत्पादन असे लिहिले असते. मात्र बर्‍याचदा ते सेंद्रिय नसते. रसायन अवशेष विरहीत किंवा सेंद्रिय उत्पादन असण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारच्या प्रमाणिकरणातून जावे लागते. शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या पातळीवर अशा प्रकारे प्रयोगशाळेतून पृत्थकरण करुन रसायन अवशेष नसलेले शेतमाल उत्पादन उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात.

अशी प्रमाणित उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे व त्यातून त्यांच्या अन्नसुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील ‘सह्याद्री फार्म्स’ ही शेतकरी उत्पादक कंपनी अन्नसुरक्षेच्या जागतिक मानकांचे काटेकोर पालन करुन उच्च गुणवत्तेची व संपूर्ण सुरक्षित फळे व भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. त्यासाठी त्यांनी संशोधन व विकास यंत्रणेवर विशेष भर दिला आहे. अन्य शेतकरी गटांनी आणि कंपन्यांनीही असे एकत्र येऊन सुरक्षित अन्ननिर्मितीची व पुरवठ्याची चळवळ व्यापक करणे ही काळाची गरज आहे. येत्या काळात राज्याच्या शिवारात मोठ्या प्रमाणात असे उपक्रम दिमाखात उभे राहतील असे दिसत आहे.

First Published on: September 26, 2021 3:20 AM
Exit mobile version